भारताच्या पुनर्जागरणाचे पर्व: भारतेन्दु युग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डॉ. फिरदौस खान

१४ सप्टेंबर रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. हेच औचित्य साधत, हिंदी साहित्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि देशाच्या दृष्टीकोनाला आकार देणाऱ्या हिंदीतील प्रमुख्य साहित्यिकांची ओळख 'आवाज मराठी'वरून लेखमालेच्या रूपाने करून देत आहोत. त्यातील हा पहिला लेख...
 
हिंदी साहित्यात भारतेन्दु युगाचा काळ साधारणपणे १८६८ ते १९०० इसवी पर्यंत मानला जातो. भारतेन्दु हरिश्चंद्र हे आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मानले जातात, त्यामुळे या युगाला त्यांच्या नावावरून ‘भारतेन्दु युग’ असे नाव पडले. या युगापासून आधुनिक काळाची सुरुवात मानली जाते. याला 'पुनर्जागरण युग' असेही म्हटले जाते, कारण या युगात जनजागृती आणि सामाजिक सुधारणेवर विशेष भर दिला गेला.

हे खऱ्या अर्थाने पुनर्जागरणाचे पर्व होते. या काळात समाजात रूढ असलेल्या जात-पात, उच्च-नीच, लैंगिक असमानता, हुंडा प्रथा, बालविवाह, अशिक्षा आणि अंधश्रद्धा यांसारख्या वाईट प्रथांविरोधात आवाज उठवला गेला. या कुप्रथांच्या निर्मूलनासाठी संघर्ष करण्यात आला आणि सामाजिक सलोखा व एकतेवर भर देण्यात आला. देश ब्रिटिश राजवटीखाली होता आणि इंग्रजांकडून भारतीय जनतेवर सतत अत्याचार केले जात होते. जनतेचे जीवन नरकासमान झाले होते. अशा परिस्थितीत, साहित्यिकांनी आपल्या लेखणीने लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली.

या काळातील साहित्यात सामाजिक सुधारणा आणि देशप्रेमाची भावना अत्यंत प्रबळ होती. यावेळी असंख्य वृत्तपत्रे आणि नियतकालिके सुरू करण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांमध्ये उत्साह भरणे आणि ब्रिटिश राजवटीच्या जनविरोधी धोरणांचा उघडपणे विरोध करणे, हा या सर्वांचा उद्देश होता. या युगात साहित्य आणि पत्रकारितेसोबतच नाट्यकलेलाही भरपूर प्रोत्साहन मिळाले. अनेक मौलिक आणि अनुवादित नाटकांची रचना झाली, ज्यामुळे राष्ट्रीय रंगमंचाचा विकास झाला. या मंचाच्या माध्यमातूनही लोकांना सामाजिक कुप्रथांच्या निर्मूलनाबद्दल जागरूक करण्याचे कार्य केले गेले.

या युगात हिंदीच्या प्रगतीवरही विशेष भर देण्यात आला. तिचा जनसंपर्काची भाषा म्हणून प्रचार-प्रसार करण्यात आला. या युगात साहित्य लेखनाच्या विविध प्रकारांसोबतच, हास्य-व्यंग्यालाही प्रोत्साहन मिळाले. यातून तत्कालीन सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर व्यंग्य केले गेले, तीव्र टोले लगावले गेले.

भारतेन्दु युगातील साहित्यिक नायिकेच्या बाह्य सौंदर्यावर काव्य रचत नव्हते, तर तिच्या मनातील व्यथा आणि वेदना अनुभवून त्यावर चिंता व्यक्त करत होते. त्यांनी लोकांसाठी साहित्य रचले.

भारतेन्दु हरिश्चंद्र
भारतेन्दु हरिश्चंद्र यांनी हिंदी साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे मूळ नाव ‘हरिश्चंद्र’ होते आणि ‘भारतेन्दु' ही त्यांची उपाधी होती. त्यांनी रीतीकाळातील सरंजामशाही संस्कृतीचा त्याग करून एक नवीन परंपरा सुरू केली. रीतीकाळात बहुतेक काव्य राजांच्या दरबारात आश्रय घेऊन लिहिले गेले, हे उल्लेखनीय आहे. त्यामुळे काव्याची रचना आश्रयदात्यांच्या आवडीनुसारच होत असे. काव्याचा उद्देश राजांचे मनोरंजन करणे हा होता. यासाठी मुक्तक काव्य सर्वोत्तम मानले जात असे.
 

साहित्यातील नावीन्यपूर्णतेमुळे भारतेन्दु हरिश्चंद्र भारतीय नवजागरणाचे अग्रदूत म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या लेखनातून सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला. त्यांच्या साहित्यात तत्कालीन परिस्थितीचे सजीव चित्रण आढळते. ते बहुआयामी प्रतिभेचे धनी होते. ते एक कवी, गद्यकार, नाटककार, निबंधकार, व्यंग्यकार, पत्रकार, संपादक आणि कुशल वक्तेही होते. त्यांनी या सर्व क्षेत्रांत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी 'कविवचनसुधा', 'हरिश्चन्द्र मॅगझिन' आणि 'बाला बोधिनी' नावाची नियतकालिकेही सुरू केली.

भारतेन्दु हरिश्चंद्र यांना काव्य-प्रतिभा आपल्या वडिलांकडून वारशात मिळाली होती. त्यांचे वडील गोपालचंद्र हे कवी होते आणि 'गिरधरदास' या टोपण नावाने काव्यरचना करत. असे म्हटले जाते की, केवळ पाच वर्षांचे असताना त्यांनी एक दोहा रचून आपल्या वडिलांना ऐकवला होता-

लै ब्योढ़ा ठाढ़े भए श्री अनिरुद्ध सुजान।
बाणासुर की सेन को हनन लगे भगवान।।

(अर्थ: सुजाण श्री अनिरुद्ध वधूला घेऊन उभे राहिले आणि भगवान बाणासुराच्या सैन्याचा नाश करू लागले.)

आपल्या लहानग्या मुलाच्या तोंडून दोहा ऐकून त्यांचे वडील भावविभोर झाले आणि त्यांनी आपल्या मुलाला सुकवी होण्याचा आशीर्वाद दिला. वडिलांच्या आशीर्वादाचेच फळ होते की, त्यांनी खूप कमी वयात साहित्य जगात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांच्या प्रमुख रचनांमध्ये वैदिकी हिंसा हिंसा न भवति, सत्य हरिश्चन्द्र, श्री चंद्रावली, विषस्य विषमौषधम्, भारत दुर्दशा, नीलदेवी आणि अंधेर नगरी इत्यादींचा समावेश आहे.

भारतेन्दु हरिश्चंद्र हे खडीबोली गद्याचे प्रवर्तक आहेत. त्यांच्या काळात कवितेची भाषा प्रामुख्याने ब्रज होती. त्यांनी हिंदीसोबतच मातृभाषेवर विशेष भर दिला-

निज भाषा उन्नाति अहै सब उन्नयति को मूल
बिनु निज भाषा ज्ञान के मिटत न हिय को शूल

(अर्थ: स्वतःच्या भाषेची उन्नती हीच सर्व उन्नतीचे मूळ आहे आणि स्वतःच्या भाषेच्या ज्ञानाशिवाय हृदयाचे दुःख दूर होत नाही.)

बालकृष्ण भट्ट
बालकृष्ण भट्ट हे भारतेन्दु युगातील महत्त्वपूर्ण साहित्यिकांपैकी एक आहेत. त्यांना गद्यप्राय कवितेचे जनक मानले जाते. ते कादंबरीकार, नाटककार, निबंधकार आणि पत्रकार होते. आत्मपरक शैलीचा वापर करून हिंदीला एक नवीन शैली प्रदान करणारे ते पहिले निबंधकार होते. त्यांच्या प्रमुख रचनांमध्ये साहित्य सुमन, भट्ट निबंधावली (निबंध संग्रह), नूतन ब्रह्मचारी, सौ अजान एक सुजान (कादंबरी), दमयंती स्वयंवर, बाल-विवाह, चंद्रसेन, रेल का विकट खेल (नाटक) आणि वेणीसंहार, मृच्छकटिक, पद्मावती (अनुवाद) यांचा समावेश आहे. त्यांनी सुमारे बत्तीस वर्षे 'हिन्दी प्रदीप' या मासिकाचे संपादन केले. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली आणि हिंदी भाषा व साहित्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 

त्यांनी जिथे 'भारतेन्दु युगा'ला आधार दिला, तिथेच ते 'द्विवेदी युगा'च्या लेखकांचे प्रेरणास्थानही ठरले. त्यांची भाषाशैली उत्कृष्ट होती. त्यांनी आपल्या रचनांमध्ये शुद्ध हिंदीचा वापर केला. शब्दांची निवड करण्यात ते अत्यंत कुशल होते. त्यांनी आपल्या रचनांमध्ये शक्य तितक्या म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापरही केला. त्यांनी संस्कृत शब्दांसोबतच अरबी, फारसी, उर्दू आणि स्थानिक भाषेतील शब्दांचाही वापर केला. विविध भाषांच्या शब्दांच्या वापरामुळे त्यांची भाषाशैली अत्यंत प्रभावी बनली आहे.

बदरीनारायण चौधरी उपाध्याय "प्रेमघन"
बदरीनारायण चौधरी उपाध्याय ‘प्रेमघन’ हे देखील भारतेन्दु युगाचे आधारस्तंभ मानले जातात. ते कवी, गद्य लेखक आणि नाटककार होते. ते खडीबोली गद्याचे प्रथम आचार्य मानले जातात. त्यांनी कविता, निबंध, नाटक, समीक्षा आणि प्रहसन लिहून साहित्य जगात आपली एक ओळख निर्माण केली. त्यांच्या गद्य रचनांमध्ये विनोदाचा स्पर्श आढळतो. त्यांनी आपल्या रचनांमध्ये हिंदीसोबतच संस्कृत, फारसी, उर्दू आणि प्रादेशिक भाषांतील शब्दांचा भरपूर वापर केला. हिंदी समीक्षा आणि इतर गद्य प्रकारांच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
 

त्यांनी ब्रज भाषेत काव्य रचना केली. त्यांनी लोकगीत कजली, होळी आणि चैता इत्यादी लिहिले, जे खूप लोकप्रिय झाले. त्यांनी 'आनन्द कादम्बनी' या मासिकाचेही संपादन केले. नंतर त्यांनी 'नागरी नीरद' हे वृत्तपत्रही प्रकाशित केले. या पत्र-पत्रिकांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारांविरुद्ध, विशेषतः शेतकऱ्यांच्या व्यथेबद्दल, आवाज उठवला.

प्रतापनारायण मिश्र
प्रतापनारायण मिश्र हेही भारतेन्दु युगातील महत्त्वपूर्ण साहित्यिक आहेत. ते कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, निबंधकार आणि पत्रकार होते. त्यांना हिंदी खडीबोलीचे उन्नायक म्हटले जाते. त्यांनी आपल्या रचनांमध्ये खडीबोलीच्या रूपात प्रचलित असलेल्या जनभाषेचा वापर केला. त्यांची भारतेन्दु हरिश्चंद्र यांच्यावर अपार श्रद्धा होती. ते स्वतःला त्यांचे शिष्य म्हणत. त्यांच्या भाषाशैलीमुळे आणि इतर वैशिष्ट्यांमुळे त्यांना 'प्रतिभारतेन्दु' किंवा 'द्वितीयचन्द्र' म्हटले जाते.

त्यांनी 'ब्राह्मण' या मासिकाचे संपादन केले. यात त्यांनी समाजसुधारणा, देशप्रेम आणि इतर समकालीन विषयांवर लेख लिहिले.
 

राधाकृष्ण दास
राधाकृष्ण दास हेही भारतेन्दु युगातील महत्त्वपूर्ण साहित्यिकांपैकी एक आहेत. ते कवी, कादंबरीकार, नाटककार, निबंधकार आणि पत्रकार होते. ते भारतेन्दु हरिश्चंद्र यांचे आतेभाऊ होते. त्यांच्या मुख्य रचनांमध्ये धर्मालाप, दुःखिनी बाला, पद्मावती, नागरीदास का जीवन चरित, राजस्थान केसरी, महाराणा प्रताप सिंह नाटक इत्यादींचा समावेश आहे. ते प्रसिद्ध 'सरस्वती' पत्रिकेच्या संपादक मंडळात होते. ते नागरी प्रचारिणी सभेचे पहिले अध्यक्षही होते.

लाला श्रीनिवासदास
भारतेन्दु युगातील साहित्यिकांमध्ये लाला श्रीनिवासदास यांनाही एक विशेष स्थान प्राप्त आहे. ते नाटककार आणि कादंबरीकार होते. त्यांनी हिंदीतील पहिली कादंबरी लिहिली होती, त्यामुळे त्यांना हिंदीचे प्रथम कादंबरीकार मानले जाते. नाट्य-लेखनात ते भारतेन्दु हरिश्चंद्र यांच्या समकक्ष मानले जातात. त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये प्रह्लाद चरित्र, तप्ता-संवरण आणि संयोगता-स्वयंवर यांचा समावेश आहे. त्यांनी ‘परीक्षागुरु’ नावाची एक बोधप्रद कादंबरीही लिहिली.
 

अम्बिका दत्त व्यास
अम्बिका दत्त व्यास हेही भारतेन्दु युगातील प्रमुख कवी आणि नाटककार होते. काशी कविता वर्धिनी सभेने त्यांना 'सुकवि' या उपाधीने सन्मानित केले होते. त्यांनी 'वैष्णव' नावाचे नियतकालिक सुरू केले, जे नंतर 'पियूष-प्रवाह' नावाने साहित्यिक मासिकात रूपांतरित झाले. त्यांनी खडीबोलीत यमक आणि मुक्तछंद दोन्ही प्रकारच्या कविता लिहिल्या. ‘पावन पचासा’ ही त्यांची एक प्रमुख काव्यकृती आहे.

भारतेन्दु युगातील साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेसाठी संघर्ष केला आणि त्यांच्यात राष्ट्रीय चेतना निर्माण केली, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

(लेखिका शायरा, कथाकार आणि पत्रकार आहेत)
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter