जमात-ए-इस्लामी हिंदचे (JIH) राष्ट्रीय सचिव मौलाना शफी मदनी यांनी कपूरथळा, पठाणकोट आणि जालंधर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली
पंजाबमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले असून, हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत आणि मोठे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीने राज्याच्या १९ जिल्ह्यांना आपल्या कवेत घेतले असून, आतापर्यंत २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २.५ लाख लोकांना या पुराचा फटका बसला असून, हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत. या पुराने १,३६८ गावांचे मोठे नुकसान केले आहे आणि १.७६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याने, राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
या संकटकाळात, जाती-धर्माच्या भिंती तोडून, मानवतेच्या भावनेने विविध समाजघटक मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात मुस्लीम संघटना आणि व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. यात भर पडली आहे ती देशातील मुस्लिमांच्या सर्वांत मोठ्या संस्थेपैकी एक असलेल्या ऐतिहासिक जमियत ए उलेमा ए हिंदची.
जमात-ए-इस्लामी हिंदचे (JIH) राष्ट्रीय सचिव मौलाना शफी मदनी यांनी इतर नेत्यांसोबत कपूरथळा, पठाणकोट आणि जालंधर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. कोलिया गावात, पुराच्या पाण्यात ३० पक्की घरे वाहून गेली. या दुर्घटनेत तीन लहान भावंडांसह एका ७५ वर्षीय आजीचा, अशा एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दौऱ्यादरम्यान, जमात-ए-इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाने शीख समाजाचे नेते, नोडल अधिकारी आणि पूरग्रस्त गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या तातडीच्या गरजा जाणून घेतल्या. अन्न, निवारा, शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि कुटुंबांना त्यांचे जीवन पुन्हा उभे करण्यासाठी दीर्घकालीन पुनर्वसन उपायांवर या चर्चेत भर देण्यात आला.
जमात-ए-इस्लामी हिंद आणि 'सोसायटी फॉर ब्राईट फ्युचर'चे स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यात सक्रियपणे गुंतले असून, ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत, वैद्यकीय मदत देत आहेत आणि विस्थापित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.
"पूरग्रस्तांना होत असलेल्या त्रासामुळे आम्ही अत्यंत चिंतित आहोत. जमात-ए-इस्लामी हिंद, आमच्या भागीदार संघटनांसोबत मिळून, परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत अन्न, निवारा, आरोग्यसेवा आणि पुनर्वसन यांसारखी सर्व प्रकारची मूलभूत मदत करण्यास वचनबद्ध आहे," असे मौलाना शफी मदनी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "जमात-ए-इस्लामी हिंद पूरग्रस्त समाजाच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांच्या मदतीसाठी अथकपणे काम करेल. आम्ही सरकारलाही आवाहन करतो की, त्यांनी मदत वाटपाला गती द्यावी, प्रभावित भागांमधील पायाभूत सुविधा सुधाराव्यात आणि पीडितांना त्यांचे जीवन पुन्हा उभे करण्यासाठी योग्य नुकसान भरपाई जाहीर करावी."
मौलाना शफी मदनी यांनी सर्वसामान्यांना आणि हितचिंतकांनाही पुढे येऊन या संकटकाळात पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले.