मेवातचा 'तबलिगी इजतेमा' ठरला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
हरियाणाच्या तिरवाडा गावात पार पडलेल्या तबलिगी जमातच्या इस्लामिक मेळाव्यातील क्षण
हरियाणाच्या तिरवाडा गावात पार पडलेल्या तबलिगी जमातच्या इस्लामिक मेळाव्यातील क्षण

 

युनूस अल्वी

हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील छोटेसे गाव तिरवाडा सध्या चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारण म्हणजे, येथे आयोजित तबलिगी जमातचा तीन दिवसीय ऐतिहासिक इस्लामिक मेळावा (जलसा), ज्याने केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक दृष्ट्याही एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हा मेळावा केवळ एक धार्मिक आयोजन नव्हता, तर तो माणुसकी, प्रेम आणि बंधुभावाचा उत्सव बनला. लाखोंच्या गर्दीत ज्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून हे आयोजन यशस्वी केले, त्याने हे सिद्ध केले की मेवातची खरी ओळख द्वेष नसून प्रेम आहे.

अनेकदा मेवातबद्दल काही वर्गांकडून चुकीचे आणि वादग्रस्त चित्र उभे केले जाते. हा परिसर गुन्हेगारी, गोहत्या आणि सायबर गुन्ह्यांचा अड्डा बनला आहे, असे म्हटले जाते. पण हा मेळावा त्या सर्व भ्रमांना उत्तर म्हणून समोर आला. मेवातच्या मातीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, येथील गंगा-जमुनी संस्कृती आजही जिवंत आहे. इथे माणुसकी सर्वात मोठी आहे आणि येथील लोक शांतता व बंधुभावाचे खरे पाईक आहेत.

सकाळपासूनच तिरवाडा गावाच्या गल्ली-बोळात आणि रस्त्यांवर दूरदूरून येणाऱ्या लोकांची गर्दी उसळली होती. जसजसा दिवस चढत गेला, तसतसा मैदानात माणसांचा पूर येत गेला. चारी बाजूंनी येणारे आवाज – "अल्लाहु अकबर", "शांतता आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करा" – हवेत घुमत होते. या मेळाव्याचे सर्वात मोठे आकर्षण होते तबलिगी जमातचे आंतरराष्ट्रीय प्रमुख हजरत मौलाना साद साहेब.

d त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लाखो लोक तिरवाडा येथे पोहोचले. मौलाना साद साहेब आपल्या भाषणात म्हणाले की, "इस्लाम प्रेम आणि शांतीचा संदेश देतो. माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. जर हृदयांमध्ये द्वेषाऐवजी प्रेम वसले, तर पृथ्वी स्वर्ग बनेल." त्यांचे हे शब्द केवळ मुस्लिम समुदायाच्याच नव्हे, तर तेथे उपस्थित असलेल्या हिंदू समाजातील लोकांच्या हृदयालाही स्पर्शून गेले.

या मेळाव्याची एक वेगळी ओळख बनली "प्रेमाचा स्वाद" (मोहब्बत का जायका) – म्हणजेच हिंदू समाजाकडून बिर्याणीचा लंगर. नूहच्या पुनहाना शहरातील समाजसेवी राजेश गर्ग (त्रिलोक गर्ग यांचे पुत्र) यांनी मेळाव्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी शाकाहारी बिर्याणी आणि गोड भाताची (जर्दा) व्यवस्था केली होती. तिन्ही दिवस सुमारे शंभर मोठ्या पातेल्यांमध्ये बिर्याणी आणि जर्दा तयार करून लोकांना वाढण्यात आले.

s राजेश गर्ग यांनी सांगितले की, "मेवात असा परिसर आहे जिथे प्रत्येक धर्माचे लोक मिळूनमिसळून राहतात. जर कोणाकडे सण असेल, तर सर्वजण त्यात सहभागी होतात. हेच आमच्या भूमीचे सौंदर्य आहे. आम्ही विचार केला की, यावेळी आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांच्या मेळाव्यात सेवा करू, म्हणून तिन्ही दिवस बिर्याणी आणि जर्दा खाऊ घालणार आहोत." या बिर्याणीमध्ये 'लायशा बासमती' तांदळाचा वापर करण्यात आला होता, ज्याचा सुगंध आणि चवीने प्रत्येकाचे मन जिंकले.

राजेश गर्ग यांच्या या पुढाकाराने एका नव्या परंपरेची सुरुवात केली, जिथे धर्म नाही, तर माणुसकी सर्वात आधी आहे. याच प्रकारे, "बाम सैफ फाऊंडेशन" तर्फे लावण्यात आलेला "प्रेमाचा चहा" (मोहब्बत की चाय) स्टॉल संपूर्ण मेळाव्याची जान बनला होता.

या स्टॉलचे आयोजक समय सिंह सलंबा आणि विजय कुमार उजीना होते. समय सिंह यांनी सांगितले की, "आम्ही इथे केवळ चहा पाजण्यासाठी नाही, तर प्रेमाचा संदेश देण्यासाठी आलो आहोत. आमची इच्छा आहे की, जेव्हा-जेव्हा देशात हिंदू-मुस्लिम वादाच्या गोष्टी होतील, तेव्हा मेवातसारखे परिसर उदाहरण बनावेत. जिथे लोक धर्म नाही, माणूस पाहून प्रेम करतात." हजारो लोक या स्टॉलवर थांबून चहा पित होते, गप्पा मारत होते आणि बंधुभावाची ऊब अनुभवत होते.

d मेळाव्याच्या यशामागे केवळ समाजाची ताकदच नव्हती, तर प्रशासनाची सजगता आणि सहकार्यही कौतुकास्पद होते. मेळावा आयोजन समितीचे हजारो स्वयंसेवक मैदानात सक्रिय होते.

वाहतूक नियंत्रणापासून ते स्वच्छता, पाणी आणि विजेच्या व्यवस्थेपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. नूह प्रशासन आणि पोलिसांनी पूर्ण मेहनतीने कार्यक्रम सुरक्षित आणि शांततापूर्ण ठेवला. नगरपालिकेचे अध्यक्ष बलराज सिंगला स्वतः मैदानात राहून व्यवस्थेवर देखरेख करत होते. हरियाणा वक्फ बोर्डाचे प्रशासक चौधरी जाकिर हुसैन, पुनहानाचे माजी आमदार चौधरी रईस खान आणि भाजपचे उमेदवार राहिलेले चौधरी ऐजाज खान यांनीही स्थळावर पोहोचून तयारीचा आढावा घेतला आणि सहकार्याचे आश्वासन दिले.

तीन दिवसांपर्यंत तिरवाडाचे आकाश शांतता आणि एकतेच्या प्रार्थनांनी दुमदुमत राहिले. मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी लाखो हात एकाच वेळी वर उठले — हिंदुस्थानच्या सुरक्षिततेसाठी, प्रगतीसाठी आणि बंधुभावासाठी. त्या क्षणी कोणी धर्म पाहिला नाही, कोणी जात विचारली नाही. सर्वांच्या मनात केवळ एकच भावना होती — "आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व हिंदुस्तानी आहोत."

d मेळाव्यादरम्यान समाजसेवी संजय कुमार यांनी एक शेर वाचला, ज्याने संपूर्ण आयोजनाचे सारच  शब्दांत मांडले गेले  —

“ना हिंदू बुरा है, ना मुसलमान बुरा है,

ना गीता बुरी है, ना कुरान बुरी है,

ना भगवान बुरा है, ना अल्लाह बुरा है,

दिल के अंदर जो बैठा है, वही शैतान बुरा है.”

हा शेर ऐकून मैदान टाळ्यांनी गरजून उठले. हीच मेवातची विचारसरणी आहे, धर्म माणसाला जोडतो, तोडत नाही. लायशा बासमती तांदूळ कंपनीचे मालक संजीव गुप्ता हेही मेळाव्यात पोहोचले होते. ते म्हणाले, "मी अनेक ठिकाणी धार्मिक आयोजन पाहिले आहेत, पण मेवातसारखा बंधुभाव कुठेही पाहिला नाही. इथे लोक धर्माआधी माणुसकीला मानतात." त्यांचे म्हणणे होते की, हे आयोजन दाखवते की, जर हेतू स्पष्ट असेल तर धर्म भिंत नाही, तर पूल बनतो.

तिरवाडाचा मेळावा या अर्थाने ऐतिहासिक म्हणता येईल की, त्याने मेवातचे ते चित्र उजेडात आणले आहे जे अनेकदा लपवले जाते. येथील लोक मेहनती, प्रामाणिक आणि शांतताप्रिय आहेत. जर कुठे एखादा गुन्हा घडलाच, तर तो संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. हा मेळावा एक असा मंच बनला जिथून मेवातने देशाला हा संदेश दिला की प्रेम, सहकार्य आणि परस्पर आदरानेच भारताचा आत्मा जिवंत राहू शकतो.

d मेवातची माती नेहमीच बंधुभाव आणि प्रेमाचे प्रतीक राहिली आहे. इथे मंदिराच्या घंटा आणि मशिदीची अजान एकत्र घुमतात. इथे कोणतीही भिंत नाही, हृदयांना जोडणारे पूल आहेत. हेच कारण आहे की, जेव्हा देशाच्या अनेक भागांमध्ये धर्माच्या नावावर राजकारण होते, तेव्हा मेवातसारखे परिसर शांतता आणि एकतेचे प्रतीक बनून उभे राहतात.

तिरवाडा मेळाव्याने हे सिद्ध केले की, जेव्हा हृदयांमध्ये सत्य आणि हेतूंमध्ये चांगुलपणा असतो, तेव्हा धर्म कधीही विभाजनाचे कारण बनत नाही, उलट समाजाला जोडणारी ताकद बनतो. तीन दिवसांपर्यंत चाललेल्या शाकाहारी बिर्याणीचा सुगंध, जर्द्याची गोडी आणि प्रेमाच्या चहाच्या ऊबेने हा संदेश दिला की, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे.

आज मेवातचे हे उदाहरण केवळ संपूर्ण हरियाणासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनले आहे. द्वेष पसरवणाऱ्यांसाठी हा एक धडा आहे की, जर प्रेमाने जगले, तर प्रत्येक मेळावा शांततेचा संदेश बनू शकतो. मेवातच्या लोकांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे की, इथे द्वेषाला कोणतीही जागा नाही. इथे प्रत्येक धर्माचे फूल एकाच बागेत फुलते.

या ऐतिहासिक मेळाव्याच्या शेवटी जेव्हा लाखो लोक एकत्र उठले आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली, तेव्हा असे वाटले जणू संपूर्ण पृथ्वी म्हणत आहे — "ना हिंदू वाईट, ना मुसलमान वाईट; आपण सर्व एकाच देवाने निर्माण केलेल्या मानवतेची लेकरे आहोत."

समाज एकजूट होतो तेव्हा द्वेष हरतो आणि प्रेमाचा विजय होतो, हीच शिकवण तिरवाडा मेळाव्याने दिली. हे आयोजन धर्म जर माणुसकीशी जोडला गेला, तर पृथ्वी स्वर्ग बनते हा संदेश येणाऱ्या पिढ्यांना या मेळाव्यातून मिळालाय.  


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter