एआर रहमान जगातील सर्वात महान संगीतकारांपैकी एक - राम गोपाल वर्मा

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा,  संगीतकार ए आर रहमान
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, संगीतकार ए आर रहमान

 

नवी दिल्ली:

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (आरजीवी) यांनी संगीतकार एआर रहमान यांच्याबद्दलच्या आपल्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलंय. एआर रहमान हे केवळ जगातील सर्वात महान संगीतकारांपैकी एक नाहीत, तर मी भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वात विनम्र आणि चांगला माणूस आहेत, अशा शब्दांत वर्मा यांनी रहमान यांचं कौतुक केलंय. गेल्या काही दिवसांपासून आरजीवी यांचा एक जुना इंटरव्ह्यू सोशल मीडियावर चुकीच्या संदर्भाने व्हायरल होत असल्यामुळे त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

एआर रहमान यांनी नुकतंच एका मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील कामाच्या कमतरतेबद्दल आणि तिथे असलेल्या 'पॉवर शिफ्ट'बद्दल विधान केलं होतं. या विधानानंतर सोशल मीडियावर जुन्या वादांना उधाण आलं. याच दरम्यान राम गोपाल वर्मा यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ते ऑस्कर विजेत्या 'जय हो' गाण्याची मूळ धून गायक सुखविंदर सिंह यांनी तयार केल्याचं सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर रहमान यांच्यावर टीका होऊ लागली होती.

वाढता वाद पाहून राम गोपाल वर्मा यांनी स्वतः 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट लिहून आपली बाजू मांडली. "माझ्या जुन्या मुलाखतीचा चुकीचा अर्थ लावला जातोय. एआर रहमान हे कोणाचंही श्रेय लाटणारे व्यक्ती नाहीत. माझ्या नजरेत ते जगातील महान संगीतकार आहेत," असं वर्मा यांनी लिहिलंय. १९९५ मध्ये आलेल्या 'रंगीला' या सुपरहिट चित्रपटासाठी या दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि तिथूनच रहमान यांचा बॉलिवूडमधील प्रवास खऱ्या अर्थाने गाजला.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'युवराज' चित्रपटाच्या वेळचा एक किस्सा सांगितला होता. रहमान काम द्यायला उशीर करत असल्यामुळे सुभाष घई नाराज झाले होते. त्या दरम्यान लंडनहून आल्यावर रहमान यांनी सुखविंदर सिंह यांच्या स्टुडिओत एक धून ऐकली होती. पुढे हीच धून रहमान यांनी 'स्लमडॉग मिलियनेअर' चित्रपटातील 'जय हो' गाण्यासाठी वापरली आणि त्याचं मानधन सुखविंदर सिंह यांना पाठवून दिलं होतं. आरजीवी यांनी आता स्पष्ट केलंय की, हा केवळ एक कामाच्या पद्धतीचा किस्सा होता, रहमान यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता.