मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रदूषणाचा परिणाम

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रदूषणाचा परिणाम
मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रदूषणाचा परिणाम

 

टोरांटो (पीटीआय) : प्रदूषणयुक्त हवेत केवळ दोन तास थांबले तरी मानवी मेंदूवर परिणाम परिणाम होऊ शकतो, असे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. पर्यावरणाशी संबंधित एका नियतकालिकात हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला असून, प्रदूषणाचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामाबद्दल माहिती देणारा हा पहिलाच अहवाल असल्याचा दावा करण्यात येत आहे.

अभ्यासकांनी सर्वेक्षण आणि विविध प्रयोग करून हा अहवाल तयार केला आहे. हवेच्या प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असला तरी मेंदू त्यापासून संरक्षित असावा, असा शास्त्रज्ञांना वाटत होते. मात्र, प्रदूषणामुळे मेंदूचे कार्य मंदावते, असे दिसून आले आहे, असे कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक क्रिस कार्लस्टन यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेलच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या धुराच्या वातावरणात दोन तास उभे राहिल्यास मेंदूची शरीरातील इतर अवयवांबरोबर संपर्क साधण्याची कार्यक्षमता घटते.

असे केले संशोधन ?
संशोधकांनी २५ प्रौढ आणि सुदृढ व्यक्तींना डिझेलचा धूर मिसळलेल्या हवेत उभे केले. ही हवा टप्प्याटप्प्याने शुद्ध केली गेली. दरम्यानच्या काळात या व्यक्तींच्या मेंदूचे कार्य तपासले गेले. तसेच, स्मृती आणि विचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मेंदूच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या बदलाचेही विश्‍लेषण केले गेले. शुद्ध हवेत असताना मेंदूची कार्यक्षमता ही प्रदूषित हवेत असतानाच्या तुलनेत बरीच अधिक असल्याचे आढळून आले. हे बदल तात्पुरते असल्याची नोंदही अहवालात घेण्यात आली आहे. मात्र, सातत्याने प्रदूषित हवेत राहिल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर कायमस्वरुपी परिणाम होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हे सर्व प्राथमिक सर्वेक्षण असून याबाबत आणखी संशोधन होण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केली.