आशा खोसा
चार दिवस चाललेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे 2025 च्या भारताचे प्रतीक आहे. आता भारत दहशतवादासमोर शांतता टिकवण्याच्या जुन्या ओझ्याखाली दबलेला नाही. जवळपास चार दशके पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग करत भारताने थेट कारवाई केली. ‘घरात घुसून मारू’ हा भारताचा इरादा या कारवाईने अधोरेखित झाला.
यावेळी पाकिस्तानातील पंजाबमधील सर्वात मोठ्या दहशतवादी प्रशिक्षण आणि भरती केंद्रांवर मिसाइल हल्ले झाले. पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील इतर नऊ ठिकाणांवरही हल्ले झाले. ‘संरक्षणात्मक आक्रमण’ असे या हल्ल्याचे स्वरूप होते. या प्रकारच्या आक्रमणात धमकी देणाऱ्या शत्रूचा हल्ला होण्याची वाट न पाहता त्याच्या कमकुवत बिंदूंवर सक्रियपणे हल्ला चढवला जातो.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हा सिद्धांत मांडला होता. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोवाल यांना NSA म्हणून निवडले. 2024 मध्ये तिसऱ्या कार्यकाळातही मोदी यांनी डोवाल यांना निवृत्तीचा विचार सोडून काम सुरू ठेवण्यास सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’ने डोवाल यांच्या सिद्धांताला प्रत्यक्षात उतरवले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या पंजाबमधील दहशतवादी स्थळांवर हल्ला करत आपले सामर्थ्य दाखवले. मोदी यांचे ठाम राजकीय नेतृत्व आणि डोवाल यांची दूरदृष्टी या कारवाईचा कणा होता.
या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे मुरिदके प्रशिक्षण केंद्र आणि जैश-ए-मोहम्मदचे सुभान अल्ला केंद्र उद्ध्वस्त झाले. जिहादी दहशतवाद्यांना पोसून भारताविरुद्ध छुपे युद्ध करता येणार नाही. याचे परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट संदेशही पाकिस्तानला मिळाला.
पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास पाहता शनिवारच्या शस्रविरामानंतरही शांतता कितपत टिकेल हा प्रश्न आहेच. मात्र भारताने आपला मुद्दा स्पष्ट केला आहे. डोवाल यांनी तमिळनाडूच्या एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले होते, ‘भारताने संरक्षणात्मक पवित्र्याकडून संरक्षणात्मक आक्रमणाकडे पाऊल टाकले आहे. आता पाकिस्तानला कळेल की हे त्यांना परवडणार नाही. तुम्ही एक मुंबई करू शकता, पण बलुचिस्तान गमावाल."
पाकिस्तानी आता आपली उद्ध्वस्त हवाई तळे, दहशतवादी केंद्रे आणि पिचलेला स्वाभिमान पाहत असतील. जर त्यांच्याकडे अभिमान शिल्लक असेल तर.
‘ऑपरेशन सिंदूर’ हा मोजूनमापून केलेला हल्ला होता. हे युद्ध नव्हते. पाकिस्तान आणि भारतातील दहशतवाद्यांसमोर एक उदाहरण ठेवायचे होते. या कारवाईचा आकार आणि अचूकता यामुळे या हल्ल्यासमोर 2014 मधील पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून झालेला बालाकोट हल्ला ट्रेलर वाटला. त्या हल्ल्यात 44 CRPF जवानांनी प्राण गमावले होते. तेव्हा बालाकोटमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाले होते.
भारताचा संदेश स्पष्ट होता. त्यात पाश्चिमात्य प्रेक्षकांना खूश करण्याचा प्रयत्न नव्हता. सुरुवातीपासूनच भारतीय प्रवक्त्यांनी भारताची बाजू ठामपणे मांडली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताची संयमी परंतु ताकदवान प्रतिमा जगासमोर योग्यप्रकारे मांडली.
‘आम्हाला तणाव वाढवायचा नाही’, हा पवित्रा या तिघांनी सातत्याने घेतला. पाकिस्तानमधील कारवाईदरम्यान नागरी नुकसान टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, असे त्यांनी अधोरेखित केले. भारत पाकिस्तानच्या तुलनेत नैतिकदृष्ट्या वरचढ ठरला. ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी त्यांनी दिलेल्या माहितीत एक संकेत दडलेला होता. काम पूर्ण झाल्यावर भारत कारवाई थांबवेल. पण पाकिस्तानने आगळीक केली नाही तरच.
त्यांनी स्पष्ट केले की ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पाकिस्तानी जनता किंवा राज्याविरुद्ध नव्हते. भारताला हानी पोहोचवणाऱ्या दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध होते. पण चार दिवसांच्या वेगाने बदलणाऱ्या घटनांच्या कालमर्यादेवरून हे स्पष्ट झाले की भारतीय सशस्त्र दलांनी मर्यादित संघर्षाचा उपयोग करून पाकिस्तानवर मोठी किंमत लादली. त्यांची चार हवाई तळे उद्ध्वस्त केली.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासाठी मध्यस्थी केली. नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये युद्धविराम जाहीर होण्याच्या काही तास आधी भारतीय लष्कर आणि BSF ने अनेक लॉन्चिंग पॅड्स नष्ट केली. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरून भारतात पाठवण्यापूर्वी दहशतवाद्यांना इथे आश्रय दिला जातो.
भारतीय टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मीडियावर दावे आणि प्रतिदावे जोरात सुरू होते. पण भारत आपल्या लक्ष्यावर आणि भुमिकेविषयी स्थितप्रज्ञ राहिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईबाबत एकही शब्द उच्चारला नाही. हल्ल्याचे मर्यादित स्वरूप असल्याने त्यांनी आपले नेहमीचे काम सुरू ठेवले. त्यांचा हा संयम पाकिस्तानी युद्धकक्षात खळबळ माजवणारा ठरला असावा.
भारताचा हल्ला पाकिस्तानच्या ढोंगाला भेदणारा ठरला. सशस्त्र संघर्षासाठी त्यांची तयारी पाहून पाकिस्तानला धक्का बसला. पाकिस्तानी हवाई दलाचे माजी एअर व्हाइस मार्शल इकरामतुल्ला भट्टी यांनी BBC ला सांगितले की. ‘भारतीय हल्ल्याला प्रतिकार करण्याची क्षमता पाकिस्तानकडे नाही.’
ते म्हणाले, "पाकिस्तानकडे आकाशातून येणारी मिसाइले रोखण्याची क्षमता नाही. पाकिस्तानकडे HQ-9 आणि HQ-16FE यंत्रणा आहे. ती जमिनीवरून सोडलेल्या मिसाइल किंवा लढाऊ विमानांविरुद्ध काम करते. पण आकाशातून येणारी मिसाइले रोखण्याची क्षमता नाही. हे सुपरसॉनिक मिसाइल ताशी 3,675 ते 11,000 किमी वेगाने प्रवास करते. इतक्या वेगाने येणारी मिसाइल शोधणे, लक्ष्य करणे आणि नष्ट करणे सोपे नाही. जमिनीवरून सोडली असती तर जास्त वेळ लागला असता. पण आकाशातून येताना प्रतिसाद द्यायला वेळ खूप कमी मिळतो."
‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या नव्या क्षमतांचीही चाचणी घेतली. यात हवाई संरक्षण यंत्रणांचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलाने पश्चिम क्षेत्रातील भारतीय शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. हे हल्ले मुख्यतः नागरिकांना लक्ष्य करणारे होते. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले निष्फळ केले. यात रशियाकडून मिळालेल्या S-400 यंत्रणेचा समावेश होता. देशांतर्गत आणि पाश्चिमात्य गटाकडून राजकीय विरोध असतानाही भारताने यंत्रणा मिळवली होती.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये युद्धविरामाच्या एका तासातच पाकिस्तानने तो तोडला. भारतातील दहशतवाद संपवण्याबाबत पाकिस्तान गंभीर आहे का, हा खरा चिंतनाचा विषय आहे. भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाची कृती मानण्याचा अधिकार भारताने राखून ठेवला आहे. त्यामुळे आता शांतता टिकवण्याची जबाबदारी आहे ती पाकिस्तानवर!
(लेखिका 'आवाज द व्हॉइस'च्या इंग्लिश पोर्टलच्या संपादिका आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -