रामकुमार कौशिक
भारतीय उपखंडातील भूराजकीय परिस्थिती सतत बदलत आहे. अशा वेळी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे स्वरूप अजित डोवाल यांच्या ‘संरक्षणात्मक आक्रमण’ या रणनीतीनुसार पूर्णपणे बदलले आहे. ही रणनीती स्पष्टता, धाडस आणि धोरणात्मक दूरदृष्टीवर आधारित आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून डोवाल यांनी 2014 मध्ये पंतप्रधान कार्यालयात प्रवेश केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाम सुरक्षा दृष्टिकोनाला त्यांनी प्रत्यक्षात आणले आहे. या रणनीतीमुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका निष्क्रिय संरक्षणापासून सक्रिय प्रतिबंधाकडे बदलली आहे. अनेक प्रसंगी या रणनीतीची परिणामकारकता दिसून आली आहे.
नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाने हा बदल ठळकपणे अधोरेखित झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई सुरू झाली. सीमेपलीकडील 9 दहशतवादी तळांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले करून त्यांचे नेतृत्व आणि पायाभूत सुविधा नष्ट केल्या. ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर एक भूराजकीय संदेश होता. काही दिवसांतच पाकिस्तानला आपली किंमत परवडणारी नसल्याचे समजले आणि त्यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव पुढे केला.
या बदलामागे डोवाल यांची धोरणात्मक कुशाग्रता आहे. जोडीला त्यांना पंतप्रधान मोदी यांचा ठाम राजकीय पाठिंबा मिळाला. भूराजकीय विश्लेषकांचे एकमत आहे की मोदी यांचा डोवाल यांच्यावर पूर्ण विश्वास आणि पाठिंबा यामुळे अशा कठीण लक्ष्यांवर हल्ला करणे शक्य झाले. देशात मोदी यांची लोकप्रियता आणि जागतिक पातळीवर वाढते स्थान यामुळे भारताला अशा उच्च जोखमीच्या कारवायांमध्ये फायदा झाला.
संरक्षणात्मक आक्रमणाचा गाभा
डोवाल यांच्या रणनीतीचा मुख्य आधार सक्रिय प्रतिबंध आहे. भारत आता दहशतवादी हल्ले आपल्या सीमेत होण्याची वाट पाहत नाही. तर आता तो दहशतवादाच्या मुळांवरच हल्ला करतो. बऱ्याचदा तर सीमेपलीकडे जाऊन. ही रणनीती पहिल्यांदा 2016 मधील उरी हल्ल्याच्या सर्जिकल स्ट्राइक्सद्वारे दिसली. नियंत्रण रेषेपलीकडील लॉन्च पॅड्सवर हल्ले झाले. 2019 मधील बालाकोट हवाई हल्ल्यांद्वारे ही रणनीती परिपक्व झाली. तेव्हा जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात खोलवर हल्ला झाला.
‘ऑपरेशन सिंदूर’ (2025) ही या रणनीतीची नवीन पायरी आहे. ड्रोन समूह आणि लांब पल्ल्याच्या अचूक मार्गदर्शित शस्त्रांचा वापर करून भारताच्या सशस्त्र दलांनी दहशतवादी नेतृत्व आणि पायाभूत सुविधा नष्ट केल्या. यात कमीत कमी नागरी नुकसान झाले. एका संरक्षण विश्लेषकाने सांगितले, "डोवाल यांच्या स्पष्टतेमुळे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अभूतपूर्व गुप्तचर समन्वय आणि अचूकता दिसली."
या रणनीतीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे शत्रूवर धोरणात्मक खच्चीकरण. भारताने बलुच प्रतिकारासारख्या अंतर्गत चळवळींना सूक्ष्मपणे पाठिंबा दिला. पाकिस्तानच्या आर्थिक दुर्बलतेचा धोरणात्मक आणि माहिती युद्धाद्वारे फायदा घेतला. भारत नियंत्रितपणे तणाव वाढवत थेटपणे कारवाई करतो, पण अण्वस्त्रांची सीमारेषा पाळतो हा संदेश यातून गेला.
डोवाल यांच्या शब्दांत सांगायचे तर, "संरक्षणात्मक आक्रमण म्हणजे जिथून आक्रमण सुरू होते तिथे हल्ला करणे. शत्रूला हा आक्रमकपणा समजला तर त्याच्या लक्षात येते की आता कुरापत काढणे परवडणारे नाही.’
परिणामकारकता झाली अधोरेखित
या रणनीतीचे यश आकडेवारीत आणि धोरणात्मक परिणामांत दिसते. उरी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या घटना 60% नी कमी झाल्या. बालाकोटने पाकिस्तानच्या अण्वस्त्र प्रतिरोधाचा भ्रम नष्ट केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ने नऊ दहशतवादी तळांचा नाश केला. अनेक महत्त्वाचे दहशतवादी मारले गेले. त्यावर भारतविरोधी तीव्र आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत.
डोवाल यांची रणनीती हायब्रीड आणि चौथ्या पिढीच्या युद्ध शास्त्राचा अवलंब करते. त्यात सायबर कारवाया, गुप्तचर-आधारित लक्ष्यभेद, उपग्रह निरीक्षण आणि प्रगत ड्रोन क्षमता यांचा वापर होतो. यामुळे भारताला अचूकपणे आणि गरज पडल्यास नाकारता येण्याजोगी कारवाई करता येते.
तंत्रज्ञानाची उपलब्धता, राजनैतिक पाठिंबा आणि जागतिक स्वीकारहर्ता
भारताची वाढलेली लष्करी क्षमता यावेळी महत्त्वाची ठरली. स्पाइस-2000 अचूक बॉम्ब आणि रिअल-टाइम ड्रोन ISR (गुप्तचर, निरीक्षण, पुनर्जनन) यंत्रणांमुळे सर्जिकल स्ट्राइक्स अधिक अचूक आणि टिकाऊ झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान अमेरिका, इस्रायल, UAE, फ्रान्स आणि रशियासोबत रिअल-टाइम गुप्तचर माहिती शेयर केल्याने भारताला जलद आणि अचूक कारवाई करता आली.
त्याच वेळी भारताने आपले वाढते राजनितिक वजन वापरले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादातील सहभागाचे ठोस पुरावे सादर केले. प्रमुख देशांकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला. आता जागतिक नियम पूर्वानुमानात्मक आत्मसंरक्षणाला वैध मानतात. ही भारताच्या सुरक्षा रणनीतीचा मोठा विजय आहे.
दक्षिण आशियाई धोरणात्मक गतिशीलतेत परिवर्तन
डोवाल यांच्या धोरणामुळे प्रादेशिक स्थैर्यावरही परिणाम झाला आहे. संरक्षणात्मक आक्रमण रणनीती स्वीकारल्यापासून पाकिस्तानला राजनैतिक फुटीरतावाद आणि अंतर्गत असंतोषाचा सामना करावा लागला. सीमेपलीकडील दहशतवादी प्रयत्न कमी झाले. पाकिस्तानला असममित युद्धातून मिळणारा पारंपरिक फायदा कमी होत आहे.
याविषयी एक वरिष्ठ सुरक्षा विश्लेषकाने सांगितले, "डोवाल यांच्या रणनीतीने दक्षिण आशियातील समीकरणे बदलली आहेत. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना आता या कृत्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे."
या रणनीतीची तुलना इस्रायलच्या सक्रिय दहशतवादविरोधी रणनीती आणि अमेरिकेच्या 9/11 नंतरच्या रणनीतीशी केली जाते. पण भारताची आवृत्ती नियंत्रित आहे. ती दीर्घकालीन गुंतवणूक किंवा अनियंत्रित तणाव टाळते. कारवाईदरम्यान अमेरिका आणि चीनसारख्या देशांशी धोरणात्मक संवाद ठेवला जातो. यामुळे लष्करी कारवाया पारंपरिक किंवा अण्वीक युद्धात बदलत नाहीत.
कायमस्वरूपी वारसा
अजित डोवाल यांची संरक्षणात्मक आक्रमण रणनीती आता फक्त रणनीती राहिलेली नाही. ती भारताच्या सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षा संरचनेचा कणा बनली आहे. ही नव्या युगाची नांदी आहे. भारत आता निष्क्रिय राहत नाही, तर तो सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो, हे यातून अधोरेखित होत आहे.
येत्या काळात ‘ऑपरेशन सिंदूर’ हा अभ्यासाचा विषय ठरेल. गुप्तचर-आधारित, नियोजित आणि सक्रिय कारवाईने राज्य-प्रायोजित दहशतवादाला पारंपरिक राजनैतिक किंवा निष्क्रिय संरक्षणापेक्षा प्रभावीपणे रोखता येते, आदी बाबी या अभ्यासातून अधिक स्पष्टपणे पुढे येतील.
याविषयी एक रणनीती तज्ज्ञ म्हणाले, "शत्रूसाठी आता भारताविरुद्ध असममित युद्ध करणे खूप खर्चिक झाले आहे. डोवाल यांच्या रणनीतीने आपली परिणामकारकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे."