जगाने आमचा पराक्रम आणि संयम पाहिला – पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 6 h ago
देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी
देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी

 

नवी दिल्ली

भारत-पाक संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर त्यांनी देशाच्या ठाम दहशतवादविरोधी धोरणाबाबत आणि सैन्याच्या पराक्रमाबाबत महत्त्वाचे विधान केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 7 मे रोजी सुरू झालेल्या या कारवाईने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त केले. पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय सैन्याला आणि देशातील एकजुटीला दिले. त्यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला कठोर इशारा देत भारताची भविष्यातील भूमिका स्पष्ट केली.

ऑपरेशन सिंदूर यशस्वी
देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, "जगाने आमचा पराक्रम आणि संयम पाहिला."त्यांनी सशस्त्र दलांच्या पराक्रमाला सलाम केला.विशेष म्हणजे, त्यांनी हे यश देशातील महिलांना समर्पित केले. देशातील महिलांना हा पराक्रम समर्पित करत असल्याचेत्यांनी सांगितले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या उद्दिष्टांबाबत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की ही कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली."ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट पूर्ण झाले," असे त्यांनी नमूद केले. या कारवाईत सीमेपलीकडील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून त्यांचे नेतृत्व आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या. या हल्ल्यांत 100हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे त्यांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्याचा कट आणि देशाची एकजूट
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना हा हल्ला देशातील सलोखा तोडण्याचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले."पहलगाम हल्ला देशातील सलोखा बिघडवण्याचा घृणास्पद कट-कारस्थान होता," असे त्यांनी स्पष्ट केले. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार ठरवले होते.

या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना देश एकजुटीने उभा राहिला, यावर पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले."प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कारवाईसाठी एकजुटीने उभा राहिला," असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले, "देश एक झाला, राष्ट्र सर्वोपरि झाले तर निर्णय पोलादी होतात."देशातील एकजुटीमुळे ठाम कारवाई करणे शक्य झाले, असे ते म्हणाले..

दहशतवाद्यांना कठोर इशारा
पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संघटनांना कठोर इशारा दिला. त्यांनी सांगितले, "आमच्या मुलींचे सिंदूर मिटवण्याचा काय परिणाम काय होतो हे आज प्रत्येक दहशतवादी आणि दहशतवादी संघटना यांना समजले आहे."त्यांनी या कारवाईला न्यायाची प्रतिज्ञा संबोधले."ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे," असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

या कारवाईत नष्ट करण्यात आलेली दहशतवादी ठिकाणे ही जागतिक दहशतवादाची केंद्रे होती, असे पंतप्रधानांनी सांगितले."दहशतवादी ठिकाणे ही जागतिक दहशतवादाची विद्यापीठे होती," असे ते म्हणाले. या हल्ल्यांनी दहशतवाद्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पाकिस्तानला ठाम संदेश
पंतप्रधानांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले. त्यांनी सांगितले, "दहशतवादाचे मास्टरमाइंड पाकिस्तानात मोकाट फिरत होते."पण या कारवाईने त्यांच्या निश्चयावर पाणी फिरवले."जगाने पाहिले की पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइले भारतासमोर काड्यांसारखे मोडून पडले" असे त्यांनी ठामपणे सांगितले.

भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला.भारताच्या मिसाइलांनी अचूक हल्ले केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले."भारताने तीन दिवसांत पाकिस्तानचा इतका विध्वंस केला ज्याचा त्यांना अंदाजही नव्हता," असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानला शस्त्रविरामासाठी विनंती करावी लागली, याचा खुलासा करताना पंतप्रधानांनी सांगितले, "पूर्णपणे पराभूत झाल्यावर पाकिस्तानी सैन्याने आमच्या DGMO ला फोन केला."ते पुढे म्हणाले,"जेव्हा पाकिस्तानने विनवणी केली आणि पुढे दहशतवादी कारवाया किंवा लष्करी दुस्साहस दाखवणार नाही, असे सांगितले तेव्हा आम्ही कारवाई थांबवली," असे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातही कारवाईचा इशारा
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की ही कारवाई सध्या थांबवली आहे, पण भारताची पाकिस्तानवर नजर कायम राहील."आम्ही आमची कारवाई सध्या फक्त रोखली आहे, पण पाकिस्तानवर आमची नजर राहील," असे त्यांनी सांगितले. त्यांनी कठोर इशारा देताना नमूद केले, "जर पुढे कधी भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर पुन्हा ठाम प्रत्युत्तर दिले जाईल."

पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा बागलबुआ भारत सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले."यापुढे आम्ही अण्वस्त्रांचे ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दहशतवादाचा नव्हे शांततेचे युग
पंतप्रधानांनी दहशतवाद आणि शांततेबाबत आपली भूमिका मांडली."हा काळ युद्धाचा नाही, पण हा काळ दहशतवादाचाही नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले. पाकिस्तानला इशारा देताना ते म्हणाले, "पाकिस्तान ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालत आहे, एक दिवस तोच दहशतवाद त्याला नष्ट करेल."

त्यांनी दहशतवाद आणि इतर बाबी एकत्र चालू शकत नाहीत, असे ठामपणे सांगितले."दहशतवाद आणि संवाद, दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत," असे त्यांनी नमूद केले."तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही," असे सांगत त्यांनी पाकिस्तानच्या सिंधू जल करारातील भूमिकेवरही भाष्य केले.

पाकिस्तानशी चर्चेचा मुद्दा स्पष्ट करताना पंतप्रधानांनी सांगितले, "जर पाकिस्तानशी चर्चा होईल तर ती दहशतवाद आणि PoK वरच होईल."

शांततेसाठी शक्ती आवश्यक
शांततेसाठी शक्तिशाली असण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला."शांततेसाठी शक्तिशाली असणे अत्यंत गरजेचे आहे," असे त्यांनी सांगितले. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आपली ताकद आणि संयम दाखवला, पण भविष्यात दहशतवादाला थारा देणाऱ्यांना ठाम प्रत्युत्तर मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.