पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करताना भारताने दाखवलेली अचूकता ही आपल्या गुप्तचर यंत्रणेची ताकद दाखवते. ‘गिडियन्स स्पाइज: दि सीक्रेट हिस्ट्री ऑफ दि मोसाद’ या पुस्तकात लेखक गॉर्डन थॉमस म्हणतात, “माहिती हेच शस्त्र आहे, जे युद्धाचा निकाल ठरवते.” ही साधी गोष्ट खास व्यक्तीच्या तोंडून खास बनते. या उक्तीच्या आधारे ‘ऑपरेशन सिंदूर’कडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. या मोहिमेचा मुख्य हेतू होता पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट करणे. यात भारताला शंभर टक्के यश मिळाले. यामागे कारण होते अचूक माहिती आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नेतृत्व. त्यांनी दहशतवादाविरुद्ध भारताची धोरणे पूर्णपणे बदलली.
११ मे रोजी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑपरेशनची माहिती दिली. लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई दलाचे डीजीएओ एअर मार्शल ए.के. भारती, नौदलाचे डीजीएनओ व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद आणि मेजर जनरल एस.एस. शारदा यांनी सांगितले की, ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले असून ही तळं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
अचूक माहिती, परफेक्ट प्लॅनिंग
भारताकडे अनेक दहशतवादी तळांची माहिती होती. पहलगाम हल्ल्यानंतर काही तळ रिकामे झाल्याचेही समजले होते. तरीही भारताने फक्त त्या नऊ तळांवर हल्ला केला, जिथे दहशतवादी असण्याची शक्यता जास्त होती. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली, अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखालील गुप्तचर यंत्रणा इतकी मजबूत आहे की ती ठोस कारवाईसाठी पुरेशी माहिती पुरवते. दुसरे, ही यंत्रणा सतत कार्यरत असते. अन्यथा पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांत इतकी अचूक कारवाई शक्य झाली असती का?
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जैश-ए-मोहम्मदचे चार, लष्कर-ए-तैयबाचे तीन आणि हिजबुल मुजाहिदीनचे दोन तळ उद्ध्वस्त झाले. यात बहावलपुरमधील जैशचे ‘मरकज सुभान अल्लाह’, मुरीदके येथील लष्करचे ‘मरकज तैयबा’ (जिथे मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना प्रशिक्षण मिळाले), तहरा कलांमधील जैशचे ‘सरजल’ (पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र), सियालकोटमधील हिजबुलचे ‘महमूना जोया’ (पठानकोट हल्ल्याची योजना आखली गेली), जैशचे ‘मरकज अब्बास’ (फिदायीन हल्लेखोर तयार करणारे), आणि मुजफ्फराबादमधील लष्करचे ‘शावई नाला’ (पहलगाम हल्लेखोरांचे प्रशिक्षण केंद्र) यांचा समावेश होता. बहावलपुरच्या ‘सुभान अल्लाह’ तळावरील हल्ल्यात मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जण ठार झाले. यावरून भारताची माहिती किती अचूक होती, हे दिसते.
मोठे दहशतवादी ठार
या कारवाईत सुमारे शंभर दहशतवादी ठार झाले. यात लष्करचा अबू जुंदाल (अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना प्रशिक्षण देणारा), जैशचा यूसुफ अझहर (आयसी-८१४ विमान अपहरणाचा मास्टरमाइंड), जैशच्या बहावलपुर तळाचा प्रमुख हाफिज मोहम्मद जमील (मसूद अझहरचा मेहुणा), लष्करचा खालिद उर्फ अबू आकाश (जम्मू-काश्मीर हल्ले आणि अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्र तस्करी), जैशचा मोहम्मद हसन खान (पाकव्याप्त काश्मीरमधील ऑपरेशन कमांडर) आणि लष्करचा अब्दुल मलिक रऊफ यांचा समावेश होता. आणखी मोठे दहशतवादी ठार झाले असण्याची शक्यता आहे. त्यांची नावे कदाचित कधीच समोर येणार नाहीत. पण पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांना मोठा फटका बसला आहे.
डोवाल यांचा मास्टरस्ट्रोक
अजित डोवाल यांनी दहशतवादाविरुद्ध भारताची रणनीती बदलली आहे. आता भारताची नीती ‘कागदपत्रे नंतर दे, प्रत्यक्ष कारवाई आधी कर अशी झाली आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइक, २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमधील हवाई हल्ला आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला यात भारताने दाखवून दिले की, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल.
डोवाल यांनी पाकिस्तानात अनेक वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले. कहुटामधील अणुकार्यक्रमाची माहिती त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने मिळवली होती. पाकिस्तानच्या सत्तास्थान आणि दहशतवाद यांच्या संगनमताचा पद्धतशीर अभ्यास त्यांनी केला होता. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध भारताची रणनीती यशस्वी ठरली आहे. १९८८ मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धच्या ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’चे नेतृत्व, १९९९ मध्ये कांधार विमान अपहरणातील मुख्य वाटाघाटी, २०१४ मध्ये इराकमधून ५४६ भारतीय नर्सांची सुटका, २०१५ मध्ये म्यानमारमधील एनएससीएन दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई आणि २०१७ मध्ये डोकलाममधील चिनी घुसखोरीला कूटनीतीने थांबवणे हा डोवाल यांचा हा पराक्रम आहे. त्यांच्या कामाच्या अनेक गोष्टी कदाचित कधीच समोर येणार नाहीत.
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून इस्लामाबादला स्पष्ट संदेश दिला आहे की दहशतवादी हल्ले करून तुम्ही सुटणार नाही. डोवाल यांच्या सैन्य, गुप्तचर आणि रणनीती यांचा एकत्रित वापर करणारी ‘आक्रमक संरक्षण’ रणनीती यशस्वी ठरली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान डोवाल किती तास झोपले, हे कदाचित कधीच कळणार नाही. पण पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना एक गोष्ट नक्की कळली असेल आता दहशतवादी हल्ल्यानंतर या हल्ल्याशी संबंधित लोकांना कायमचे झोपवले जाण्याची शक्यता वाढली आहे.
- अरविंद