हल्ल्याच्या भीतीनेच पाककडून अमेरिकेला संपर्क

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या केलेल्या आगळिकीनंतर लष्कर आणि हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये लक्ष्यभेदी कारवाई करताना दहशतवाद्यांचे तळ नष्ट करतानाच काही हवाई तळही नष्ट केले. पाकिस्तानविरोधात जोरदार कारवाई सुरू असताना अचानक शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. इतक्या वेगाने घडलेल्या या घडामोडींबाबत भारत सरकार अथवा संरक्षण दलांनीही गोपनीयतेच्या कारणास्तव पूर्ण माहिती दिलेली नाही. मात्र, भारताकडून मोठा हल्ला होण्याच्या भीतीनेच पाकिस्तानने युद्ध थांबविण्याची विनंती केल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने अचूक वेध घेत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे मोठे तळ नष्ट केल्यानंतरही भारतावर ड्रोन हल्ल्यांचा मारा झाला. त्यामुळे आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी हवाई दलाने आपल्या सामर्थ्यांची चुणूक दाखविताना पाकिस्तानमधील महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ले करत त्यांचे मोठे नुकसान केले. हे हल्ले करताना भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा अंदाज आहे. मात्र, हवाई दलाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजच्या किंवा मागील दोन-तीन दिवसांतील कारवाईदरम्यान कोणत्या अवांचा वापर केला, हे सांगण्यास नकार दिला.

भारताच्या या अचूक हल्ल्यानंतर आता पुढील हल्ला अण्वस्त्र नियंत्रण कक्षावर होणार असल्याचा संदेश पाकिस्तानमधील संरक्षण दलांमध्ये पसरल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणेना समजले. ही शंका येताच पाकिस्तानचे उसने अवसान गळून त्यांनी अमेरिकेशी संपर्क साधत मध्यस्थी करण्याची गळ घातली. 

जाहीरपणे तटस्थ भूमिका येणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः आदेश देत भारताशी तातडीने अधिकृत हॉटलाइनवर संपर्क साधण्यास बजावल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पाकिस्तानचे लष्करी कारवाईचे प्रमुख (डीजीएमओ) मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांनी भारताचे 'डीजीएमओ' लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्याशी संपर्क साधला. उच्चस्तरीय चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी हल्ले करण्याचे थांबवले असले तरी पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.

अणुकेंद्राला धक्का ?
दलाने शनिवारी सकाळी केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सरगोधाजवळील आण्विक केंद्राजवळही हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये या केंद्राचे नुकसान झाले आणि नुकसान मर्यादित राहावे, यासाठी अमेरिकेचे विमान पाकिस्तानमध्ये पोहोचल्याची चर्चा रविवारी दिवसभर सोशल मीडियावर होती. मात्र, अमेरिका किंवा कोणत्याही देशाकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 

या स्फोटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हवाई तळावर हल्ले झाल्याचे सांगत काही तरुण पळत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या किराना टेकड्यांच्या परिसरामध्ये पाकिस्तानचे आण्विक केंद्र असून, तेथे काही अण्वस्त्रेही असल्याचे सांगण्यात येते. हा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग असून, तेथे भूमिगत आण्विक केंद्रे असल्याचीही चर्चा आहे. या केंद्राच्या भुयारांवर हल्ले झाल्याचे काही 'एक्स' अकाउंटवर म्हटले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter