‘१९७१ च्या युद्धात पाकिस्तानला मोठी शरणागती पत्करावी लागली होती. तेव्हा आपण त्यांच्या ९० हजारांहून अधिक सैनिकांना सोडले होते. तरीही ते आजही तसचं वागतात. कितीही प्रयत्न केले, तरी कुत्र्याची शेपटी वाकडीच राहते,” अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर टीका केली. पुण्यात रविवारी आयोजित एका सांगीतिक कार्यक्रमात ते बोलत होते.
संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला जावेद अख्तर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. “हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा देशातील परिस्थिती वेगळी होती. आता ती बदलली आहे,” असे त्यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्याने देश हादरला असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर प्रकाश पडला आहे.”
जावेद अख्तर यांनी १९७१ च्या युद्धाचा उल्लेख करत पाकिस्तानच्या सततच्या आगळीकांवर बोट ठेवले. त्या युद्धात भारताने विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या सैनिकांना शरण यावे लागले होते. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना सोडले. पण इतके करूनही पाकिस्तानची वृत्ती बदलली नाही. दहशतवादाला खतपाणी घालण्याचे त्यांचे धोरण कायम आहे. अख्तर यांनी कुत्र्याच्या वाकड्या शेपटीची उपमा देत पाकिस्तानच्या या स्वभावावर मार्मिक टिप्पणी केली.
कार्यक्रमात अख्तर यांनी चित्रपटसृष्टीवरही मिस्कील भाष्य केले. ते म्हणाले, “पूर्वीच्या चित्रपटांमध्ये दुःखी गाणी असायची. आता एकही दिसत नाही. खरंच कदाचित ‘अच्छे दिन’ आले असावेत.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter