नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध - उमर अब्दुल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जम्मू-काश्मीरमध्ये सीमाभागातील रहिवाशांनी जवळपास आठवड्यानंतर शनिवारी रात्री पहिल्यांदाच शांतता अनुभवली. सातत्याने लढाऊ विमानांचा, ड्रोनचा, गोळीबाराचा आणि क्षेपणास्त्रांचा येणारा आवाज यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील नागरिकांनी अत्यंत अस्वस्थतेत आणि दहशतीखाली रात्री घालवल्या आहेत. शनिवारी रात्री हे सर्व आवाज थांबल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शनिवारी रात्री अकरानंतर सीमाभागात गोळीबार, क्षेपणास्त्र व ड्रोनचा आवाज ऐकू आला नाही. संध्याकाळी मात्र सीमाभागात ड्रोन घिरट्या घालत होती.

नागरिकांशी संवाद
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगर येथे रविवारी, जम्मू-काश्मीरमधील विविध समुदाय, धार्मिक नेते आणि व्यावसायिकांशी चर्चा करून राष्ट्रीय ऐक्य टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे धार्मिक सलोखा बिघडविण्यासाठी रचण्यात येणाऱ्या विविध कटकारस्थानांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. "सामाजिक सौहार्द टिकवणे आणि आपल्या सैनिकांचे मनोबल उंचावणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे," असे मत नायब राज्यपाल सिन्हा यांनी व्यक्त केले. 

तर राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिले. "जम्मू-काश्मीरमधील रुग्णालयातील जखमींच्या रांगा, तात्पुरत्या निवारा केंद्रांत जमलेले आमचे कुटुंबीय, ढिगाऱ्यांत रूपांतरित झालेली आमची घरे यामुळे आम्हाला युद्ध नकोय. युद्धाची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना आमच्या लहानग्यांचे रडणे, येथील नागरिकांच्या मनातील भीती हे समजू शकत नाही. आम्हाला घरे हवी आहेत बंकर नकोत, असे मतही उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter