तीन पिढ्यांपासून कृष्णाचा पोशाख बनवणारे मथुरेतील मुस्लिम कुटुंब

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 13 d ago
हातानेच डिझाईन बनवताना कारागीर
हातानेच डिझाईन बनवताना कारागीर

 

प्रज्ञा शिंदे,
 
उत्तर प्रदेशातील मथुरा शहर, जे आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. मथुरेत हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. येथे मुस्लिम होळीच्या दिवशी एकमेकांना गुलाल लावतात आणि जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णासाठी अन्न तयार करतात. याच मथुरेत जन्माष्टमीनिमित्त पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उत्कृष्ट उदाहरण सादर होत आहे. येथील एक मुस्लिम कुटुंब, मोहम्मद इकरार यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या ५० वर्षांपासून भगवान श्रीकृष्णासाठी आकर्षक पोशाख तयार करत आहे. हे पोशाख १० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत विकले जातात, आणि केवळ मथुरेतच नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांची मोठी मागणी आहे. या सुंदर डिझाईन केलेल्या कपड्यांची मागणी दरवर्षी वाढत आहे.

 
भगवान कृष्णासाठी कपडे बनवण्याची परंपरा मोहम्मद इकरार यांच्या आजोबांपासून सुरू झाली आणि पिढ्यानपिढ्या ही प्रदीर्घ परंपरा चालू आहे. इकरार आणि त्याचे कुटुंब त्यांच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. हे कुटुंब केवळ पोशाखच नव्हे, तर मुकुट आणि मेकअपचे साहित्यही तयार करते, ज्यामुळे श्रीकृष्णाच्या मूर्ती अधिक भव्य आणि सुंदर दिसतात.
 
 
इकरार यांचे म्हणणे आहे की, पोशाख तयार करताना त्यांना असे वाटते की, जणू भगवान श्रीकृष्ण त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे हात आपोआप चालू लागतात. त्याचबरोबर "गोपालजींनी दिलेल्या निर्देशानुसार, आम्ही डिझाइन तयार करतो आणि नंतर आम्हाला समजते की डिझाइन खूप सुंदर आणि अद्वितीय बनले आहे." असेही ते म्हणतात. इकरार यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तिथे किमान २० पुरुष काम करतात आणि या पोशाखांना केवळ मथुरा वृंदावनमध्येच नाही तर संपूर्ण देशात मागणी आहे. 

 
हातानेच बनवतात डिझाईन
मोहम्मद इकरार सांगतात, की लड्डू गोपाळचा ड्रेस बनवायला अनेक तास लागतात. हे खूप तपशीलवार काम आहे. हा ड्रेस आपण हाताने तयार केला तर ड्रेस इकडे तिकडे हलणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. एक छोटीशी चूक सर्व मेहनत खराब करू शकते. प्रत्येकजण मेक-अप, ड्रेस आणि मुकुट एकत्र तयार करतो. हे सर्व पोशाख तो स्वत:च्या हाताने बनवतो. यामध्ये तो कोणत्याही प्रकारच्या हायटेक मशीनचा वापर करत नाही.

 
मथुरेतील हे मुस्लिम कुटुंब हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचे सशक्त उदाहरण आहे, जे धार्मिक आणि सांस्कृतिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून उभे आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होतात, आणि हे एकमेकांप्रती असलेल्या प्रेम आणि आदराचे प्रतिक आहे.
 
-प्रज्ञा शिंदे

( [email protected] )

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter