महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा लाभलेली आहे. येथे वारकरी संप्रदायातील विचारांना धरून जगणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभावतेची भावना सगळीकडे वाढत चालली आहे. आजही हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात, त्यामुळे एकोप्याची भावना वाढीस लागते.
मुस्लिम समाजातही असे एक महाराज आहेत जे वारकरी सांप्रदायिक विविध संतांचे कीर्तन करतात. त्यांचे नाव हमीद अमीन सय्यद आहे. संत विचारांमधून समाज प्रबोधन करण्याचे काम ते करतात. त्यांच्या भारुडांना भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. हमीद सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती दिली. लहानपणापासूनचा आतापर्यंतचा प्रवास सांगताना हमीद अगदी रमून गेले होते. सुरुवातीपासूनच मला कलेची आवड होती अशी माहिती हमीद यांनी दिली आहे. शालेय जीवनात सर्वच गोष्टीत हिरारीने सहभाग होतो असेही हमीद यांनी म्हटले आहे.
शाळेत असताना कवितेला चाली लावणे आणि मराठी भावार्थगीते गाण्याचा हमीद यांना शौक लागला होता. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यायला हमीद सय्यद कायमच पुढे असायचे. त्यानंतर हमीद हे प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून सहभागी व्हायला लागले. हमीद यांच्या शाळेत एकेदिवशी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी तिथे प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाहीर कल्याण महाराज काळे आले होते. त्यांनी हमीद यांना ओळखले आणि सोबत चल म्हटले. त्यानंतर कल्याणराव काळे यांनी पोवाड्याच्या कार्यक्रमात संधी दिली.
त्यावेळी ५ वी इयत्तेत असल्यामुळे हमीद सय्यद यांच्यात समज आलेली नव्हती. काळे महाराजांनी घरच्यांना समजून सांगितल्यानंतर हमीद महाराजांसोबत पोवाड्याच्या कार्यक्रमाला जाऊ लागले. हमीद त्यावेळी पोवाड्या मागचा कोरस देण्याचे काम करू लागले. हमीद अमन सय्यद मुस्लिम जातीचे असले तरी मराठीतून अतिशय छान पद्धतीने भाविक भक्तांना भारूड समजावून सांगत. हमीद यांना लहानपणापासून कलेची आवड होती. तेव्हापासूनच कविता आणि देशभक्ती गीत म्हणायला हमीद यांनी सुरुवात केली. त्यानंतर सोबतच भारुड ऐकण्याचे काम सुरु होते.
कल्याण महाराजांचे कीर्तन चालू असताना मधल्या सुट्टीत हमीद भाविकांसाठी गाणे म्हणत असायचे. या काळात त्यांना खूप शिकायला मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्त मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड ठिकाणी भास्करगिरी महाराजांच्या सेवेत दर दत्त जयंतीला भारुडाचा कार्यक्रम सादर केला जातो. हमीद महाराज भारुडाकडे कसे वळले हे माहित करून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बोलताना त्यांनी म्हटले की, भारूड पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्यामध्ये हमीद यांना रस निर्माण झाला. त्यानंतर अभ्यास करायला सुरुवात केली. दूरदर्शन आणि रेडिओ त्या काळात प्रसिद्ध असल्यामुळे लोकांना भारुडे त्या माध्यमांमधून ऐकायला मिळत असत.
भारुडे ऐकल्यानंतर हळूहळू हमीद यांनी स्वतःच्या मनाने आशय तयार करून सादर करायला सुरुवात केली. संत विचारांमधून भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे त्यांनी काम सुरु केले. चंदाताई तिवाडी यांचे भारूड ऐकून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कार्यक्रम सादरीकरणासोबतच हमीद यांनी विविध स्पर्धांसाठी अर्ज भरायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ साली आकाशवाणी पुणे केंद्राची लोकसंगीत स्वरचाचणी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होऊन बी हाय ग्रेड प्राप्त केला. आज पर्यंत त्यांनी अनेक लोकसंगीत कार्यक्रमात अनेक भारुडांचे सादरीकरण केले आहे आणि अजूनही चालू आहे.
मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील 'धीना धिन धा' या कार्यक्रमात सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी चार भागात सहभाग नोंदवून पहिला क्रमांक मिळवला होता. सुरुवातीला घरच्या आणि नातेवाइकातील लोकांची यावर काय भूमिका होती हे जाणून घेण्याचा हमीद यांच्याकडून प्रयत्न केला. त्यावर बोलताना हमीद यांनी सांगितले की, “समाज आणि घरातून सुरुवातीला विरोध झाला. लोकांकडून प्रशंसा आणि सन्मान मिळू लागल्यावर घरच्यांचा विरोध कमी झाला.” हमीद महाराज भारूडसेवा देताना मुख्यत्वे ‘राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर भर देतात.
हमीद यांचे भारूड ऐकल्यानंतर अनेक गावांमधील मुले नशामुक्त झाली आहेत. महिला सक्षमीकरणाचे अनेक कार्यक्रम भारुडाच्या माध्यमातून राबवले गेले. त्यामुळे ग्रामीण भागात महिला बचत गट स्थापन करण्यात आले. त्यामाध्यमातून अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. पुढे बोलताना हमीद महाराज सय्यद यांनी भारूड केलेल्या गावांमधील गोष्टी सांगितल्या. एका गावात हिंदू मुस्लिम समाज एकत्र राहत असल्यामुळे सगळीकडे एकोप्याची भावना तयार झाली होती.
या ठिकाणी गावातील ग्रामदैवत हे हिंदू मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक होते. एक वर्षी हिंदू आणि मुस्लिम समाजात कार्यक्रम कोणत्या समाजाचा ठेवायचा यावरून तेढ निर्माण झाला होता. येथे हमीद सय्यद यांचे भारूड कार्यक्रम झाले. त्यानंतर गावातील हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र आला. आता दरवर्षी येथे हमीद यांना भारुडाची सेवा द्यायला त्या गावात आवर्जून बोलावले जाते. नांदेड येथील प्रसिद्ध माहूर या ठिकाणी पिराची मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधीचा कार्यक्रम आवर्जून ठेवला जातो. हमीद सय्यद यांनी आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला विरोध झाला नसल्याचे आवर्जून सांगितले.
माझ्या कार्यक्रमामधून ५ लोक जरी सुधारले तरी माझी भारुडसेवा सार्थकी लागली असे मला म्हणता येईल. भारूड सांगताना अनेक भाविकांनी तंबाखूच्या पुड्या, सिगारेट, विडी आणि गुटख्याच्या पुड्या समोर ठेवलेल्या घमेल्यात आणून टाकल्याचे हमीद यांनी सांगितले. भारूड सादर करताना अनेक अडचणी आल्या. पण यामध्ये समाजातून अनेक वेळा मुस्लिम कलावंत म्हणून आवर्जून बोलावले गेले असेही हमीद यांनी सांगितले आहे. संत विचारांतून सामाजिक विषयांवर प्रबोधन केले जाते. गावागावात शौचालय उभे करून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागात भारुडामुळे चांगले बदल घडून आले.
भारूड लोककलेच्या माध्यमातून समाजातील तळागाळामधील प्रश्नांना हात घालता येतो. भारूडाच्या कार्यक्रमासाठी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, कीर्तन महोत्सव, लोककला कार्यक्रम आणि जत्रा - यात्रा या ठिकाणी आवर्जून बोलावले जाते. अशा अनेक माध्यमांमार्फत लोकांपर्यंत पोहचून संदेश पोहचवता येतो असेही हमीद यांनी सांगितले आहे. एका ठिकाणी दुसऱ्या एका गावात घडलेल्या घटनेबद्दल हमीद यांनी सांगितले आहे. एका गावामध्ये हमीद यांचा कार्यक्रम मंदिरात ठेवला होता. त्या वेळी कार्यक्रमाच्या संयोजकाने महाराजांना मंदिरात कार्यक्रम घेता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे दुसरीकडे कार्यक्रम नाईलाजाने का होईना महाराजांना करावा लागला.
संयोजकांकडून महाराजांना नंतर काही कर्मठ लोकांमुळे कार्यक्रमाचे ठिकाण बदलावे लागले असे सांगण्यात आले. याच कर्मठ लोकांचे मन कार्यक्रम बघितल्यानंतर बदलले आणि त्यांनी महाराजांची येऊन भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तेथील मंदिरातच हा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारुडाच्या माध्यमातून हमीद यांनी जनजागृती केली आहे. त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहचवली. त्यामध्ये प्रचार, प्रसिद्धी आणि आणि जनजागृती केली. भारुडाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवली. भारुडाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे हमीद यांनी सांगितले. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून हमीद यांनी कार्यक्रम केले. पद्म पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले होते.
समाजात सध्याच्या घडीला हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाला आहे. हमीद सय्यद महाराजांच्या कीर्तनामुळे दोन समाजाला जोडण्याचे काम केले आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाना भारुडाचा कार्यक्रम आवडतो. हमीद सय्यद हे यामाध्यमातून चांगले बदल घडवत आहेत. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.