दोन व्यक्तींनी समाजाच्या मान्यतेने कायदेशीरदृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे लग्न. समाज व्यवस्थेत विवाहाला अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक सण म्हणूनही उत्सवप्रिय लोक लग्नाकडे हौशीने बघतात. इस्लाम धर्मानूसार होणाऱ्या वैवाहिक कराराला ‘निकाह’ असे म्हटले जाते.
हिंदू धर्मियांमध्ये धर्माप्रमाणेच परंपरांमध्ये मोठे वैविध्य आहे. त्यामुळे प्रत्येक प्रांतातील हिंदूमधील लग्नविधी वेगवेगळ्या आहेत. मुस्लिमांमध्ये इस्लामप्रमाणे होणारा ‘निकाह’चा विधी सर्वत्र सारखाच असतो. भारतातील मुस्लिमांमध्येही हिंदूंप्रमाणेच अनेक परंपरा ‘निकाह’सोबतच पाळल्या जातात. या परंपरा प्रांतानुसार बदलतात. लग्न परंपरा हे त्याचे अगदी समर्पक उदाहरण. महाराष्ट्रातील खानदेश पट्ट्यातील मुस्लीमांमधील लग्नकार्यात अनेक स्थानिक परंपरांचा समावेश झालेला आढळतो. विशेष म्हणजे यापैकी काही परंपरा हिंदू आणि मुस्लीम धर्मीय सारख्याच पद्धतीने करतात.
दख्खन पठाराच्या वायव्य कोपऱ्यावर, तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या भू-भागाला खानदेश म्हणून ओळखले जाते. उत्तरेस सातपुडा पर्वतरांगांनी, पूर्वेला बेरार (वऱ्हाड) प्रदेशाने, दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगररांगांनी (महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्राशी) आणि पश्चिमेकडे पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांनी वेढलेला हा भाग आहे. हा प्रदेश उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागामध्ये येतो. खानदेशात नंदुरबार, धुळे, जळगाव हे जिल्हे येतात. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही खानदेशात समावेश होतो. या प्रांताची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे. इथे अहिराणी भाषा बोलली जाते. इथला मुस्लीम समाज इथल्या स्थानिक संस्कृतीशी एकरूप झालेला आढळतो.
मंगनी आणि साखरपुडा यातील साम्य
खानदेशात हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मात मुला-मुलीची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न / निकाह ‘पक्के’ करण्यासाठी एक विधी करतात. हिंदू धर्मात या विधीला ‘साखरपुडा’ तर मुस्लीम धर्मात ‘मंगनी’ असे म्हणतात.
साखरपुडा किंवा मंगनीमध्ये वराचे वडील काही नातेवाईकांना सोबत घेऊन कन्येच्या वडिलांकडे जातात व आपल्या मुलासाठी त्यांच्या कन्येला विवाहाची मागणी घालतात. कन्येचा पिता घरच्यांची व मुलीची संमती घेऊन उत्तर कळवतो. सर्वांच्यादेखत वरपिता व वधूपिता हा विवाह निश्चित झाल्याचे जाहीर करतात. यानंतर दोन्ही धर्मात विवाहाचा तोंडी व्यवहार पक्का झाला, असे गृहीत धरले जाते.
त्यानंतर लगेच हिंदू धर्मात साखरपुडा तर मुस्लीम धर्मात मंगनी हा विधी केला जातो. वरपक्षाकडून ऐपतीनुसार मुलीला सोन्याची किंवा चांदीची अंगठी दिली जाते. वधूपक्षाकडूनही भावी जावयाला पोषाख व सोन्याची किंवा चांदीची अंगठी दिली जाते. हल्ली मुलगा-मुलगी यांनीच एकमेकांना अंगठी घालण्याची पध्दत दोन्ही धर्मात प्रचलीत आहे.
असा ठरतो लग्नाचा मुहूर्त
वधू-वर व त्यांचे कुटुंबीय यांच्या सोयीनुसार लग्नाचा मुहूर्त शोधतात. पूर्वी हिंदू धर्मात अशी पध्दत होती की, दिवाळीनंतर तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कोणताच लग्नमुहूर्त काढला जात नसे. किंवा अमावस्या अशुभ असते त्यामुळे त्या दिवशी शुभकार्य करू नये, अशी प्रथा आजही प्रचलित आहे. अगदी तसेच मुस्लीम धर्मात हिजरीकॅलेंडरनुसार (इस्लामी कालगणनेनुसार) लग्नाची तारीख काढली जाते. हिंदूंप्रमाणेच मुस्लीमही काही ठराविक महिने किंवा दिवस लग्नकार्यासाठी अशुभ मानतात.
प्रथम दरगाहमध्ये ठेवली जाते लग्नपत्रिका
हिंदू धर्मात लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या कि चांगला मुहूर्त पाहून प्रथम आपल्या कुलदैवताला मंगलकार्याला येण्याचे निमंत्रण केले जाते. तसेच खानदेशात मुस्लीम धर्मीय पहिली पत्रिका त्या कुटुंब पूर्वापार ज्या सुफी संतावर, पिरावर श्रद्धा आहे त्याच्या समाधीवर, ज्याला दरगाह असे म्हटले जाते तिथे ठेवतात. शुभकार्याला सुफी संताचा आशीर्वाद मिळावा ही त्यामागची भावना असते. त्यानंतर मित्रमंडळी व नातेवाईक यांना निमंत्रणपत्रिका वाटल्या जातात व विवाहासाठी निमंत्रित केले जाते.
बस्ता : वरपक्षाकडून नवरीला घेतले जातात कपडे व दागिने
साखरपुडयापासून ते विवाहाच्यामधील काळात वधूचा पोशाख व दागदागिने यांची तसेच वराचा पोशाख यांची खरेदी केली जाते. ऐपतीनुसार वरपक्षाकडून वधूला वस्त्रे व दागिने खरेदी केले जातात. त्याचप्रमाणे वधूपक्षाकडूनही वरासाठी एखादा दागिना व वरमाई आणि इतर मानापानाच्या साडया, कपडे इत्यादींची खरेदी केली जाते. या कापडखरेदीला ‘बस्ता बांधणे’ असे म्हणतात.
होणाऱ्या नवरीला ईदनिमित्त पाठवतात ‘ईदी’
लग्न ठरल्यानंतर किंवा मंगनी झाल्यानंतर जो पहिला सण येईल त्या सणाला नवीन नवरा-नवरीला एकमेकांचे कुटुंबीय भेटवस्तू पाठवतात. मुस्लीमधर्मीय ईदनिमित्त ‘ईदी’ पाठवतात. तर, हिंदू धर्मीय मकर संक्रांतीनिमित्त ‘वान’ पाठवतात. यात साडी किंवा ओढणी व ड्रायफ्रुट्स यांचा समावेश असतो. याचबरोबर मोहरममध्ये रोट तर काही ठिकाणी दिवाळीत मिठाईही पाठवली जाते.
‘हल्दी-चिक्सा’ची प्रथा
लग्नाचा/शादीचा महत्त्वाचा विधी म्हणजे हळद लावणे. हा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशीच सकाळी करतात. हिंदू धर्मात हळद लावायच्या आधी उटणे लावले जाते. उटण्यालाच मुस्लीम धर्मात चिक्सा म्हणतात.
यांनतर नवरा-नवरीच्या समोर हिंदू धर्मात जसे सलईचे खांब ठेऊन त्याला आधी हळद लावली जाते अगदी तसेच मुस्लीम धर्मात पाण्याने भरलेला मटका ठेवला जातो. या मटक्याला आधी हळद लावली जाते. त्यानंतरच नवरा किंवा नवरीला हळद लागते. पाच किंवा सात वेळेस ही हळद लावली जाते.
महिला एकत्र येऊन गातात गाणी
लग्नाच्या दोन दिवस आधी मोहल्ल्यातील किंवा वाड्यातील महिला एकत्र येऊन ढोल वाजवतात व गाणी गातात. या प्रथेला ‘रतजगा’ असे म्हणतात. यावेळीदोन्ही धर्मांमध्ये मंगल कार्याची, मिलनाची, विनोदी, वधु-वरांची मस्करी करणारी, किंवा भावनोत्कट अशी गाणी म्हटली जातात. वधू-वर व तिचे-त्याचे आई-वडील यांना मध्ये बसवून त्यांच्याभोवती फेर धरून थोडेसे नाचून गाणी म्हटली जातात.
मेंदी व बांगड्या भरण्याची प्रथा
कोणत्याही शुभकार्याला मेंदी लावणे हा खरा राजस्थानातला रिवाज. पण आता तो महाराष्ट्रातही अमाप लोकप्रिय झाला आहे. वर किंवा वधूचे सौंदर्य खुलविण्यासाठी ही मेंदीची प्रथा असते. मेंदीचा कार्यक्रम हा बहुधा लग्नाच्या दोन दिवस आधी केला जातो. दोन्ही धर्मात वधूबरोबरच लग्नासाठी जमलेल्या वऱ्हाडातील स्त्रियांनाही मेंदी काढतात. मेंदी रंगल्यावर हिंदू धर्मात वधूला हिरवा चुडा भरतात. तर, मुस्लीम धर्मीयांमध्येही हिरवा चुडा व लाल कंगण घातले जातात. चुडा म्हणजे बांगडया. वधूचे चुडा भरणे झाल्यावर वऱ्हाडातील इतर स्त्रियांनाही आवडीनुसार बांगडया भरल्या जातात. यासोबतच मुस्लीम धर्मात दुपट्टा म्हणजेच ओढणी देण्याचीही प्रथा आहे.
कंदुरी
मंगल कार्य करण्यापूर्वी हिंदू धर्मात जसे जागरण गोंधळ ठेवले जाते तसेच मुस्लीम धर्मीय ‘कंदुरी’ ठेवतात. अजमेरचे ख्वाजा गरीब नवाज, अंतापूर ताराबागचे दावल मलिक यांसारख्या सुफी संतांच्या स्मरणार्थ कंदुरीचा कार्यक्रम ठेवतात. त्याला ‘न्याज’ असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये खंडोबाच्या नावाने बोकड कापले जाते आणि मेजवानी ठेवली जाते. अगदी तसेच मुस्लीम धर्मात बोकड कापून बाजरीच्या भाकरीसोबत सर्वांना जेवू घातले जाते. बऱ्याचदा लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजे हळदीच्या रात्री हा कार्यक्रम पार पडतो.
निकाह
लग्नाची भव्यदिव्यता प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबून असते. धर्म याविषयी काही नियमावली सांगत नाही. ‘निकाह’चा विधी मस्जिदमध्येही पूर्ण करता येतो. मात्र बरेचदा हा कार्यक्रम मंगल कार्यालयातच केला जातो.
निकाहनंतर दरगाह जातात नवरा-नवरी
हिंदू धर्मात लग्न लागल्यानंतर देवाचे दर्शन घ्यायची प्रथा आहे. त्यासाठी लग्न झाल्या झाल्या नवीन जोडप्याला मंदिरात किंवा देव घरात नेले जाते. अगदी तसेच खानदेशात मुस्लीम निकाहनंतर दुल्हा-दुल्हन दरगाह सुफी संताचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात.
लग्नात मामाकडून भेट दिला जातो पलंग
हिंदू-मुस्लीम लग्नांमधील आणखी एक साम्य म्हणजे दोन्ही धर्मांमध्ये लग्नकार्यात मामाला असलेले विशेष महत्त्व. खानदेशात बहुतेकदा मामा मुलीला गादी आणि पलंग भेट देतो.
नवरीचा लग्नातील पोशाख
हिंदू लग्नांमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. वधू शक्यतो लाल रंगातले कपडे किंवा ओढणी, चुनरी परिधान करते. येथील मुस्लिमांच्या लग्नातही वधूचा पोशाख लाल रंगाचाच असावा असे पाहिले जाते. किमानपक्षी लाल रंगाची ओढणी असतेच असते.
मंगळसूत्र
मंगळसूत्र हा हिंदू सौभाग्यवती स्त्रीचा प्रमुख अलंकार मानला जातो. मुस्लीम वधूही मंगळसूत्राला तितकेच महत्त्व देत असल्याचे दिसते. लग्नासाठी दागिने बनवताना मंगळसूत्र आवर्जून बनवले जाते. या मंगळसुत्राला शक्यतो ‘गंठन’ म्हटले जाते.
लग्नातील खानपान
खानदेश या भू-प्रदेशात विविध जाती-धर्मांची लोक राहतात. त्यामुळे येथील लग्नांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची सोय केली जाते. मुख्यत्वे दालचा हा पदार्थ या भागातल्या मुस्लीम लग्नांमध्ये बनवला जातो.
वलीमा म्हणजेच रिसेप्शन
खानदेशात मुस्लीम धर्मीय वलीमा आयोजित करतात. शक्यतो लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वलीमा म्हणजेच जेवणाची दावत दिली जाते. हा कार्यक्रम शक्यतो संध्याकाळी आयोजित केला जातो.
बिदागी म्हणजे विदाई
लग्नानंतर नवरीची सासरी रवानगी केली जाते. याला हिंदू धर्मीय विदाई तर मुस्लीम धर्मीय बिदागी म्हणतात.
परतमोड म्हणजेच वालना
लग्नानंतर काही दिवस सासरी राहून नवरी माहेरी येते. खानदेशातील हिंदूधर्मीय याला वालना म्हणतात. तर मुस्लीम परतमोड म्हणतात. त्यानंतर वर्षभर प्रत्येक पहिल्या सणाला मुलगी माहेरी येते. ही प्रथाही दोन्ही धर्मियांमध्ये आढळते.
या सगळ्याच प्रथा तंतोतंत पाळल्या जात नाही. त्यात थोडाबहुत फरक पडत जातो. जुन्या पिढीचा या रूढी-परंपरा जपण्याकडे कल आढळतो तर, नवीन पिढी कालपरत्वे त्यात बदल करताना दिसते. अनेक ठिकाणी केवळ ‘निकाह’ची रस्म पार पाडली जाते आणि वर सांगितलेल्या परंपरांना फाटा दिला जातो.
- छाया काविरे