भारताच्या सामरिक क्षेत्रात अजित डोवाल यांच्यासारखी विशिष्ट ओळख निर्माण करणारे फार कमी व्यक्ती आहेत. किर्ती चक्र विजेते आणि भारताचे सर्वात दीर्घकाळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या डोवाल यांची तिसऱ्या कार्यकाळात नियुक्ती आणि कॅबिनेट मंत्री दर्जा यामुळे त्यांच्या सामरिक दूरदृष्टी आणि राष्ट्रीय सुरक्षा तसेच परराष्ट्र धोरणातील नेतृत्वावर सरकारचा असलेला गहन विश्वास दिसून येतो.
काय आहे ‘डोवाल सिद्धांत’?
राष्ट्रीय सुरक्षा आणि संबंधित सामरिक मुद्द्यांशी निपटण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची ही संकल्पना आहे.
या सिद्धांताचा उगम शोधण्यासाठी दक्षिण ब्लॉक आणि पंतप्रधान कार्यालयातील लक्ष वेधण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पहिल्या घटनेचा उल्लेख करता येईल. भारतीय पोलिस सेवेतील नवखे अधिकारी म्हणून केरळमधील आपल्या गृह संवर्गात सेवा देताना डोवाल यांना थालासेरी येथील सांप्रदायिक तणाव शांत करण्यासाठी बोलावले गेले. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची होती की वरिष्ठ अधिकारीही जबाबदारी घेण्यास नकार देत होते. नवखे असलेल्या डोवाल यांनी ही परिस्थिती माशाने पाण्यात सूर मारावा, तशी हाताळली. मात्र त्यांचा दृष्टिकोन अपारंपरिक होता.
त्यांनी सुरुवातीचा काही दिवस सांप्रदायिक हिंसाचाराचे खरे कारण आणि निराकरणाचे मार्ग यांवर प्राथमिक गुप्तचर माहिती गोळा करण्यात घालवले. दोन्ही समुदायांच्या संवेदनशील बिंदूंवर बोट ठेवल्यानंतर, त्यांनी लाठी-बंदुकीऐवजी कौशल्य आणि वाटाघाटींचा वापर करून एका आठवड्यात परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वरिष्ठांना आश्चर्य वाटले. पुढील वर्षांत परिपक्व झालेली ही वाटाघाटीची कला कंधार विमान अपहरणाच्या कुख्यात घटनेत पुन्हा उपयोगी ठरली, जिथे डोवाल यांनी अशक्य परिस्थिती सरकारसाठी प्रतिष्ठा राखणाऱ्या निराकरणात बदलली.
गुप्तचर विभागात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मिझोराम आणि नंतर सिक्कीममध्ये ख्याती मिळवली. मिझोराममध्ये, त्यांनी चीन-समर्थित वेगळेपणवादी गट मिझो नॅशनल फ्रंटला निष्प्रभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मिझोराममधील उपगुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून, त्यांनी मिझो नॅशनल फ्रंटचे प्रमुख लालदेंगा यांच्या सात मुख्य कमांडर्सवर कला-कौशल्याने काम केले.
त्यांनी गुप्तचर साधनांचा वापर—पैसा, विचारसरणी, दबाव, अहंकार—करून सहा कमांडर्सना निष्ठा बदलून मुख्य प्रवाहात सामील होण्यास प्रवृत्त केले. हा मिझो नॅशनल फ्रंटसाठी मृत्युदायी आघात होता, ज्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात येण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांचे कट्टर टीकाकारही या कारवाईचे पूर्ण श्रेय डोवाल यांना देतात. सिक्कीममध्ये, भारतीय गुप्तचर क्षेत्राचे मूळ सम्राट आर. एन. काओ यांच्यासोबत काम करताना, त्यांनी अपारंपरिक पद्धतींनी शत्रूच्या रचनांना आणि हितसंबंधांना घातक आघात केले.
या सुरुवातीच्या यशांमुळे आणि पंजाबमधील बंडखोरी शांत करण्यात, विशेषतः ऑपरेशन ब्लॅक थंडरमधील उत्कृष्ट भूमिकेमुळे, ज्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना प्रतिष्ठित किर्ती चक्र प्रदान केले, डोवाल यांचा संघर्ष निराकरणाचा दृष्टिकोन आकारला गेला. क्रिकेटच्या भाषेत याचे वर्णन “गुप्तचराने टाकलेला चेंडू, कायदा अंमलबजावणी किंवा लष्कराने झेललेला” असे करता येईल.
राष्ट्रीय सुरक्षेचे प्राथमिक साधन म्हणून गुप्तचर माहितीवर अवलंबून राहण्याची ही विचारसरणी हळूहळू “संरक्षक आक्रमण” या तत्त्वज्ञानात परिपक्व झाली, जी भारताच्या सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांताचा पाया आहे. 2014 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद स्वीकारल्यापासून भारताच्या अप्रोचमध्ये मूलभूत बदल दिसून येतो. डोवाल यांच्या मॉडेलचे मूळ तत्त्वज्ञान उपाययोजनात्मक कारवाईवर भर देतात. भारत निष्क्रियता टाळून शत्रूच्या अधिकारक्षेत्राची पर्वा न करता त्यांन चोख प्रत्युत्तर देईल.
हा बदल भारताच्या दशकांपूर्वीच्या सामरिक संयमाच्या प्रथेपासून फारकत घेणारे आहे. त्यावेळी काही प्रमाणात नुकसान सहन करून भारताला सौम्य उद्दिष्टांसह स्थिर शक्ती म्हणून सादर केले जायचे. डोवालल सिद्धांत मात्र शत्रूवर आर्थिक, राजकीय भार टाकतो. सुरक्षाव्यवस्था आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शत्रूला कोंडीत पकडण्यावर जोर देतो. पठाणकोट हल्ल्यानंतर जेव्हा डोवाल यांना पुर्नाधिकार देण्यात आले. पाकिस्तानला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरातून पाकिस्तानबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनात डोवाल यांच्या सिद्धांताचा प्रत्यय येतो.
डोवाल सिद्धांताचा एक मूलभूत सिद्धांत म्हणजे प्रभावी प्रतिकार-धोरण तयार आणि अंमलात आणण्यासाठी प्राथमिक सामरिक धोक्याची स्पष्ट व्याख्या करणे आवश्यक आहे. अलीकडील ऑपरेशन सिंदूरमध्ये, जिथे डोवाल यांनी नियोजन आणि अंमलबजावणीचे समन्वय साधल्याचे सांगितले जाते, हा सक्रिय दृष्टिकोन दिसून आला.
केवळ शारीरिक कारवाईवर अवलंबून न राहता खऱ्या गुप्तचर तज्ञाप्रमाणे डोवाल यांनी शत्रूनुसार योग्य पर्याय निवडण्याचे आणि त्याचे नियमन करण्याची मुत्सद्दीगिरी दाखवली. 2017 आणि 2020 पासून चीनसोबतच्या तणावांना कमी करण्यात त्यांनी मुत्सद्देगिरी आणि संवाद यांचा मेळ साधला. तर शत्रूची इच्छाशक्ती कमी करण्याची रणनीती त्यांनी NSCN-IM या ईशान्येकडील बंडखोर संघटनेबाबत भारताची भूमिका डोवाल यांच्या राष्ट्रीय सुरक्षेतील व्यापक तज्ञतेचे आणखी एक उदाहरण आहे.
डोवाल यांच्या अनेक कर्तृत्वगाथांमध्ये डोवाल यांनी संस्थात्मक निर्मितीमध्ये दिलेले योगदानाकडे अनेकदा दुर्लक्षित होते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाची कष्टपूर्वक उभारणी केली आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाला सक्षम केले. ही पद्धती संघटना पुनर्रचना आणि पुनरुज्जननाचे व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासण्यासारखे आहे.
आज, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे केंद्र दक्षिण ब्लॉकमधून सरदार पटेल भवनात- जिथे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आहे-तिथे शिफ्ट झाले आहे. डोवाल सिद्धांताचा आणखी एक दीर्घकालीन परिणाम म्हणजे भारत-अमेरिका संबंध आकारण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका. भारत-अमेरिका यांच्यात महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची देवघेवीवर झालेल्या सहमतीत त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. आसाम पोलिसांचे महासंचालक म्हणून माझ्या कार्यकाळात मी त्यांच्याठायी असलेल्या गुप्तचर कार्यपद्धतीची काही उत्कृष्ट वैशिष्ट्ये पाहिली. प्रथम म्हणजे, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत ते सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवतात कारण राष्ट्र सर्वोच्च आहे.
गुप्तचर क्षेत्रातील कारकीर्द असूनही, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजूनही ते भारतीय पोलिस सेवेची नीतिमूल्ये हृदयाजवळ ठेवतात आणि माझ्याशी बोलताना त्यांनी अनेकदा भारतीय पोलिस सेवेतील “भारतीय” तत्त्वावर जोर दिला. मी एका मूलतत्त्ववादी संघटनेविषयी- जी नंतर प्रतिबंधित झाली- सल्ल्यासाठी त्यांना संपर्क साधला तेव्हा डोवाल यांच्या उच्च दर्जाच्या नेतृत्व आणि कौशल्याचा प्रत्यय आला.
आसाम पोलिस आणि राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे महासंचालक यांनी पुरावे गोळा करणे आणि प्रतिबंधासाठी केस तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आमच्यापेक्षा पुढे होते आणि त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या प्रतिक्रियांचे परिणाम नियंत्रित करण्याचे काम केले.
द्वितीय परिणामांना सामोरे जाण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने गुप्तचर कारवाया आणि कपटाचा मास्टरक्लास दिला. त्यांनी बंडखोर नेत्यांच्या समर्थनाला चाप लावला. त्यांच्या या पद्धतीविषयी माझ्यासारखा एक वरिष्ठ अधिकारीही अनभिज्ञ होता.डोवाल यांनी केलेल्या या प्रतिबंधात्मक उपायामुळे तिथे मुळे आजपर्यंत एकही निषेध झाला नाही. ईशान्येकडील नागरिकांनी याकडे भारताची कायदेशीर कारवाई म्हणून पाहिले.
आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कर्तृत्व आणि क्षमता इतकी प्रचंड आहे की त्यांच्या सामरिक प्रभावामुळे भारताकडे बघण्याचा जगाचा बदलेल्या दृष्टीकोनातून त्याची साक्ष पटते. त्यांच्याबद्दल अनेक दंतकथाही त्यासाठी फिक्या पडतात. डोवाल सिद्धांतामुळे त्यांचा प्रभाव कायमस्वरूपी राहीलच. मात्र त्याचवेळी भारतात संस्थांत्मक बांधणीतील त्यांचे अनन्यसाधारण योगदान कधीच विसरता कामा नये.
- भास्कर ज्योती महंता
लेखक आसामचे मुख्य माहिती आयुक्त आणि आसाम पोलिसांचे माजी महासंचालक आहेत.