'LoCवरील नुकसानग्रस्त घरांची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला नागरिकांशी चर्चा करताना
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला नागरिकांशी चर्चा करताना

 

नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे पडलेल्या घरांची पुन्हा बांधणी करू आणि शक्य तेवढी नागरिकांना मदत केली जाईल, अशी हमी बुधवारी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिली. माझ्या लोकांचे दुःख खूप वैयक्तिक आहे, असे ते म्हणाले. 

पाकिस्तानच्या गोळीबाराने आणि तोफांच्या माऱ्याने बाधित झालेल्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीसह सलामाबाद, लागमा, बांदी आणि गिंगल या भागांना भेट देऊन अब्दुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात वैयक्तिक बंकर बांधण्याची मागणी केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुमची घरे पुन्हा बांधण्यासाठी सरकारकडून तुम्हाला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. उरीच्या लोकांनी अनेक वेळा वेदना सहन केल्या आहेत, पण प्रत्येक वेळी ते धैर्याने उभे राहिले आहेत, असे अब्दुल्ला म्हणाले. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सल्लागार नासीर अस्लम वणी, उरीचे आमदार सज्जाद उरी आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. 

सर्वांना भरपाई देणार 
उरीत पत्रकारांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, पाकिस्तानने नागरी भागात दोन-तीन दिवस अतिशय क्रूरपणे गोळीबार केला. जास्तीतजास्त सर्वसामान्य नागरिकांची हानी व्हावी म्हणूनच सीमेपलीकडून जाणीवपूर्वक गोळीबार होत होता. आता शस्त्रसंधी झाला आहे. दोन दिवसांपासून 'एलओसी'वर लोक शांत आहेत. ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व घरांपर्यंत पोहण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकसानीची पाहणी करून भरपाई देणार आहोत. याचे काम सुरू झाले असून त्यासाठी काही दिवस लागतील. पण आम्ही लोकांना परत उभे करू. 

भविष्यात अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी काय तयारी केली आहे, असे विचारल्यावर अब्दुल्ला म्हणाले की, गोळीबार झालेल्या भागांमध्ये वैयक्तिक बंकर बांधण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. जिथे जिथे मी गेलो, जम्मू असो की काश्मीर, प्रत्येक ठिकाणी जास्त बंकरची मागणी करण्यात आली. परिस्थिती कधीही बिघडू शकते, त्यामुळे लोकांना वैयक्तिक बंकरची गरज भासत आहे. प्रथम आम्ही बाधित नागरिकांना तत्काळ मदत पुरवू आणि त्यानंतर गोळीबार झालेल्या सर्व भागांसाठी बंकरांच्या मागणीचा विषय केंद्र सरकारकडे मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कसला फायदा ? 
सीमापार झालेल्या गोळीबारातून कुणाला फायदा झाला का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले, "कसला फायदा? हा प्रश्न त्यांच्याकडे विचारावा, ज्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की हा संघर्ष आम्ही सुरू केलेला नाही. पहलगाममधील हल्ल्यांत आमचे २६ निष्पाप जीव गेले आहेत. जर तिकडून बंदुका शांत झाल्या, तर या बाजूच्या बंदुका आपोआप शांत होतील, हे मी आधी सांगितले होते. सुदैवाने तिकडच्या 'डीजीएमों'नी संपर्क साधल्यानंतर शस्त्रसंधी शक्य झाला, त्यामुळे सध्या सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर शांतता आहे." 

ते पुढे म्हणाले, "सलामाबाद, लगामा, बांदी आणि गिंगल या गोळीबार झालेल्या भागांना भेट दिली. २००५ च्या भूकंपापासून ते सीमापार गोळीबाराच्या वेदनापर्यंत या भूमीने खूप काही सहन केले आहे. तरीही येथील लोक धैर्याने आणि अपार जिद्दीने प्रत्येक वेळी उभे राहतात."

भारतीय सैन्याची पूँच-अखनूरमध्ये मानवतावादी मोहीम
पाकिस्तानच्या तीव्र गोळीबाराने प्रभावित पूँच जिल्ह्यातील गावांमध्ये भारतीय सैन्याच्या रोमियो फोर्सचे जवान घरोघरी जाऊन लोकांना औषधे आणि धान्य वाटत आहेत. तसेच यावेळी सैनिकांनी स्थानिकांशी संवाद साधला. ९ मे रोजी झालेल्या जोरदार गोळीबारात घरांचे मोठे नुकसान झाल्याचे याप्रसंगी लोकांनी सांगितले.

लोकांनी सांगितल्या आपबिती
मोहम्मद आसिफ नावाच्या स्थानिकाने सांगितले की, "आमच्या घराचे खूप नुकसान झाले. आता आम्ही घरात राहू शकत नाही. म्हणून शेजाऱ्याच्या घरी राहतोय. भारतीय सैन्य इथे आले. त्यांनी खूप मदत केली. औषधे दिली. काही अडचण असल्यास सांगण्यास सांगितले. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत."

नौशेरामध्ये स्फोटक निरोधक पथक कार्यरत
सैन्याचे स्फोटक निरोधक पथक राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात कार्यरत आहे. ते जिवंत बॉम्ब आणि गोळे शोधून निष्क्रिय करत आहेत. हे बॉम्ब भारत-पाकिस्तान गोळीबारादरम्यान पडले होते. सैन्य दररोज सीमेवर सापडलेले जिवंत बॉम्ब निष्क्रिय करत आहेत. 

परिस्थिती सामान्य होत आहे
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीवर सहमती झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जम्मूच्या अखनूर भागात लोक हळूहळू सामान्य जीवनाकडे परतत आहेत. अखनूरमध्ये काम करणाऱ्या भूपेंद्र सिंग यांनी सांगितले, “अखनूरमध्ये आता परिस्थिती सामान्य आहे. दुकाने उघडत आहेत. लोक आपल्या कामावर परतत आहेत.”

सैन्याचे वैद्यकीय शिबिर
भारतीय सैन्याने अखनूर सेक्टरमधील नारायण गावात मोफत वैद्यकीय शिबिर लावले. सीमेजवळील लोकांना चांगली आरोग्यसेवा देणे हा या शिबिराचा उद्देश होता. या शिबिरात लहान मुले, महिला आणि वृद्ध मोठ्या संख्येने आले. सैन्याच्या वैद्यकीय पथकाने लोकांची तपासणी केली आणि मोफत औषधे वाटली.