'ऑपरेशन सिंदूर'ला तालिबान सरकारने दिले बिनशर्त समर्थन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताने युद्धभूमीवर पाकिस्तानला मात दिलीच आहे परंतु, आता कूटनीतीच्या मार्गाने पाकिस्तानला एकटे पाडण्याचा सुद्धा भारताचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तालिबानच्या कार्यवाहक परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. याबद्दल जयशंकर यांनी तालिबानचे मनापासून आभार मानले.

जयशंकर यांनी चर्चेनंतर ‘एक्स’वर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटले, “आज अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांच्याशी चांगली चर्चा झाली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. याची मी मनापासून प्रशंसा करतो.”

या मुद्द्यांवर चर्चा
जयशंकर यांनी पुढे लिहिले की, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अविश्वास पसरवण्याच्या खोट्या बातम्यांना तालिबानने ठामपणे नकार दिला. याचे भारताने स्वागत केले. अफगाण लोकांशी भारताची मैत्री आणि त्यांच्या विकासासाठी सतत पाठिंबा यावरही चर्चा झाली. सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवरही दोन्ही नेत्यांनी विचारमंथन केले.

ही चर्चा का महत्त्वाची?
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा खूप महत्त्वाची मानली जाते. विशेष बाब म्हणजे, अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन झाल्यापासून भारताने त्यांना मान्यता दिलेली नाही. अशा परिस्थितीत ही चर्चा आणखी अर्थपूर्ण ठरते. भारत आणि तालिबान यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. पण ही चर्चा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा एक प्रयत्न मानली जाते. तरीही तालिबान सरकारला मान्यता देण्याबाबत भारताचा पवित्रा स्पष्ट आहे. त्यांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. या चर्चेमुळे पाकिस्तानला चांगलाच धक्का बसू शकतो.