दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 'असा' रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
भालाफेकपटू नीरज चोप्रा
भालाफेकपटू नीरज चोप्रा

 

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि जागतिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा याने काल  दोहा डायमंड लीग मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 90.23 मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रम नोंदवला. यासह  90 मीटरचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. मात्र, जर्मनीच्या ज्युलियन वेबर याने अंतिम फेरीत 91.06 मीटर भालाफेक करत विजय मिळवला. यामुळे नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या कामगिरीने नीरजने जागतिक भालाफेक क्षेत्रात आपले नाव पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजच्या कामगिरीचे कौतुक करत म्हटल, “दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये ९० मीटरचा टप्पा पार केल्याबद्दल आणि वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो केल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे फळ आहे. या कामगिरीचा भारताला आनंद आणि अभिमान आहे.”

दोहा डायमंड लीगमधील नीरजची कामगिरी
कतारमधील सुहैम बिन हमाद स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत नीरजने आपल्या पहिल्या प्रयत्नातच 88.44 मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसरा प्रयत्न अवैध ठरला, परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्याने 90.23 मीटरचा ऐतिहासिक थ्रो करत स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला. हा थ्रो त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम आणि 2022 मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नोंदवलेल्या 89.94 मीटरच्या राष्ट्रीय विक्रमाला मागे टाकणारा होता.

नीरजच्या या कामगिरीने त्याला 90 मीटर क्लबमध्ये समाविष्ट केले आहे. या यादीत केवळ 25 जागतिक खेळाडूंचा समावेश आहे. अशी कामगिरी करणार तो आशियातील तिसरा खेळाडू ठरला आहे.  यापूर्वी पाकिस्तानचा अरशद नदीम (92.97 मीटर) आणि चायनीज ताइपेईचा चाओ-त्सुन चेंग (91.36 मीटर) यांनी ही कामगिरी केली आहे.

मात्र, ज्युलियन वेबरने अंतिम फेरीत 91.06 मीटरचा थ्रो करत नीरजला मागे टाकले. वेबरनेही यावेळी पहिल्यांदाच 90 मीटरचा टप्पा पार केल्याने हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स 85.64 मीटरसह तिसऱ्या स्थानावर राहिला तर भारताचा दुसरा भालाफेकपटू किशोर जेना 78.60 मीटरसह आठव्या स्थानावर राहिला.

90 मीटरचा टप्पा पार करणे हे नीरजसाठी केवळ एक थ्रो नव्हते, तर वर्षानुवर्षांचा मानसिक दबाव आणि अपेक्षांचे ओझे होते. २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर थ्रो केल्यापासून, चाहते आणि समीक्षक त्याला 90 मीटर कधी?  असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नाला उत्तर देताना नीरज म्हणाला, “90 मीटरचा टप्पा पार करताना मला खूप आनंद झाला आहे. पण मला दुसरे स्थान मिळाले. मी ज्युलियनसाठीही आनंदी असून आम्ही दोघांनी आज 90 मीटरचा टप्पा पार केला.”

नीरजचा हा थ्रो ऐतिहासिक असला  तरी  90.23 मीटरचा थ्रो केल्यानंतर त्याने फक्त हात उंचावले आणि सौम्य स्मितहास्य करत सहकाऱ्यांशी हस्तांदोलन केले. नीरज म्हणाला, “मी यापेक्षा जास्त अंतर फेकू शकतो. आम्ही काही तांत्रिक बाबींवर काम करू आणि येत्या स्पर्धांमध्ये पुन्हा 90 मीटरपेक्षा जास्त फेकण्याचा प्रयत्न करू.”

नीरजच्या या यशामागे त्याच्या नव्या प्रशिक्षक यान झेलेस्नी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. झेलेस्नी हे 98.48 मीटरसह जागतिक विक्रमधारी आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. २०२५ मध्ये यांनी नीरजसोबत प्रशिक्षण सुरू केले. यापूर्वी नीरजने जर्मन प्रशिक्षक क्लाउस बार्टोनिएट्झ यांच्यासोबत पाच वर्षे काम केले होते. यामध्ये त्याने टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण आणि पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवले. झेलेस्नी यांच्या मार्गदर्शनाखाली नीरजने तांत्रिक सुधारणा केल्या. नीरज म्हणाला, “झेलेस्नी यांच्यासोबत प्रशिक्षण घेणे खूप चांगले वाटते. आम्ही अजूनही काही गोष्टींवर काम करत आहोत, आणि मला खात्री आहे की मी यापेक्षा चांगले करू शकतो.” 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter