IPL 2025 : बेंगळूरच ठरले रॉयल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
IPL चे विजेतेपद पटकावल्यानंतर बंगळूर संघ.
IPL चे विजेतेपद पटकावल्यानंतर बंगळूर संघ.

 

 रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने मंगळवारी आयपीएलच्या अंतिम फेरीत पंजाब किंग्सला सहा धावांनी पराभूत करीत पहिल्यांदाच विजेता होण्याचा मान संपादन केला. २००८पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत बंगळूरला पहिल्यांदाच अजिंक्यपदाला गवसणी घालता आली. पंजाबला २०१४नंतर पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. 

बंगळूर संघाकडून पंजाब संघासमोर १९१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. प्रियांश आर्या व प्रभसिमरन सिंग या जोडीने ४३ धावांची भागीदारी करताना पंजाबला आश्वासक सुरुवात करुन दिली. जॉश हॅझलवूड याने प्रियांशला २४ धावांवर बाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर कृणाल पंड्याने प्रभसिमरनला २६ धावांवर बाद केले. रोमारियो शेफर्ड याने कर्णधार श्रेयस अय्यरला एक धावेवरच यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद केले आणि बंगळूर संघात नवचैतन्य निर्माण केले.

जॉश इंग्लिसने २३ चेंडूंमध्ये ३९ धावांची खेळी करीत कडवी झुंज दिली. पण कृणालच्याच गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो लियाम लिव्हिंगस्टन करवी झेलबाद झाला. नेहल वधेरा (१५ धावा) व मार्कस स्टॉयनिस (६ धावा) यांच्याकडून निराशा झाली. शशांक सिंग याने ३० चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावांची खेळी साकारली. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. कृणालने १७ धावा देत दोन फलंदाज बाद केले. पंजाबला १८४ धावांपर्यंत मजल मारता आली.

दरम्यान, याआधी काइल जेमिसन याने फिल सॉल्ट याला १६ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर मयंक अगरवाल (२४ धावा), कर्णधार रजत पाटीदार (२६ धावा) यांनी विराट कोहलीला मोलाची साथ देत बंगळूरच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. युझवेंद्र चहलने मर्यकला आणि जेमिसन याने पाटीदारला बाद केले. अझमतुल्ला उमरजई याने कोहलीला ४३ धावांवर बाद केले.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील निरोप सोहळ्यात देशभक्तीचा सूर घुमला. पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामध्ये अंतिम फेरीचा सामना मंगळवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या जेतेपदाच्या लढतीआधी रंगारंग सोहळा पार पडला. यामध्ये 'सबसे आगे होंगे हिंदुस्थानी' व 'दुश्मन के छक्के छुडा दे, हम इंडिया वाले' या देशभक्तीपर गाण्यांनी स्टेडियम दुमदुमले. 

अहमदाबादमधील या स्टेडियममध्ये भारतीय सैनिकांना, जवानांनाही खणखणीत सलाम करण्यात आला. या स्टेडियममधील डिजीटल बोर्डवर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतासाठी लढलेल्या जवानांना मानवंदना देऊन धन्यवादही म्हणण्यात आले. 

संक्षिप्त धावफलक 
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २० षटकांत ९ बाद १९० धावा (विराट कोहली ४३, रजट पाटीदार २६, लियाम लिव्हिंगस्टन २५, अर्शदीप सिंग ३/४०, काइल जेमिसन ३/४८) 

पंजाब किंग्स २० षटकांत सात बाद १८४ धावा (शशांक सिंग नाबाद ६१, कृणाल पंड्या २/१७).

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter