भक्ती चाळक
सध्या संपूर्ण महाराष्ट्राला मान्सूनने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा आणि जलसाठ्यांची घटती पातळी याबाबत चिंता वाढली आहे. या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या माहीम पश्चिम भागातील तीन प्रमुख मस्जिदींमध्ये विशेष दुवांचे आयोजन करण्यात आले होते. रखडलेला पाऊस पडावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मुस्लिमांनी एकत्रित येत ईश्वराकडे साकडे घातले. माहीम जुम्मा मशीद, माहीम कब्रस्तान मशीद आणि बिस्मिल्ला मशीद या तीन प्रमुख मशिदींमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच मुंबईतील कल्याण, ठाणे या भागात सुद्धा मुस्लिमांकडून विशेष प्रार्थना करण्यात आल्या.
बिस्मिल्ला मस्जिद
माहीम येथील बिस्मिल्ला मस्जिदमध्ये जुम्माच्या नमाजनंतर ५० ते ७० भाविकांनी ३० मिनिटे विशेष दुवा मागितली. मस्जिदीचे ट्रस्टी मोहिउद्दीन हाजी यांनी सांगितले की, "पावसाला होत असलेला विलंब आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य पाण्याचे संकट लक्षात घेऊन मस्जिदीच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर गुरुवारीच या विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार हा प्रार्थनेसाठी अत्यंत पवित्र आणि विशेष दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी पाऊस पडण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली."
जुम्मा मस्जिद
माहीमच्या जुम्मा मस्जिदीतही शुक्रवारच्या मोठ्या प्रार्थनेच्या वेळी भाविकांना आधीच कल्पना देऊन अशाच प्रकारच्या विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. मशिदीचे व्यवस्थापकीय विश्वस्त फहाद खलील पठाण यांनी सांगितले की, "दीर्घकाळ रेंगाळलेल्या कोरड्या हवामानामुळे नागरिकांमधील चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे. पाऊस येण्यास बराच उशीर झाला असून तलावांमधील पाणीपातळी खालावली आहे, तसेच तापमानाचा पाराही चढाला आहे. त्यामुळे ईश्वराकडे पावसासाठी प्रार्थना करण्याचे आम्ही ठरवले."
मस्जिदचे इमाम आणि मौलाना साद यांनी उपस्थित भाविकांना विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन केले. ईश्वराकडे आपल्या चुकांची क्षमा मागणे (इस्तिघफार) आणि पश्चात्ताप करणे हे ईश्वराची कृपा मिळवण्याचे आणि पावसाचे आशीर्वाद मिळवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
कब्रस्तान मस्जिद
माहीम कब्रस्तान मस्जिदीचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांनी निसर्गातील पाण्याच्या महत्त्वावर भाष्य केले. ते म्हणाले की, "वनस्पती, प्राणी आणि मानवाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला गोड्या पाण्याचा पुरवठा केवळ पावसामुळेच शक्य होतो. पाऊस हा नद्या, तलाव आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करतो. त्यामुळे आपल्याला पिण्यासाठी, शेतीसाठी आणि स्वच्छतेसाठी पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे पाऊस पडणे खूप गरजेचे आहे."
माहीम कब्रस्तान मस्जिदीचे प्रशासक शब्बर काबळी यांनी दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "पाणी हे पिण्यासाठी, अन्न तयार करणे, स्वच्छता, उद्योग, परिसंस्था आणि हवामान नियंत्रण या प्रत्येक क्षेत्रासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे या दुष्काळाच्या काळात पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे."
या गंभीर परिस्थितीची दखल घेत माहीम कब्रस्तान मस्जिदीचे विश्वस्त मुदस्सर लांबे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मस्जिदींना पाऊस पडण्यासाठी विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या समाजाची गरज भागवणारी धरणे भरणे, अन्न उत्पादन आणि जलविद्युत निर्मितीसाठी पाणी अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले.
माहीम रेसिडेंट्स ग्रुपचा सामाजिक पुढाकार
मस्जिदींमधील या आध्यात्मिक प्रयत्नांना सामाजिक जबाबदारीची जोड देत माहीम रेसिडेंट्स ग्रुपच्या सदस्यांनी पाणी बचतीचे आवाहन केले आहे. ग्रुपचे सदस्य सय्यद गुलजार राणा यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात पाण्याचा अपव्यय टाळण्याचे सांगितले. दात घासताना, दाढी करताना किंवा वाहने धुताना नळ चालू ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. तसेच थेंब थेंब गळणाऱ्या नळामुळे दरमहा शेकडो लिटर पाणी वाया जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नवी मुंबईत सलात-उल-इस्तिस्काचे आवाहन
नवी मुंबईत सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहनवाज खान यांनी इस्लामिक विचारवंत, मस्जिदींचे इमाम आणि नागरिकांना 'सलात-उल-इस्तिस्का' म्हणजेच पावसासाठी केली जाणारी पारंपारिक विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विविध मस्जिदींना विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्याचे सांगितले. तसेच सर्व कुटुंबांना या कठीण आणि कोरड्या हवामानापासून दिलासा मिळण्यासाठी आपापल्या घरातूनही प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
कुर्लाच्या तकिया जामा मस्जिदकडून पाण्याचे वाटप
काही दिवसांपूर्वी साकिनाका परिसरातील बीएमसीची मुख्य पाण्याची लाईन मेट्रोच्या कामादरम्यान फुटली होती. त्यामुळे कुर्ला वेस्ट, एल-वॉर्ड आणि आसपासच्या अनेक भागांतील पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद झाला होता. लोकांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. अशा कठीण परिस्थितीत कुर्लाच्या तकिया जामा मस्जिदने पुढाकार घेतला. मस्जिदीतील बोअरवेलचे पाणी कोणताही भेदभाव किंवा धर्म न पाहता सर्व गरजू नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले.