मोहरम आजच्या काळातही प्रासंगिक का आहे?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 59 m ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मौलाना जावेद हैदर झैदी

इस्लामी कॅलेंडरमधला पवित्र महिना 'मोहरम' सुरू झाला, तसे जगभरातले कोट्यवधी लोक मानवी इतिहासात घडलेल्या एका वेदनादायी आणि तितक्याच क्रांतीकारी घटनेच्या आठवणीत बुडून जातात. प्रेषित मुहम्मद साहेबांचे नातू इमाम हुसेन इब्न अली आणि त्यांच्या साथीदारांनी दिलेल्या शहादतीची आठवण काढण्याची हीच ती वेळ असते.

कर्बलाच्या या ऐतिहासिक युद्धाकडे फक्त एखाद्या विशिष्ट समुदायाचे दुःख किंवा शोक म्हणून बघणे, म्हणजे या एवढ्या मोठ्या घटनेला एका अत्यंत छोट्या चौकटीत अडकवण्यासारखे होईल. खरं सांगायचं तर, मोहरमचा हा काळ म्हणजे आत्मपरीक्षणाचा, आपल्या नैतिकतेत सुधारणा करण्याचा आणि न्यायाच्या बाजूने उभे राहण्याची आपली जबाबदारी पुन्हा एकदा नक्की करण्याचा एक जागतिक मंचच आहे.

या महान बलिदानाला आज १३०० हून अधिक वर्षं लोटून गेली आहेत. पण तरीही इमाम हुसेन यांचा तो आवाज आजही तितकाच प्रासंगिक आणि काळजाला भिडणारा वाटतो. आजचं हे जग सतत राजकीय उलथापालथी, सामाजिक विषमता, धर्मांधता आणि ढासळत चाललेली नैतिकता अशा कठीण काळातून जात आहे. अशा बिकट परिस्थितीत कर्बलाचं ते मैदान संपूर्ण मानवजातीला आजही योग्य रस्ता दाखवण्याचं काम करतं. ही ऐतिहासिक घटना जगभरातल्या विचार करणाऱ्या आणि जागरूक लोकांसाठी आशेचा किरण आहे.

eee सत्तेची भूक नव्हती, तर तत्त्वांसाठी लढलेली ती लढाई होती कर्बला

इमाम हुसेन यांच्या या महान बलिदानाचं महत्त्व कोणत्याही एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरतं, इतिहासापुरतं किंवा केवळ धार्मिक ओळखीपुरतं मर्यादित नाहीये. त्यांचा तो मोठा संघर्ष स्वतःच्या हातात एखादी राजकीय सत्ता बळकावण्यासाठी, स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी किंवा कुणाला आपली वैयक्तिक ताकद दाखवण्यासाठी अजिबात नव्हता.

उलट, समाजात वाढलेला जुलूम, भ्रष्टाचार आणि नष्ट होत चाललेली मानवी मूल्यं वाचवण्यासाठी उभी केलेली ती चळवळ होती. त्यांनी दिलेल्या आपल्या या सर्वोच्च बलिदानातून नैतिक नेतृत्वाचा आदर्श जगासमोर ठेवला, जो येणाऱ्या अनेक पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील.

इमाम हुसेन यांचं पालनपोषण प्रेषित मुहम्मद, इमाम अली आणि बीबी फातिमा यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या छत्रछायेखाली झालं होतं. त्यांना न्याय, करुणा, शहाणपण आणि मानवतेप्रती समर्पण यांसारखे उत्तम गुण वारशानेच मिळाले होते. त्यांच्या काळात धर्माच्या नावाखाली हुकूमशाही आणि अन्यायाला प्रोत्साहन देणारी अत्यंत चुकीची राजकीय व्यवस्था निर्माण झाली होती. तेव्हा इमाम हुसेन यांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीशी तडजोड करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यांनी उचललेलं पाऊल म्हणजे बंड नव्हतं, तर समाजाप्रती असलेल्या आपल्या नैतिक जबाबदारीचं पालन करणं होतं.

ff सत्य आणि असत्य यांच्यातला थेट संघर्ष

कर्बलाचा तो प्रवास म्हणजे काही कोणती लष्करी मोहीम किंवा युद्ध नव्हतं. तर ती पूर्णपणे वैचारिक चळवळ होती. इसवी सन ६८० मध्ये कर्बलाच्या त्या तप्त मैदानावर जे काही घडलं, त्याने जगासमोर ताकद आणि तत्त्व या दोन्हींमधला फरक स्पष्ट करून दाखवला. एका बाजूला आधुनिक शस्त्रं, अमर्याद संसाधनं आणि राजसत्तेने परिपूर्ण अशी एक बलाढ्य फौज उभी होती. तर दुसऱ्या बाजूला इमाम हुसेन आणि त्यांच्या फक्त ७२ साथीदारांचा छोटासा गट होता. त्यांच्याकडे शस्त्रांची कमतरता होती. पण त्यांचा तो अतूट विश्वास आणि सत्यावरील निस्सीम निष्ठा हीच त्यांची ताकद होती.

मोहरमच्या दहाव्या दिवशी (ज्याला आशुरा म्हटले जातं) हा ऐतिहासिक संघर्ष अगदी शिगेला पोहोचला. यझिदी सैन्याने इमाम हुसेन यांच्या तळावर अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडून टाकल्या. लहान मुलं आणि महिलांचं पिण्याचं पाणीसुद्धा अनेक दिवसांसाठी बंद करण्यात आलं.

भयंकर उष्णता आणि तहानेने जीव व्याकूळ झाला असूनही, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या या लोकांचे पाय तिथे थोडेसुद्धा डगमगले नाहीत. इमाम हुसेन यांच्या बलिदानाला त्यांच्या ध्येयाचा शेवट समजणं, ही जगाची सर्वात मोठी चूक ठरेल. खरं सांगायचं तर ती एका अशा वैचारिक क्रांतीची सुरुवात होती, जिने येणाऱ्या अनेक शतकांची दिशा बदलून टाकली.

मानवी सन्मान आणि नैतिक जबाबदारीचा मोठा धडा

कर्बलाच्या या संपूर्ण घटनेत दडलेला तो मानवी संदेश सखोल आणि मोठा आहे. निष्पाप मुलं, महिला आणि वृद्धांवर झालेल्या त्या अनन्वित अत्याचाराने या शोकांतिकेला मानवी सन्मानाचं जागतिक प्रतीक बनवलं. नैतिकतेशिवाय मिळालेली अफाट ताकद माणसाला नेहमी विनाश आणि अत्याचाराकडेच घेऊन जाते, हे या घटनेने संपूर्ण जगाला ठणकावून शिकवलं. समाजातील प्रत्येक नागरिकाची आपल्या देशाप्रती आणि जगाप्रती काहीतरी मोठी जबाबदारी असते, याची आठवण कर्बला आपल्याला सतत करून देतं. मग तुम्ही कुणी पत्रकार असा, शिक्षक असा, राजकारणी असा किंवा एखादा सामान्य नागरिक असा; अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं हे सर्वांचं समान कर्तव्य आहे.

आजच्या या आधुनिक जगात अन्यायाची रूपं बदलली असली, तरी त्याची मूळ प्रवृत्ती मात्र तीच आहे. गरिबी, वांशिक भेदभाव, भ्रष्टाचार, वाढती हिंसा आणि खोट्या माहितीचा प्रसार हे आजच्या काळातले नवे अत्याचार बनले आहेत. अशा परिस्थितीत इमाम हुसेन यांचं जीवन आपल्याला मोठी शिकवण देतं. खरं यश हे केवळ भौतिक सुखसोयी किंवा राजकीय सत्ता मिळवण्यात कधीच नसतं. तर अत्यंत कठीण परिस्थितीतही आपली तत्त्वं आणि माणुसकी जिवंत ठेवणं, यातच माणसाचं खरं यश दडलेलं आहे.

ee बीबी झैनब यांचं धाडस आणि मोहरमची शिकवण

इमाम हुसेन यांच्या बलिदानानंतर कर्बलाचा हा संदेश जिवंत ठेवण्यात त्यांची सख्खी बहीण बीबी झैनब बिंत अली यांची भूमिका महत्त्वाची राहिली. कर्बलाच्या मैदानावर आपलं सर्वस्व गमावल्यानंतर बीबी झैनब यांनी स्वतःचं दुःख आणि वेदनेला प्रतिकारात बदलून दाखवलं.

यझीदच्या भर दरबारात त्यांनी आपलं वक्तृत्व, निडरपणा आणि खोल विश्वासाच्या जोरावर ते कटू सत्य सर्वांसमोर मांडलं. राजकीय प्रचाराखाली हे सत्य कायमचं दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांचं हे खंबीर नेतृत्व आजही महिलांच्या धैर्याचं आणि मानसिक खंबीरपणाचं उदाहरण मानलं जातं.

एक अनमोल शिकवण: मोहरम हा केवळ डोळ्यांतून अश्रू ढाळण्याचा किंवा शोक करण्याचा काळ म्हणून पाहिला जाऊ नये. तो खऱ्या अर्थाने नैतिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीची एक चालतीबोलती शाळा आहे.

मोहरमच्या मजलिस आणि सभांचा खरा उद्देश माणसांमधील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरवणे हाच असायला हवा. हा काळ माणसांमधल्या द्वेषाला करुणेने, परस्पर मतभेदांना एकतेने आणि सामाजिक अन्यायाला सामूहिक प्रयत्नांनी बदलून टाकण्याची प्रेरणा देतो. इमाम हुसेन यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणे, हीच त्यांना दिलेली खरी आणि भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. सत्तेपेक्षा नैतिकतेला आणि वैयक्तिक फायद्यापेक्षा सत्याला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांची आणि नागरिकांची आज संपूर्ण जगाला सर्वात जास्त गरज आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter