पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय इस्लामाबादला हलवणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 5 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पाकिस्तानने त्यांचे लष्करी मुख्यालय (General Headquarters - GHQ) रावळपिंडीच्या चकला येथून इस्लामाबाद येथे हलवण्याचा विचार करत आहे. १० मे २०२५ ला भारतीय हवाई दलाने नूर खान हवाई तळावर केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. उपग्रह छायाचित्रांमधून या हल्ल्यात तळाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वात खळबळ उडाली आहे.

भारतीय हवाई दलाने ब्रह्मोस, HAMMER आणि SCALP क्षेपणास्त्रांचा वापर करून नूर खान हवाई तळासह पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ले केले. हे हल्ले ऑपरेशन सिंदूरपेक्षा मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे  पाकिस्तानच्या हवाई संरक्षण आणि लॉजिस्टिक क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे.  चीनी कंपनी MIZAZVISION आणि भारतीय Kawa Space यांच्या उपग्रह छायाचित्रांनुसार, नूर खान तळावरील इंधन टँक, ड्रोन हॅंगर, गोदामाची छपरे आणि रनवेवर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय, किमान दोन लष्करी वाहने उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले, तर रनवेजवळील ढिगारा आणि नुकसान स्पष्ट दिसत आहे.

नूर खान हवाई तळ हा इस्लामाबादपासून फक्त १० किमी अंतरावर आहे. हे ठिकाण पाकिस्तानच्या लष्करी रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग असून याठिकाणी  Saab Erieye पाळत ठेवणारी विमाने, IL-78 हवाई इंधन भरणारी विमाने आणि C-130 वाहतूक विमाने तैनात आहेत. तसेच, येथे PAF कॉलेज चकला हवाई दल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र देखील आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा तळ Strategic Plans Division च्या मुख्यालयाजवळ आहे. हे मुख्यालय पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे व्यवस्थापन आणि सुरक्षितता पाहते. भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्र नियंत्रण प्रणालीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत.

लष्करी मुख्यालय हलवण्यामागील कारणे
नूर खान तळावरील हल्ल्याने पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला सध्याच्या ठिकाणांच्या असुरक्षिततेची जाणीव झाली आहे. हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना रावळपिंडीतील GHQ मधील एका सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आले होते. तज्ज्ञांचे मते लष्करी मुख्यालय इस्लामाबादला हलवण्यामागे भविष्यातील हल्ल्यांपासून संरक्षण आणि रणनीतिक कमकुवतपणा कमी करण्याचा उद्देश असू शकतो. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter