इस्राईलने आज गाझा पट्टीत ऑपरेशन गिदोन’स चॅरियट्स नावाने मोठे आक्रमण सुरू केल्याची घोषणा केली. ऑपरेशन गिदोन’स चॅरियट्स हा इस्राईलच्या युद्ध धोरणाचा एक भाग आहे. यामध्ये गाझावर पूर्ण ताबा मिळवणे, हमासच्या पायाभूत सुविधांचा नाश करणे आणि मानवीय मदतीवर हमासचा प्रभाव रोखणे यांचा समावेश आहे. इस्राईल या योजनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे.
गाझा पट्टीत झालेल्या गेल्या काही दिवसांत झालेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. इस्राईल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सांगितले की, “गाझामधील युद्धाच्या सर्व उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आम्ही विस्तृत हल्ले आणि रणनीतिक क्षेत्रांवर ताबा मिळवण्यासाठी सैन्य तैनात केले आहे. या उद्दिष्टांमध्ये बंधकांची सुटका आणि हमासचा पराभव यांचा समावेश आहे.”
इस्राईलच्या लष्कराने टेलिग्रामवर म्हटले आहे की, ऑपरेशन गिदोन’स हे आक्रमण गाझामधील युद्धाचा विस्तार आहे. यामध्ये हमासच्या लष्करी आणि प्रशासकीय क्षमतांचा नाश, बंधकांची सुटका आणि गाझावर संपूर्ण नियंत्रण मिळवणे यांचा समावेश आहे. इस्राईलच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत गाझामधील १५० हून अधिक दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले. यात हवाई हल्ल्यांसह अतिरिक्त जमिनीवरील सैन्य तैनात करण्यात आले आहे. यामुळे गाझाच्या काही भागांवर ऑपरेशनल नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वीच युद्धाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की, “हमासला पूर्णपणे नष्ट करणे आणि सर्व बंधकांची सुटका करणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढू.” इस्राईलच्या संरक्षणमंत्री इस्राईल कॅट्झ यांनीही सांगितले की, “गाझाची संपूर्ण लोकसंख्या दक्षिणेकडे स्थलांतरित केली जाईल आणि IDF प्रत्येक ताब्यात घेतलेल्या क्षेत्रात कायम राहील.”
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने काल शुक्रवारी सांगितले की, “एकाच दिवसात इस्राईलने केलेल्या हल्ल्यांमध्ये 108 लोक ठार झाले आहेत. यामध्ये बहुतांश महिला आणि मुले होती. इस्राईलने १८ मार्च पासून केलेल्या हल्ल्यात २९८५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.”
गाझाच्या सिव्हिल डिफेन्स एजन्सीने शुक्रवारी पहाटेपासून 115 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये खान युनिस येथे स्थलांतरितांचे तंबू आणि देईर अल-बालाह येथील हल्ल्यांचा समावेश असल्याचे सांगितले. अल जझीरा या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार खान युनिस येथे एका आजोबांसह त्यांच्या दोन नातवांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यांमुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. खान युनिस, देईर अल-बालाह आणि जाबालिया येथील विस्थापितांसाठी केलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांवरदेखील हल्ले झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मध्यपूर्व दौरा पूर्ण केला आहे. ट्रम्प यांच्या कतार आणि इतर देशांच्या भेटींमुळे युद्धविराम आणि मानवीय मदत पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, इस्राईल -हमास यांच्यात युद्धविरामाबाबत कोणतीही ठोस चर्चा झाली नाही. ट्रम्प यांनी कतारमध्ये ‘गाझाला स्वातंत्र्य क्षेत्र बनवावे, आणि अमेरिकेने त्याचा ताबा घ्यावा. मला याचा अभिमान वाटेल’, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेने गाझामध्ये मर्यादित मानवीय मदत पुन्हा सुरू करण्यासाठी इस्राईलच्या कठोर नियमांचा स्वीकार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांवर दबाव टाकला. गाझामध्ये दोन मार्चपासून मानवीय मदत पूर्णपणे बंद आहे. यामुळे २३ लाख नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter