महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस मुसळधार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाळी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल राहणार आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन, अंदमान आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

तापमानात घसरण, राज्यात अलर्ट जारी
पूर्वमोसमी पावसामुळे राज्यात तापमानात घट झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, तर विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे हवामानात बदल जाणवत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा
शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील अनेक भागांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, तर इतर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

पुढील काही दिवस पावसाच्या सरी कायम
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.