मायक्रोसॉफ्टने गुरुवारी सांगितले की, गाझा युद्धादरम्यान त्यांनी इस्रायल लष्कराला प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्लाऊड कम्प्युटिंग सेवा दिल्या आहेत. इस्रायलच्या ओलिसांना शोधण्यात आणि त्यांची सुटका करण्यातही कंपनीने मदत केली. पण कंपनीने हेही स्पष्ट केले की, त्यांच्या अझ्युर प्लॅटफॉर्मचा आणि AI तंत्रज्ञानाचा गाझातील लोकांना लक्ष्य करण्यासाठी किंवा त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापर झाल्याचा कोणताही पुरावा नाही.
मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत संकेतस्थळावरील या ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने युद्धातील आपली भूमिका प्रथमच सार्वजनिकपणे मान्य केली. ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलमध्ये सुमारे १,२०० लोकांना ठार केल्यानंतर युद्ध सुरू झाले. त्यानंतर गाझामध्ये हजारो लोकांचा बळी गेला.
AP चा अहवाल आणि मायक्रोसॉफ्टची भागीदारी
तीन महिन्यांपूर्वी असोसिएटेड प्रेसच्या (AP) तपासात मायक्रोसॉफ्ट आणि इस्रायलच्या संरक्षण मंत्रालय यांच्यातील जवळीक उघड झाली. ७ ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यानंतर इस्रायल लष्कराने मायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक AI उत्पादनांचा वापर २०० पटींनी वाढवला. इस्रायल लष्कर मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवून माहिती गोळा करते. यासाठी अझ्युरचा वापर करून भाषांतर, प्रतिलेखन आणि माहिती विश्लेषण केले जाते. ही माहिती इस्रायलच्या स्वतःच्या AI-आधारित लक्ष्य प्रणालींशी जोडली जाते.
तंत्रज्ञान कंपन्यांचा लष्करी वापर
मायक्रोसॉफ्टसह अनेक तंत्रज्ञान कंपन्या आपली AI उत्पादने इस्रायल, युक्रेन आणि अमेरिका यांसारख्या देशांच्या लष्करांना विकत आहेत. पण मानवाधिकार संघटनांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. AI प्रणालींमध्ये त्रुटी असू शकतात. त्यांचा वापर लक्ष्य निवडीसाठी होत असेल तर निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
मायक्रोसॉफ्टचा अंतर्गत तपास
मायक्रोसॉफ्टने सांगितले की, कर्मचारी आणि माध्यमांच्या तक्रारींमुळे त्यांनी अंतर्गत तपास सुरू केला. यासाठी बाहेरील कंपनीचीही मदत घेतली. पण त्या कंपनीचे नाव किंवा अहवालाची प्रत कंपनीने दिली नाही. इस्रायल लष्कर मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानाचा नेमका कसा वापर करते, याबाबत कंपनीने स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. AP ने विचारलेल्या प्रश्नांनाही कंपनीने उत्तर देण्यास नकार दिला.
मायक्रोसॉफ्टने इस्रायल लष्कराला सॉफ्टवेअर, व्यावसायिक सेवा, अझ्युर क्लाऊड स्टोरेज आणि AI सेवा, विशेषतः भाषांतरासाठी, पुरवल्या. इस्रायलच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षेसाठीही कंपनीने मदत केली. ७ ऑक्टोबरला हमासने घेतलेल्या २५० हून अधिक ओलिसांच्या सुटकेसाठी मायक्रोसॉफ्टने विशेष तंत्रज्ञान आणि आपत्कालीन मदत पुरवली. “ही मदत कठोर देखरेखीखाली आणि मर्यादित स्वरूपात दिली. काही विनंत्या मान्य केल्या, तर काही नाकारल्या,” असे कंपनीने म्हटले. गाझातील नागरिकांच्या गोपनीयतेचा आणि हक्कांचा आदर राखला गेला, असा दावाही कंपनीने केला.
इस्रायल लष्कराशी संवाद
मायक्रोसॉफ्टने तपासादरम्यान इस्रायल लष्कराशी संवाद साधला की नाही, याबाबत काही सांगितले नाही. ओलिस सुटकेसाठी दिलेली विशेष मदत आणि पॅलेस्टिनी नागरिकांचे हक्क कसे सुरक्षित ठेवले, याचा तपशीलही कंपनीने दिला नाही.
मायक्रोसॉफ्टने मान्य केले की, ग्राहक आपले सॉफ्टवेअर त्यांच्या सर्व्हर किंवा उपकरणांवर कसे वापरतात, याची माहिती कंपनीला नसते. इतर क्लाऊड प्रदात्यांद्वारे आपली उत्पादने कशी वापरली जातात, हेही कंपनीला माहीत नाही. मायक्रोसॉफ्टव्यतिरिक्त, इस्रायल लष्कराने गुगल, ॲमेझॉन, पलांटिरसह इतर अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांकडून क्लाऊड आणि AI सेवा घेतल्या आहेत.
मायक्रोसॉफ्टच्या धोरणांचे पालन
मायक्रोसॉफ्टने सांगितले की, इस्रायल लष्करासह सर्व ग्राहकांना कंपनीचे स्वीकार्य वापर धोरण आणि AI आचारसंहिता पाळावी लागते. यात कायद्याविरुद्ध हानी पोहोचवण्यासाठी उत्पादनांचा वापर करण्यास मनाई आहे. कंपनीला इस्रायल लष्कराने या नियमांचा भंग केल्याचा पुरावा सापडला नाही.
तज्ञांचे मत
जॉर्जटाउन विद्यापीठातील सेंटर फॉर सिक्युरिटी अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या वरिष्ठ संशोधक एमेलिया प्रोबास्को म्हणाल्या, “ही निवेदन महत्त्वाची आहे. कारण व्यावसायिक तंत्रज्ञान कंपन्या युद्धात सहभागी असलेल्या सरकारांशी काम करण्यासाठी स्पष्ट नियम आखत नाहीत. एखादी कंपनी सरकारला सांगते की आमची उत्पादने फक्त विशिष्ट कारणांसाठी वापरा, ही नवीन बाब आहे.”
इस्रायलचा माहितीचा वापर
इस्रायलने मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करून दहशतवाद्यांना लक्ष्य केले. ओलिसांच्या सुटकेसाठी गाझामध्ये छापे टाकले. पण यात अनेकदा सामान्य नागरिकांचा बळी गेला. फेब्रुवारी २०२४ मध्ये राफाह येथे दोन इस्रायली ओलिसांची सुटका झाली, पण ६० पॅलेस्टिनी मरण पावले. जून २०२४ मध्ये नुसैरात निर्वासित छावणीत चार ओलिसांची सुटका झाली, पण २७४ पॅलेस्टिनींचा जीव गेला. गाझा आणि लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आणि बॉम्बहल्ल्यांमुळे ५०,००० हून अधिक लोक मरण पावले, यात अनेक महिला आणि मुले होती.
‘नो अझ्युर फॉर अपारथाइड’ची मागणी
‘नो अझ्युर फॉर अपारथाइड’ या मायक्रोसॉफ्ट कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या गटाने शुक्रवारी कंपनीला तपास अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. माजी कर्मचारी हुस्साम नासर म्हणाले, “कंपनीचा हेतू कर्मचाऱ्यांच्या चिंता दूर करण्याचा नाही, तर इस्रायल लष्कराशी संबंधांमुळे खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा आहे.” नासर यांना ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या मुख्यालयात गाझातील मृत पॅलेस्टिनींसाठी अनधिकृत प्रार्थना सभेचे आयोजन केल्यामुळे नोकरीवरून काढण्यात आले.