मध्यप्रदेशच्या देवास येथील सामूहिक विवाह सोहळा.
आजच्या काळात आर्थिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या सामान्य कुटुंबांना मुला-मुलींचे विवाह करणे अवघड जाते. इच्छा नसली तरीही सर्व सामान्य कुटुंब सामूहिक विवाहसोहळ्यात त्यांच्या मुला मुलींचे लग्न लावून देतात. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या एका मुस्लिम संघटनेने एक सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन करून सर्वांना सामाजिक बंधुभावाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.
लग्न समारंभांना नागरिकांनी आनंदोत्सव आणि रीतिरिवाजांचा एक भाग बनवले आहे. आजच्या काळात बहुतेक लोक विवाह सोहळे मोठ्या थाटामाटात आणि मागण्यांसह करतात. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात सोमवारी १२ मे ला सामूहिक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 35 जोडप्यांचा विवाह केवळ एका रुपयात पार पडला. या समारंभात 35 जोडप्यांच्या दोन्ही कुटुंबांकडून प्रत्येकी फक्त एक रुपया घेण्यात आला. यामुळे त्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात गरीब निराधार कुटुंब सहभागी झाले होते.
या विवाहसोहळ्यात शुल्क कमी घेण्यात आले एवढेच नव्हे, तर जोडप्यांना घरगुती सामानही भेट म्हणून देण्यात आले. या सामूहिक विवाह सोहाळ्यांचे आयोजन आणि संपूर्ण खर्च मध्ये प्रदेशातील ‘सब्र’ ग्रुपने केला. या संघटनेचे अध्यक्ष शौकत हुसैन यांनी सांगितले की, “आम्ही दरवर्षी सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन करतो. गरीब आणि गरजू मुलींचे विवाह फक्त एक रुपयात व्हावे हा सोहळा आयोजित करण्यामागचा आमचा उद्देश असतो. यावेळी आम्ही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पदकविजेते ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान करतो.”
या विवाह सोहळ्यासाठी त्याठिकाणचे विद्यमान आमदार सचिन यादव उपस्थित होते. त्यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले, “अशा प्रकारचा उत्सव खरोखरच प्रशंसनीय आहे. आजच्या महागाईच्या काळात अशा आयोजनांची गरज आहे. या उत्सवातून समाजाला एक आदर्श मिळतो.” याशिवाय काँग्रेस नेते जयसिंग ठाकूर यांनी या समारंभाला बंधुभावाचे दर्शन घडवणारा कार्यक्रम म्हटले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter