'ऑपरेशन सिंदूर 'नंतर भारतीय ऐक्याचा संदेश जगभरात पोहोचविण्याबरोबरच दहशतवादी पाकिस्तानचा भंडाफोड करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठविण्याचे नियोजन केंद्र सरकारने आखले आहे. त्यासाठी विरोधी खासदारांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांना या शिष्टमंडळांत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या शिष्टमंडळांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारतर्फे संपर्क साधण्यात आला. असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी नमूद केले.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी यासंर्भात काँग्रेस अध्यक्षांशी संपर्क साधला आहे. "राष्ट्रीय हित सर्वोच्च मानून काँग्रेसचा सर्वपक्षीय शिष्टमंडळात नक्कीच समावेश केला जाईल. काँग्रेस अध्यक्षांतर्फे पक्षाचे नेते या शिष्टमंडळात जातील," असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. पहलगाममधील हल्ला आणि त्यानंतर भारताकडून करण्यात आलेली कारवाई, या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळांचा होत असलेला परदेश दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. भारत कसा एकजूट असून, त्याला दहशतवादाचा कसा उपद्रव सहन करावा लागला, याबद्दल माहिती देण्यासाठी लोकसभा, राज्यसभेतील लोकप्रतिनिधींना परदेशात विशेष दूत म्हणून पाठविण्याचे नियोजन आहे. शिष्टमंडळात भारताची भूमिका मांडणाऱ्या खासदारांचा समावेश आहे.
केंद्र सरकारकडून आवाहन
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांचे नेते आणि खासदारांना शिष्टमंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर, माजी मंत्री सलमान खुर्शीद, माजी मंत्री गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, 'एमआयएम'चे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे समजते. ओवेसी यांनी मात्र आपल्याशी संपर्क झाला नसल्याचे म्हटले आहे.
शिष्टमंडळांचे स्वरूप
सहा ते सात शिष्टमंडळे पाठविली जाणार
भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांना संधी
माजी मंत्री मुरलीधरन यांचा समावेश शक्य
परराष्ट्र मंत्रालयाचाही दौऱ्यासाठी पुढाकार
'स्थायी'चे प्रमुख शशी थरूर यांनाही संधी
काय करणार?
दहशतवादाबद्दल भारताची भूमिका मांडणार
'ऑपरेशन सिंदूर सह अन्य निर्णयांची माहिती देणार
युरोप, आखाती देशांच्या भेटीला प्राधान्य
या देशांत जाणार
ओमान, इजिप्त, केनिया, दक्षिण आफ्रिका
वेळापत्रक लवकरच
या मोहिमेत ३० हुन अधिक सर्वपक्षीय खासदारांचा समावेश केला जाऊ शकतो. खासदारांची शिष्टमंडळे दहा दिवसांच्या कालावधीत वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन पाकपुरस्कृत दहशतवाद आणि भारतासह वैश्विक समुदायाला या दहशतवादाचा असलेला धोका यावर संवाद साधतील. शिष्टमंडळांचे दौरे २२ ते २३ मे दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून दौऱ्याचे वेळापत्रक आणि इतर आवश्यक माहिती देण्यात येईल. या शिष्टमंडळात भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार, संयुक्त जनता दल यांसारख्या पक्षांच्या नेत्यांचा समावेश असेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter