अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 मे 2025 ला सौदी अरबपासून 'मिडल ईस्ट'च्या चारदिवसीय दौऱ्याला सुरुवात केली. या ऐतिहासिक दौऱ्यात त्यांनी सौदी अरबसोबत ६०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा आणि १४२ अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराचा तसेच सीरियावरील निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तसेच रियाध येथे सीरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांच्याशी झालेली भेट आणि दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाची स्थापना यामुळे हा दौरा मध्य पूर्वातील शांतता आणि समृद्धीच्या दृष्टीने मैलाचा टप्पा ठरला आहे.
सौदी अरबने अमेरिकन कंपन्यांमध्ये ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात नवे प्रकल्प सुरू होणार असून, अमेरिकेत सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील.
सौदी अरबला अत्याधुनिक हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा, अंतराळ तंत्रज्ञान, नौदल उपकरणे आणि संचार यंत्रणा यांचा समावेश असलेला १४२ अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र करार झाला आहे. हा करार सौदी अरबला क्षेत्रीय सैन्य शक्ती बनवण्यास आणि इराणच्या प्रभावाला आळा घालण्यास मदत करेल.
सौदी अरब आणि कतारच्या आग्रहानंतर ट्रम्प यांनी १९७९ पासून लागू असलेले सीरियावरील सर्व अमेरिकी निर्बंध हटवण्याची घोषणा केली. यामुळे सीरियातील आर्थिक पुनर्रचना आणि शांतता प्रक्रियेला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सीरियाच्या नव्या राष्ट्राध्यक्षांशी भेट :
काल म्हणजे १४ मे ला रियाध येथे डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांच्याशी भेट घेतली. या भेटीत सीरियातील दहशतवादविरोधी लढा, पुनर्रचना आणि मानवतावादी मदतीवर चर्चा झाली असून ट्रम्प यांनी सीरियाला आर्थिक सहाय्य देण्याचे संकेत दिले आहेत.
दहशतवादविरोधी संयुक्त कृती गट
सौदी अरबने ओपेक+ अंतर्गत तेल उत्पादन स्थिर ठेवण्याचे आणि जागतिक तेल किमती नियंत्रणात ठेवण्याचे या दौऱ्यात आश्वासन दिले. तसेच, ट्रम्प आणि सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी दहशतवादविरोधी संयुक्त कृती गट स्थापन करण्यावर सहमती दर्शवली. यामुळे मध्य पूर्वातील दहशतवादी गटांवर गुप्तचर माहिती आणि संयुक्त कारवायांद्वारे नियंत्रण ठेवले जाईल.
सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबतच्या बैठकीत ट्रम्प यांनी आर्थिक आणि संरक्षण सहकार्यावर प्रामुख्याने चर्चा केली. ट्रम्प यांनी ‘यूएस-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरम’मध्ये भाषण करताना मध्य पूर्वात शांतता, समृद्धी आणि स्थैर्याचा मार्ग मोकळा करण्याची आशा व्यक्त केली. त्यांनी सौदी अरबला अमेरिकेचा विश्वासू मित्र म्हणत सांस्कृतिक वारशाचे कौतुक केले.
या दौऱ्याचे जागतिक परिणाम
६०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेत तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात नव्या संधी निर्माण होणार आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना बळ मिळेल. तसेच सीरियावरील निर्बंध हटवणे आणि दहशतवादविरोधी कृती गट करण्यात येणार असल्यामुळे क्षेत्रीय स्थैर्याला चालना मिळेल. सौदीच्या तेल उत्पादन धोरणामुळे जागतिक तेल किमती स्थिर राहतील. यामुळे भारतासारख्या तेल आयातदार देशांना दिलासा मिळेल. सौदी अरब हा भारताचा प्रमुख तेल पुरवठादार असल्याने, या करारामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळ मिळेल. तसेच, अमेरिकन कंपन्यांमधील सौदी गुंतवणुकीमुळे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter