पूर्वोत्तर भारताच्या विकासाचा नवा अध्याय रचला जाणार...

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
केंद्रीय दूरसंचार आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकासमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया.
केंद्रीय दूरसंचार आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकासमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया.

 

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी काल नवी दिल्लीत ‘रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट 2025’च्या कर्टेन रेझर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. या समारंभात त्यांनी पूर्वोत्तर भारताला भविष्याच्या विकासाचे केंद्र म्हणून सादर केले. २३ आणि २४  मे रोजी नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे होणारी ही शिखर परिषद पूर्वोत्तर भारताच्या आठ राज्यांच्या प्रचंड संभावनांना जगासमोर आणणार आहे.

सिंधिया यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पूर्वोत्तराला भारताच्या विकासाच्या केंद्रस्थानी आणले आहे. भारताच्या भविष्याच्या विकासासाठी सर्वात मोठी संधी पूर्वोत्तर क्षेत्रात आहे. ही शिखर परिषद ‘अष्टलक्ष्मी’ म्हणजेच आठ पूर्वोत्तर राज्यांच्या सांस्कृतिक, नैसर्गिक आणि आर्थिक क्षमतांचे प्रदर्शन करेल. पूर्वोत्तर भाग भविष्याची वाट पाहत नसून तो भविष्य घडवत आहे.” 

या कार्यक्रमात पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री सुकांत मजूमदार, मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक मनीषा वर्मा, सांख्यिकी सलाहकार धर्मवीर झा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या शिखर परिषदेचे उद्घाटन करणार असून, यामध्ये केंद्र सरकारचे विविध मंत्रालय, खासदार, राजदूत आणि पूर्वोत्तर राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी सांगितले की, मंत्रालयाने मुंबई, बेंगलुरू, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, गुवाहाटी आणि नवी दिल्ली यासारख्या शहरांमध्ये आयोजित केलेल्या रोड शोमुळे एक लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याशिवाय उद्या  सुषमा स्वराज भवन येथे परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयाने आयोजित राजदूत बैठकीत ७५ हून अधिक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी झाले होते.  

सिंधिया यांनी सांगितले की, “गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्वोत्तरात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि कनेक्टिव्हिटीवर प्रचंड गुंतवणूक झाली आहे. दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा निधी या क्षेत्रासाठी खर्च केला जातो. यामुळे पूर्वोत्तर भाग भारताच्या आर्थिक विकासाचे केंद्र बनले आहे.” 

सिंधिया यांनी पूर्वोत्तरच्या प्राकृतिक संसाधनांचा खजिना, रणनीतिक भौगोलिक स्थान आणि सांस्कृतिक वैविध्य यांचा उल्लेख केला. “पूर्वोत्तर ही दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात शक्तिशाली प्रवेशद्वार आहे. गेल्या दशकातील पायाभूत सुविधा, पाणबुडी केबल्स, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे पूर्वोत्तर आता आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे,” असे ते म्हणाले.

शिखर परिषदेच्या फोकस क्षेत्रांमध्ये पर्यटन आणि आतिथ्य, कृषी-खाद्य प्रक्रिया, कापड-हातमाग आणि हस्तकला, आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल विकास, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, ऊर्जा, तसेच मनोरंजन आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या क्षेत्रांतून पूर्वोत्तरला जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे.

पंतप्रधान मोदींच्या व्हिजन २०४७ अंतर्गत, सरकारने पूर्वोत्तरला भारतातील सर्वात समृद्ध क्षेत्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये स्टार्टअप्ससाठी जागतिक केंद्र, बागायती उत्पादनांचा प्रमुख निर्यातक आणि भारतीय पर्यटनाचा मुकुटमणी बनण्याचे स्वप्न आहे. “हा एक नवा युगाचा प्रारंभ असून हा केवळ पूर्वोत्तरच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि दक्षिण-पूर्व आशियासाठी समृद्धी आणेल,” असे सिंधिया यांनी सांगितले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter