ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट : कुरागुट्टलू जंगलातील नक्षलवाद्यांचा गड उद्ध्वस्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

सुरक्षा दलांनी छत्तीसगड-तेलंगण सीमेवर 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवीत नक्षलवाद्यांची या भागावरील दहशत मोडून काढली. एकवीस दिवसांच्या या मोहिमेत सुरक्षा दलांनी अनेक म्होरक्यांसह ३१ नक्षलवाद्यांना ठार मारल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. 

पुढील वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत देशातून नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा निर्धार सुरक्षा दलांनी केला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांविरोधात सध्या धडाकेबाज कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गतच सुरक्षा दलांनी २१ एप्रिलला बिजापूर जिल्ह्यातील कुरागुट्टलू जंगलात 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' ही मोहीम राबविली. २१ दिवसांनंतर, म्हणजे ११ मे रोजी ही मोहीम थांबवून त्यात मिळालेल्या यशाची माहिती आज केंद्रीय राखीव पोलिस दलाचे प्रमुख जी. पी. सिंह आणि छत्तीसगडचे पोलिस महासंचालक ए. डी. सिंह यांनी पत्रकार परिषद घेत दिली. या मोहिमेत किमान ३१ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले असून काही म्होरके मारले गेले आहेत किंवा गंभीर जखमी झाले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. 

मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये १६ महिला आहेत. या कारवाईत ४५० अत्याधुनिक स्फोटके, दोन टन स्फोटक पदार्थ, अनेक रायफल आणि बराच मोठा दारूगोळा हस्तगत करण्यात आला. 'सीआरपीएफ', कोब्रा कमांडो, छत्तीसगड पोलिसांचे विशेष कृती दल आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. विजापूर जिल्हा हा नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. हा गड उद्ध्वस्त करण्याबरोबरच या भागात आपण अजिंक्य आहोत, हा नक्षलवाद्यांचा समज दूर केल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत 'एक्स'द्वारे माहिती दिली. पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सुरक्षा दलांच्या या यशावरून असे दिसून येते की नक्षलवादाचे उच्चाटन करण्याची मोहीम योग्य दिशेने सुरू आहे. नक्षलवादग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत."

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही 'एक्स'द्वारे या मोहिमेची माहिती देत सुरक्षा दलांचे कौतुक केले. "नक्षलवादाविरोधातील ही सर्वांत मोठी मोहीम होती. सुरक्षा दलांनी केवळ २१ दिवसांत अत्यंत लक्षणीय यश मिळविले आहे. ज्या भागावर आधी 'लाल दहशती'चे वर्चस्व होते, आज तिथेच तिरंगा अभिमानाने फडकत आहे. कुरागुट्टलू जंगल हे सर्व नक्षलवाद्यांचे एकत्रित मुख्यालयच होते. येथे त्यांना प्रशिक्षण दिले जात होते, शस्त्रे तयार केली जात होती. अत्यंत कमी कालावधीत मोठे यश मिळविताना सुरक्षा दलांचे कोणतेही नुकसान झाले नाही." 

कुरागुट्टलूचा पाडाव 
'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' दरम्यान अत्यंत डोंगराळ असलेल्या कुरागुट्टलू भागात जवानांना नक्षलवादी वापरत असलेल्या सुमारे अडीचशे गुहा आढळल्या. लपून बसण्यासाठी आणि शस्त्रे लपविण्यासाठी याचा वापर नक्षलवादी करत होते. ६० किमी लांबी आणि पाच ते १० किमी रुंदी असलेल्या या प्रदेशात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण चालायचे आणि बैठका घेण्यासाठीही ते याचा वापर करत असत. दीर्घ काळापासून या भागात इतर कोणालाही प्रवेश नव्हता. मोहीम राबविण्यासाठी आलेल्या जवानांची जास्तीत जास्त हानी होण्यासाठी अत्याधुनिक स्फोटके दारुच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवल्याचेही सुरक्षा दलांना आढळले. जवानांना भर उन्हाळ्यात ४५ अंश तापमानात शोधमोहिम राबविताना अनेक वन्य प्राणी, डास, किटक यांचाही सामना करावा लागला.