काश्मीरच्या सीमावर्ती गावांमध्ये पुन्हा पसरली शांततेची लहर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती गावांमध्ये सध्या तात्पुरती शांतता आहे. बाजारपेठा हळूहळू सुरू होत असून लोक दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरू करत आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय प्रत्युत्तरानंतर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे स्थलांतर करणे भाग पडल्याने काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला, कुपवाडा आणि गुरेझमधील सीमेवरील भाग तसेच जम्मूमधील पूँच, राजौरी येथील गावे सुनसान होती. घरे रिकामी आणि दुकाने बंद असल्याने सर्वत्र भीतीचे पसरल्याने नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला होता. भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीमुळे येथील नागरिकांनी निःश्वास सोडला असून भीतीची टांगती तलवार आणि स्थलांतरामुळे अस्थिर वातावरणामुळे सध्याची शांततेने त्यांनी दिलासा मिळाला आहे. 

"आम्हाला युद्ध नव्हे तर शांतता हवी आहे. युद्धामुळे विनाशाशिवाय काहीही मिळत नाही. आमच्या मुलांना शांततेत जगायचे असून शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे आहे, "अशी भावना उरीतील स्थानिक दुकानदाराने व्यक्त केली. भारत-पाकिस्तान संघर्षानंतर प्रथमच त्याने दुकान सुरू केले. अनेक रहिवाशांनीही अशाच भावना व्यक्त केल्या असून दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कायम ठेवावी व नियंत्रणरेषेजवळ राहणाऱ्या लोकांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. स्फोट न झालेले शस्त्रसाठे (यूएक्सओ) काढून टाकल्यानंतर सुरक्षा दलांनी उरी भागातील अनेक रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी मंगळवारी (ता.१३) देण्यात आली. सुरुवातीला सहा गावे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी तपासानंतर जाहीर केले. 

उरी आणि नियंत्रणरेषेवरील कुपवाडा, राजौरी आणि पूँच आदी भागांत अजूनही तपासाची प्रक्रिया सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरमधील इतर नियंत्रणरेषेवरील भागांमध्येही गोळीबार आणि स्थलांतरानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बंद असलेले बाजार सुरू होत असून उघडू लागले आहेत आणि स्थानिक लोक आता बाहेर पडू लागले आहेत. 'आता फक्त शांतता टिकून राहावी, एवढेच आम्हाला हवे आहे,' असे जम्मूतील रहिवाशांनी सांगितले. नियंत्रणरेषेजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी शस्त्रसंधीचे एकमुखाने स्वागत केले आहे. ही शस्त्रसंधी भीती आणि स्थलांतरातून मोठा दिलासा आहे, असे त्यांना वाटत आहे.