आशियाई करंडकात पाकिस्तानचा सहभाग अनिश्चित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तान पुरस्कृत संघटनेकडून भारतातील काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारताकडून 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत तोडीस तोड उत्तर देण्यात आले. भारत-पाकिस्तान यांच्यामधील तणावाच्या अशा परिस्थितीमुळे या वर्षी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत भारतातील बिहार, राजगीर येथे होत असलेल्या आशियाई करंडक हॉकी स्पर्धेतील पाकिस्तान संघाचा सहभाग अनिश्चित समजला जात आहे. 

भारतामध्ये आशियाई हॉकी करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २०२६ मध्ये होत असलेल्या हॉकी विश्वकरंडकाची पात्रता फेरी असणार आहे. या स्पर्धेमध्ये यजमान भारतासह पाकिस्तान, जपान, कोरिया, चीन, मलेशिया, ओमान व चीन तैपई या देशांचा सहभाग आहे. अद्याप पाकिस्तानकडून अधिकृतपणे माघार घेण्यात आलेली नाही. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग याप्रसंगी म्हणाले की, आशियाई स्पर्धेला अद्याप तीन महिने आहेत. त्यामुळे आत्ताच काही निश्चित सांगता येणार नाही. केंद्र सरकारकडून येत असलेल्या सूचनांचे आम्ही पालन करू, याआधीही आम्ही हेच करीत होतो. 

हॉकी इंडिया संघटनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले की, केंद्र सरकारकडून पाकिस्तानच्या सहभागाला परवानगी देण्यात आली नाही, तर मग पाकिस्तानला या स्पर्धेपासून दूर ठेवावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात सरकार कोणत्या परिस्थितीत आहे, त्यावरच पाकिस्तानचा आशियाई स्पर्धेतील सहभाग अवलंबून असणार आहे. 

सात की आठ देश ? 
पाकिस्तानला आशियाई करंडकासाठी हिरवा कंदील मिळाला नाही, तर मग भारतात होत असलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सात देशांचा सहभाग निश्चित असेल. अशा परिस्थितीत आठव्या देशाला संधी देण्यात येईल का, असा प्रश्नही याप्रसंगी निर्माण होतो. सूत्रांकडून याप्रसंगी सांगण्यात आले की, पाकिस्तानचा संग या स्पर्धेत नसल्यास सात देशांमध्ये जेतेपदाची झुंज होईल की नव्या देशाचा समावेश करण्यात येईल, याबाबत सांगता येत नाही. आशियाई हॉकी संघटनेकडून याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. 

ज्युनिअर विश्वकरंडकातील सहभागावरही प्रश्नचिन्ह 
भारतामध्ये आशियाई करंडकासह ज्युनियर हॉकी विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेतील लढती चेन्नई व मदुराई येथे पार पडणार आहेत. पाकिस्तानचा आशियाई करंडकासह ज्युनियर विश्वकरंडकातील सहभागही याप्रसंगी अनिश्चित असणार आहे.