तेजोमय तारा : सरन्यायाधीश भूषण गवई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह न्या. भूषण गवई, डॉ. तेजस्विनी गवई, ज्योतिरादित्य गवई
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह न्या. भूषण गवई, डॉ. तेजस्विनी गवई, ज्योतिरादित्य गवई

 

अभ्यासू वृत्ती, चिकित्सक स्वभाव, धाडसी अन् प्रचंड कष्ट करण्याची तयारी असल्याने न्या. भूषण गवई यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांनी सांगितलेले अनुभव. 

लहान मुले अनुकरणप्रिय असतात, त्यामुळे त्यांना बालपणापासून चांगले संस्कार देण्याची जबाबदारी माता-पित्यांची असते. त्यामुळे भूषणसह राजेंद्र व कीर्तीवर खूप लक्ष दिले. दादासाहेबांना राजकीय जीवनातून फारच कमी वेळ कुटुंबासाठी मिळत असल्याने मुलांवर संस्कार करून त्यांना घडविण्याची जबाबदारी आई म्हणून पार पाडली. भूषण अनेक काळ त्यांच्या वडिलांसोबत राहिल्याने दादासाहेबांमधील बरेचशे गुण त्याने आत्मसात केले. विशेष म्हणजे दादासाहेबांच्या गैरहजेरीत भूषण कुटुंबप्रमुख म्हणूनच जबाबदारी उचलायचा. अतिशय कमी वयात त्याने जबाबदाऱ्या घेतल्या. आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना भूषण व सर्व भावंडांचे अगदी साधे राहणीमान होते, ते आजतागायत त्यांनी कायम ठेवले आहे. 

विशेष म्हणजे, मुंबईला शिकायला असताना दादासाहेब आमदार होते, तरीदेखील कुठेही आमदारपुत्राचा बडेजाव त्यांच्यात आला नाही. शिक्षण घेण्यासाठी घरापासून कॉलेजपर्यंत भूषण बसनेच प्रवास करायचा. काटकसरीने जीवन जगण्याचा आमच्या कुटुंबाचा मूलमंत्र असल्याने भूषणसह त्याच्या भावंडांनीही तो जोपासला. लहानपणापासूनच भूषणला निसर्गाची आवड होती. यासोबतच शेतीमध्ये त्याला विशेष रुची होती. म्हणूनच मुंबईत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अमरावतीला परतला आणि माझ्यासोबत शेती पाहू लागला. 

अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरातील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याने परिस्थितीची जाण त्याला होती. पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला, तेथे होलिक्रॉस स्कूलमध्ये शिक्षण घेतले, आधी त्याने वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली, मात्र कायद्याच्या अभ्यासामध्ये अत्याधिक रुची असल्याने पुढे विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. विधीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. 

मात्र त्यापूर्वीचा काळसुद्धा लक्षात घेण्यासारखा राहिला, दादासाहेब आमदार झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य मुंबईला होते. त्यांना मदत करण्यासाठी भूषणसुद्धा तेथे राहायचा, आश्चर्याची बाब म्हणजे कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणाऱ्या दादासाहेबांनी त्यांचे तेव्हाच निवासस्थानसुद्धा कार्यकर्त्यांसाठी खुले करून दिले होते. कार्यकर्त्यांना तेथे कुठलाच अटकाव नसायचा, त्यामुळे नेहमीच कार्यकत्यांची मांदियाळी राहत असे. विधीचा अभ्यास करता यावा, यासाठी भूषण चक्क व्हरांड्यात अभ्यास करायचा.

पुढे कालांतराने मुंबईला राहण्याचा खर्च परवडणारा नसल्याने भूषण अमरावतीला परतला आणि आमच्या शेतीकडे लक्ष देऊ लागला. शेती हा आवडता विषय असल्याने त्याने दोन, तीन वर्षे चांगली शेती केली. त्याच्या स्वभावाचे एक वैशिष्ट असे की, तो अभिमानी नव्हे तर स्वाभिमानी आहे. स्वाभिमान हा त्याच्या अंतरंगात भरलेला आहे. तीन चार वर्षे शेती केल्यानंतर अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात 'ली' चे शिक्षण घेतले. भूषणने कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रथम मुंबईला बॅरिस्टर राजाभाऊ भोसले या प्रसिद्ध वकिलांचा सहायक म्हणून काम केले. त्यातून अर्जित केलेल्या अनुभवातून त्याने काही दिवस अमरावतीला प्रक्टिस केली. पण नंतर लवकरच नागपूरला स्थायिक होऊन त्याने वकिलीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. जबाबदारीची जाणीव, हाती घेतलेल्या कामात तडजोड करायची नाही असा स्वभाव, कुणालाही मदत करायची तर झोकून देऊन करायची असा स्वभाव, साधे राहणीमान, संकटाच्या वेळी मदतीला धावून जाणे, कामात पेन्डेंसी ठेवायची नाही, असा स्वभाव त्याचा आहे. हा स्वभाव त्याने न्यायाधीशांच्या खुचर्चीत असतानाही कायम ठेवला. 

न्यायालयात न्यायाधीश तर खुर्चीवरून खाली उतरल्यानंतर सर्वसामान्य माणूस असेच जीवन जगण्याचा स्वभाव भूषण गवई यांनी आजही कायम ठेवला आहे. वाचनावर सुरवातीपासून त्यांचे प्रेम होते, विविध लेखकांची विविध विषयांवरील पुस्तके वाचून काढणे हा त्यांचा आवद्धती छंद. चौथीत असतानापासून त्यांचे कपाट पुस्तका भरले होते. विशेष म्हणजे जेवण करताना सुद्धा हात्तचे पुस्तक सोडत नव्हते, इतका त्यांना वाचनाचो व्यासंग होता आणि आजही त्यांची ही अभ्यासूवृत्ती कायम आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करायला त्यांना खूप आवडते. दान देण्यातही ते कधीच मागे राहिले नाहीत. ज्या ज्या ठिकाणी त्यायाधीश म्हणून काम केले त्या त्या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली. म्हणजेच त्याठिकाणी घराच्या परिसरात बगीचा फुलविणे, फळझाडांची लागवड करणे, किचन गार्डन या त्यांच्या सवयी कायम आहेत. 

भूषणची त्या काळात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने झालेली सन्माननीय पदावरील नियुक्ती ही त्याच्या बुद्धिमत्तेचे व प्रामाणिकपणे केलेल्या परिश्रमांची पावतीच होती. कार्यभार सांभाळल्यापासून त्याने आपली कार्यतत्परता व कुशलता सिद्ध केली. न्यायासनावर बसलेल्या न्यायाधीशांकडून अभिप्रेत असलेले 'भावनेपेक्षा कायदा श्रेष्ठ' या तत्त्वाचे त्याने पूर्णपणे पालन केले. कायद्याचा सन्मान करून समतोलपणा राखून व कुतर्काशी समझोता न करता त्याने न्यायदानाचे पवित्र कार्य पार पाडले आहे. अनेक निवाड्यांवर योग्य निकाल म्हणून त्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. त्याने न्यायासनाची मान आणि शान राखली आहे. त्याच्या या न्यायंप्रियतेमुळेच तो लोकप्रिय झाला. आज त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी झालेली नियुक्ती आमच्यासाठीच नव्हे तर तमाम अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. साहेबांप्रमाणेच भूषणनेही स्वबळावरच यश संपादन केले. खरोखरच तो आम्हा उभयतांसाठी खऱ्या अथनि नावाप्रमाणेच भूषण आहे. 

कायद्याचे सखोल ज्ञान, अभ्यासू वृत्ती 
बुद्धिमत्तेने प्राप्त केलेले कायद्याचे सखोल ज्ञान, अभ्यासू वृत्ती, सचोटी, भाषेवरील प्रभुत्वामुळे आपली बाजू मोजक्या शब्दात मांडून ती पटवून देण्याची स्वकष्टार्जित कला व त्यामुळे वाढीस लागलेला आत्मविश्वास, बोलण्यातील संयम व आपलेपणा, वागण्यातील शालीनता, स्वभावाचा साधेपणा, परोपकारालाच आप्रक्रम देणारा निर्भीडपणा व त्याच्या जोडीला प्रामाणिकपणे केलेली मेहनत यामुळे त्याने वकिलीच्या व्यवसायात जमच बसवला नाही तर एक प्रथितयश वकील म्हणून नावलौकिक मिळविला. केवळ उच्च न्यायालयातच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयातही त्याने आपल्या अशिलांची व महाराष्ट्र शासनाचा अधिकृत अधिवक्ता, या नात्याने महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली व यशस्वी झाला. 

संवेदनशील पुत्र, संघटित नेतृत्व 
दादासाहेबांच्या आजारपणाच्या काळात भूषणने त्यांची सातत्याने सेवासुश्रूषा केली. अगदी सावलीप्रणाणे तो दादासाहेबांजवळ असायचा, कुठलीही जबाबदारी घेतली की ती पार पाडेपर्यंत निवांत श्वास घ्यायचा नाही, असा त्याचा स्वभाव, वकिली सुरू करण्यापूर्वी दादासाहेबांच्या प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग असायचा. कार्यकर्त्यांनासुद्धा तो एक आश्वासक नेतृत्व वाटत असे. विद्यार्थिदशेत असताना त्याने अनेकदा महाविद्यालयीन निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. म्हणजेच त्याच्याकडे उत्कृष्ट असे संघटन कौशल्यसुद्धा आहे. दादासाहेबांच्या निधनानंतर त्याने जवळपास पाच हजार कडुलिंबाच्या झाडांची विविध भागांत लागवड करून दादासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली. ही बाब सर्वांच्याच लक्षात राहणारी आहे. यशोशिखरावर असतानाही त्याने अमरावतीच्या विपश्यना केंद्रामध्ये १० दिवसांचे विपश्यना शिबिर केले होते. 

डेअर डेव्हील व्यक्तिमत्त्वाचे धनी 
केवळ एक बुद्धिजीवी व्यक्ती, मित्रप्रेम जोपासणारा व्यक्ती म्हणूनच भूषण यांची ओळख पुरेशी नाही तर ते डेअर डेव्हीलसुद्धा आहेत. पर्यटनाची त्यांना सुरवातीपासून आवड आहे. ज्या पर्यटनस्थळावर जातील तेथे विविध प्रकारचे साहसी खेळ खेळायचे हा त्यांचा आवडता छंद. एकदा गोव्यानजीकच्या दूधसागर धबधब्यावर आम्ही सर्व कुटुंब गेलो. या खतरनाक धबधब्याजवळ नदीपात्रात आम्ही एकमेकांचे हात धरून साखळी तयार केली व ती नदी पार केली. भूषण नेहमीप्रमाणे आघाडीवर होता. नंतर कळाले की आदल्या दिवशीच याठिकाणाहून एक कार वाहत गेली होती. काहीही करायची धडाडी आणि जिद्द हे गुण त्यांच्यात ठासून भरले आहेत. त्याची चुणूक त्यांच्या कामात अशीच वेळोवेळी दिसून येते. 
 
सरन्यायाधीश भूषण गवई यांची कारकीर्द
 
 

२४ नोव्हेंबर १९६० रोजी न्या. भूषण गवई यांचा जन्म अमरावतीत झाला.

नागपूर विद्यापीठातून त्यांनी कला आणि कायद्याची पदवी घेतली.

१६ मार्च १९८५ रोजी न्या. गवई बारमध्ये सामील झाले होते.

१९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिलीस सुरवात केली.

ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या काळात त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती.

१७ जानेवारी २००० रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अमरावती व नागपूर पालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी कौन्सिल सदस्य होते.

नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले आहे.

१४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

१४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

१२ नोव्हेंबर २००५ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले.

न्या. भूषण गवई यांनी मुंबई, नागपूर आणि पणजी येथील खंडपीठांचे अध्यक्षपद भूषवले.

२४ मे २०१९ रोजी न्या. भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती.

बी. आर. गवई  म्हणून ते कायदा क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही लोकप्रिय आहेत.

सरन्यायाधीश म्हणून त्यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळेल.

२३ नोव्हेंबर २०२५ रोजी ते निवृत्त होतील.

सौजन्य : दैनिक सकाळ
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter