श्रीनगरमध्ये जवानांशी संवाद साधताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह.
श्रीनगरमध्ये बडामी बाग कॅन्टोन्मेंटमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या नव्या धोरणाची ठामपणे मांडणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताच्या भूमीवर कोणताही हल्ला झाला तर तो युद्ध समजला जाईल, असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
ऑपरेशन सिंदूर : दहशतवादाविरोधातील ऐतिहासिक पाऊल
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरला दहशतवादाविरोधातील भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले. या कारवाईने भारताने संरक्षणापुरते मर्यादित न राहता धाडसी निर्णय घेण्याची तयारी दाखवली. दहशतवाद्यांनी धर्माच्या नावावर भारतीयांना ठार केले. आम्ही त्यांच्या कृत्यांवर कारवाई केली. दहशतवाद्यांना संपवणे हे आमचे कर्तव्य होते," असे राजनाथ सिंह म्हणाले. या कारवाईने भारताच्या सैन्याने आपली नेमकी आणि प्रभावी ताकद जगाला दाखवली.
पाकिस्तानात लपलेल्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना या कारवाईने स्पष्ट संदेश दिला आहे. "दहशतवादी कुठेही लपले तरी सुरक्षित राहणार नाही. ऑपरेशन सिंदूरने भारताच्या शत्रूंना धडकी भरवली आहे." असे राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीला भारताचे प्रत्युत्तर
पाकिस्तानने भारताने अनेक वेळा अन्वस्त्रांच्या पोकळ धमक्या दिल्या आहेत. पण भारत या धमक्यांना घाबरला नाही. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या बेजबाबदार वर्तनावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "पाकिस्तानसारख्या अस्थिर देशाकडे अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का? आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर देखरेख ठेवावी". पुढे ते म्हणाले, "पाकिस्तानने २१ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर दहशतवादाला आळा घालण्याचे आश्वासन दिले होते. पण पाकिस्तानने भारताची फसवणूक केली. पाकिस्तानने भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे."
पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवाद आणि PoK वर
संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत ते म्हणाले, "दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. पाकिस्तानशी चर्चा होईल ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवर."
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारताच्या सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न झाला. भारतीय सैन्याने या हल्ल्याला शत्रूच्या मुळावर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना आणि पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना संरक्षण मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. जखमी सैनिकांच्या लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि समर्पणाचे संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले. "पाकिस्तानच्या सीमेपलीकडील चौक्या आणि बंकर्स उद्ध्वस्त करणाऱ्या सैनिकांना देशाचा अभिमान आहे. सरकार सैनिकांना आधुनिक शस्त्रास्त्रे, मिसाईल संरक्षण यंत्रणा आणि ड्रोन यांसारख्या सुविधांनी सज्ज करत आहे," असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter