भारतीय हज आणि उमराह यात्रेकरूंचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 7 Months ago
सौदीचे हज आणि उमराह मंत्री अल-रबिया, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
सौदीचे हज आणि उमराह मंत्री अल-रबिया, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

 

दरवर्षी जगभरातील लाखो मुस्लीम हज व उमरा यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का शहराला भेट देतात. भारतीय हज यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुखकारक व्हावा यासाठी सौदी अरेबियाने यावर्षी काही उपाययोजना केल्या आहेत. 

सौदीचे हज आणि उमराह मंत्री तौफिग बिन फौजान अल-रबिया सध्या भारत दौऱ्यावर आहेत. अल-राबिया यांनी मंगळवारी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी भारत-सौदी अरेबिया संबंध सुधारण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. यावर्षीच्या हज यात्रेसाठी भारताला १ लाख ७५ हजार २५ यात्रेकरूंचा कोटा देण्यात आल्याचेही अल-रबिया यांनी सांगितले. दरम्यान, सौदी अरेबियाने हज यात्रेसाठी विशेष मदत केल्याबद्दल स्मृती इराणी यांनी त्यांचे कौतुक केले.  

यात्रेबद्दल अल-रबिया म्हणाले, "यावर्षी उमरा व्हिसाची मुदत ९० दिवसांपर्यंत वाढवण्यासोबतच ४ दिवसांचा ट्रान्झिट व्हिसाही सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम खास भारतीय यात्रेकरूंचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी तयार केला आहे. विशेषत: उमरा यात्रेला स्वतंत्र येणाऱ्या महिलांना याचा फायदा होईल." 

 

सर्वाधिक प्रमाण भारतीय महिलांचे 

पूर्वी हज किंवा उमराह करण्यासाठी स्त्री सोबत पुरुष असणे आवश्यक होते. मात्र, गेल्या वर्षी सौदीने हज किंवा उमराह करणाऱ्या महिला यात्रेकरूंसाठी मोठी घोषणा केली होती. त्याचा परिणाम म्हणून मागील वर्षी भारतातून हज यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंमध्ये सुमारे ४७ टक्के महिलाच होत्या. २०२३ मध्ये ४००० हून अधिक महिलांनी महरमशिवाय हज केले होते. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 

लाखो मुस्लिम करतात हज यात्रा 
जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज आणि इस्लामिक तीर्थयात्रा उमराह करण्यासाठी मक्का येथे जातात. यात्रेकरूंचे अनुभव सुखद करण्यासाठी सौदी अरेबियात प्रभावी उपक्रमाचे आयोजन केले जाते. अलीकडे भारतीय उमरा यात्रेकरूंची संख्या वाढली आहे.