मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना 'मसाप'चा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी
प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी

 

'मसाप' अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्कृती संस्थेकडून दिला जाणारा मानाचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना जाहीर झाला असून ११ हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर जेष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांना‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या आणि साहित्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.

 

डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्याविषयी...

मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालायचे (एमएमसीसीचे) उपप्राचार्य म्हणून निवृत्त झालेले प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी तब्बल चाळीसहून अधिक वर्षांपासून समाजपरिवर्तनाच्या चळवळीत संघटनात्मक आणि वैयक्तिकरित्या सक्रीय आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष असणारे डॉ तांबोळी मंडळाचे मुखपत्र असलेल्या मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादकही आहेत. याशिवाय त्यांनी हमीद दलवाई क्रांतिकारी विचारवंत, आझाद कलाम, तिमिरभेद, समान नागरी कायदा : वास्तव व अपेक्षा आणि इतर पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे.  

 

चार दशकांच्या त्यांच्या अंखड समाजसेवेसाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जग्गनाथ राठी पुरस्कार, रा ना चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार हे त्यापैकी काही निवडक पुरस्कार आहेत.

 

काय आहे महाराष्ट्र साहित्य परिषद?

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. ही संस्था गेल्या ११७ वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचे जतन करून संवर्धन करण्याचे काम करत असते. अनेक थोर लेखकांनी आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या साहित्यसेवकाची भूमिका पार पाडत या संस्थेला नावारूपाला आणले आहे.

 

कधी होणार पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम?

२७ मे रोजी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संस्थेच्या वर्धापनदिन समारंभात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) चे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.