मुस्लिम समाजाने सत्यशोधक बनावे

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 10 Months ago
पुरस्कार स्वीकारताना डॉ. शमसुद्दीन तांबोळी आणि अच्युत गोडबोले
पुरस्कार स्वीकारताना डॉ. शमसुद्दीन तांबोळी आणि अच्युत गोडबोले

 

“भारतातील मुसलमान सत्यशोधक बनत नाही, तोपर्यंत दारिद्र्य, दुःख आणि अंधश्रद्धा मिटणार नाही, भारत खऱ्या अर्थाने राष्ट्र बनू शकणार नाही. देशात समान नागरी कायदा येणे खूप गरजेचे आहे. आज ना उद्या ते करावेच लागणार आहे, कारण राज्यघटनेत ते बंधनकारक केले आहे. मुस्लिमांना त्याला सामोरे जावेच लागेल. मुस्लिम समाजाला माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी धर्माच्या बेड्या तोडून सत्यशोधक बनावे लागेल," अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी विचार मांडले.

 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) ११८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कसबे बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी लेखक अच्युत गोडबोले यांना 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' देण्यात आला. या वेळी माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अच्युत गोडबोले, डॉ शमशुद्दीन तांबोळी यांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी (डावीकडून) प्रा. मिलिंद जोशी, गोडबोले, डॉ. विवेक सावंत, डॉ. तांबोळी, डॉ. रावसाहेब कसबे, सुनिताराजे पवार. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. कार्यक्रमात साहित्य परिषदेच्या आटपाडी शाखेला 'उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार', तर दामाजीनगर शाखेला 'वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार' देण्यात आला. डॉ. शशिकला पवार (धुळे) आणि कल्याण शिंदे (पंढरपूर) यांना 'मसाप कार्यकर्ता पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
 
डॉ. कसबे म्हणाले, "मुस्लिम समाजात सुधारणा कशी होईल, हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न नव्हे, तर हा समग्र भारतापुढील प्रश्न आहे. मुस्लिम समाज अजूनही अंधश्रद्ध धर्माला कवटाळून बसलेला आणि मध्ययुगातच वावरत आहे. ईश्वरनिष्ठ, धर्मनिष्ठ असणे म्हणजे माणूस असणे नव्हे. तर माणूस होण्यासाठी धर्माच्या बेड्या तोडाव्या लागतील. मुस्लिम समाजात सत्यशोधक तयार करण्याची गरज आहे. "
 
"मराठी साहित्य चळवळीत वाचनाची चळवळ उभारायला हवी." असे उद्गार काढत डॉ. सावंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रूपांतर आता एका चळवळीत झाल्याचे सांगितले. कार्यक्रमात पुरस्कारथींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जोशी यांनी, तर सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.