सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्ससाठी पंतप्रधान मोदींनी पाठवली चादर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 6 Months ago
हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्सला चादर पाठवतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि इतर मान्यवर.
हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्सला चादर पाठवतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि इतर मान्यवर.

 

राजस्थानमधील अजमेर येथे असलेल्या जगप्रसिद्ध हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्फ गरीब नवाज यांच्या ८१२व्या उर्सला सुरुवात झाली आहे. धार्मिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. 

केवळ देशभरातून नव्हे तर जगभरातून लाखो यात्रेकरू ख्वाजांच्या दर्गाहवर जियारत म्हणजे दर्शनासाठी येऊ लागले आहेत. सुफी संतांच्या समाधीवर चादर आणि फुले अर्पण करून प्रार्थना करण्याची प्रथा असते. त्यामुळे देशभरातून विविध धर्मीय भक्त या सुफी संताच्या दरबारात भक्तीभावाने चादर पाठवतात. 

गरीब नवाज यांच्या समाधीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चादर पाठवली असून ही चादर १३ जानेवारीला अर्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतीच मुस्लिमांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही चादर सुपूर्द केली. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी पंतप्रधान मोदींच्या वतीने अजमेर येथे जाऊन ही चादर अर्पण करणार आहेत.
 
 
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही चादर पाठवत असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे दिली. "मी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्ससाठी चादर सुपूर्द केली. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते," अशी माहिती त्यांनी दिली.  
 
पंतप्रधान मोदींनी सलग दहाव्या वर्षी पाठवली चादर 
पंतप्रधान मोदी दरवर्षी अजमेर दर्गाहच्या उर्सच्यावेळी चादर पाठवतात. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जपली आहे. गेल्या वर्षी मोदींनी भगव्या रंगाची चादर पाठवली होती. माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मोदींच्या वतीने ही चादर समाधीवर अर्पण केली होती. 

 

चादरीसोबत पंतप्रधान मोदींनी दिला होता धार्मिक सौहार्दाचा संदेश  

पंतप्रधान मोदींनीही गेल्या वर्षी चादरीसोबत विशेष संदेशही पाठवला होता. त्यात ते म्हणाले होते की, "ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्सनिमित्त जगभरातील अनुयायांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. जगाला प्रेम, सौहार्द आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या महान सुफी संताच्या उर्सनिमित्त मी दर्गा अजमेर शरीफला चादर पाठवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. विविध धर्म आणि पंथ यांचे सुसंवादी सहअस्तित्व हा आपल्या देशाचा समृद्ध वारसा आहे. आपल्या देशातील संत, पीर आणि फकीरांनी नेहमीच शांतता, एकता आणि सद्भावनेचा संदेश देऊन राष्ट्राची सांस्कृतिक वीण मजबूत केली आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे भारतातील महान आध्यात्मिक परंपरांचे प्रतीक आहेत."

आपल्या संदेशात ते पुढे म्हणतात, "गरीब नवाज यांनी केलेली मानवतेची सेवा येणाऱ्या पिढ्यांना कायमच प्रेरणा देत राहील. विविधतेतील एकता हे आपल्या देशाचे सौंदर्य आहे आणि उर्सनिमित्त जमलेल्या सर्वधर्मीय भाविकांकडे ही भावना साजरी करण्याची आणि जपण्याची संधी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत कालखंडात सामुहिक बळावर देश प्रगतीच्या नवनवीन शिखर पादाक्रांत करत आहे. मला विश्वास आहे की एकतेच्या बळावर देश नवी उंची गाठेल. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्सनिमित्त मी देशाच्या सुख आणि समृद्धीची कामना करतो."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter