हज कोटा पूर्ववत..

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Hajj
Hajj

 

हज यात्रेसाठी यंदा भारतातून एक लाख ७५ हजार २५ मुस्लिम भाविकांना परवानगी दिली जाणार आहे, असे सरकारने आज जाहीर केले. याबाबत सौदी अरेबिया सरकारबरोबर करार झाला आहे. भारतातून दरवर्षी एवढ्याच प्रमाणात भाविकांना हजसाठी परवानगी दिली जाते. मात्र, कोरोना संसर्गस्थितीमुळे हा कोटा कमी झाला होता. यंदा, हा कोटा पूर्ववत करण्याची मागणी झाल्यानंतर सरकारने सौदी अरेबियाबरोबर चर्चा करून हा कोटा पूर्ववत केला आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले आहे.
 
'हज' यात्रेला जाण्यासाठी काय करावे लागते?

हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हज यात्रेला जाण्यासाठी यात्रेकरूंना नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर त्यांना शॉर्टलिस्ट केले जाते. हज यात्रेला जाण्यासाठीही काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इस्लामिक कॅलेंडरचा १२ वा महिना हिज्जाहच्या ८  व्या ते १२  व्या दिवसापर्यंत हज होतो. ईद-उल-अजहा म्हणजे बकरीदच्या दिवशी हज पूर्ण होतो. हज व्यतिरिक्त, मुस्लिमांमध्ये आणखी एक तीर्थयात्रा आहे, ज्याला उमराह म्हणतात. मात्र उमराह वर्षभरात कधीही करता येणे शक्य आहे.

 

‘हज’ चे महत्व

मुस्लिमांसाठी हज यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण इस्लामच्या पाच स्तंभांपैकी हा एक स्तंभ आहे. इस्लाममध्ये पाच स्तंभ आहेत – कलमा वाचणे, नमाज वाचणे, उपवास म्हणजेच रोजा करणे, जकात म्हणजे दान देणे आणि हजला जाणे.

 

प्रत्येक मुस्लिमाने कलमा, नमाज आणि रोजा ठेवणे आवश्यक आहे. पण जकात (दान) आणि हजमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. जे सक्षम आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्यासाठी हे दोन्ही (जकात आणि हज) आवश्यक आहेत.