अत्तराचे नाव घेताच सगळीकडे सुगंध दरवळायला लागतो. अत्तराचे एक वेगळे महत्त्व आहे. अत्तराचे अनेक प्रकार असून ऋतूनुसार कोणते अत्तर वापरावे, अत्तराच्या इतर उपयोगांसोबतच अत्तर लावण्याची योग्य पद्धत आणि खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
‘अत्तर’ हा शब्द पारशी ‘इतिर’ या शब्दापासून आला आहे. अत्तर हे ऊर्ध्वपातनाद्वारे बनवले जातात. इब्न सीना या पर्शियन भौतिक शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ऊर्ध्वपातनाद्वारे फुलांचे अत्तर तयार केले होते.
कन्नौज हे भारतीय अत्तराचा गड
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्हा हे भारतातील अत्तर बनवण्याचे सर्वात प्रसिद्ध आणि पारंपारिक ठिकाण आहे. आजही कन्नौजमध्ये मुघलकालीन भाभाका प्रक्रियेतून अत्तर बनवले जाते. तर, अत्तर बनवण्यासाठी लागणारी फुले कन्नौजपासून ८० किमी अंतरावर असलेल्या हाथरस जिल्ह्यातील हसयान कस्बे या गावातील शेतातून आणली जातात.
अत्तराचे प्रकार
दक्षिण आशियामध्ये बनणाऱ्या अत्तरांना मुख्यत्वे त्यांचा सुगंध आणि बनवताना वापरल्या गेलेल्या घटकांच्या आधारावर अनेक प्रकारांत विभागले गेले आहे. फुलांचे अत्तर, हर्बल अत्तर, मृद्गंधाचं अत्तर असे हे तीन प्रकार आहेत.
ऋतूनुसार अत्तर
आयुर्वेदात ऋतूनुसार अत्तर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याच आधारावर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वेगवेगळ्या सुंगंधाचे अत्तर लावण्यासाठी सांगितले आहे.
उन्हाळ्यासाठी अत्तर : उन्हाळ्यात गुलाब, चमेली, खस, केवडा, मोगरा सारख्या ‘थंड’ अत्तरांचा उपयोग करावा. उन्हाळ्यात ते शरीर थंड ठेवतात.
हिवाळ्यासाठी अत्तर : हिवाळ्यात कस्तुरी, अंबर, केशर, औद यांचे अत्तर लावणे चांगले. कारण त्यांच्यात शरीराचे तापमान वाढवण्याची क्षमता असते.
किती दिवस साठवून ठेवू शकतो?
शुद्ध अत्तर कधीही खराब होत नाही. अत्तर जेवढे जुने होते तेवढा त्याचा सुगंध वाढतच जातो, असेही काही अत्तर आहेत. अत्तर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ते अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या अत्तरदानीमध्ये ठेवले जाते. अत्तर पारंपरिकरीत्या उंटाच्या कातडीपासून बनवलेल्या कुपी (शिशी) किंवा बाटलीमध्ये ठेवले जाते. उंटाच्या कातडीपासून बनवलेल्या कुपीमधील अत्तर कधीच खराब होत नाही.
अत्तर लावण्याची पद्धत
अत्तर लावण्याची विशिष्ट पद्धत आहे. अत्तर कपड्यावर नाही तर ते थेट शरीरावर लावायचे असते. शरीराच्या ज्या भागांवरील नसा त्वचेपासून जवळ असतात (मनगट, कानाच्या खालच्या बाजूला, मानेच्या दोन्ही बाजूला) तेथे अत्तर लावले जाते. अत्तर खूप घट्ट असते. त्यामुळे चांगल्या अत्तराचा सुगंध बरेच दिवस टिकतो. तसेच, अत्तर लावण्यापूर्वी तळहाताच्या मागील बाजूस ते थोडेसे लावावे आणि दुसऱ्या हाताच्या पाठीमागे घासावे.