आदिवासींना वनवासी म्हणणे हा त्यांचा अपमान - शरद पवार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 16 d ago
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

 


मुंबई: जल, जंगल आणि जमीन याचे खरे मालक हे आदिवासी आहेत. जंगलाचे संरक्षण करण्यामध्ये आदिवासींचे मोठे योगदान आहे. पण काहीजण त्यांना वनवासी म्हणतात. आदिवासींना वनवासी म्हणणे हा त्यांचा अपमान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आदिवासींना वनवासी म्हणून संबोधण्यावर तीव्र आक्षेप नोंदविला.
 
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंती निमित्त ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार -२०२२’ तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला. प्रेमजी यांच्या वतीने के.आर.लक्ष्मीनारायण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पाच लाख रुपयांचा धनादेश आणि यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असे आहे. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी कल्याण केंद्राची स्थापना करण्यात आली. याचे औचित्य साधून पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अणुवैज्ञानिक डाॕ.अनिल काकोडकर उपस्थित होते.
 
 
यावेळी पवार म्हणाले, ‘‘चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आदिवासी कल्याण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासींच्या हितासाठी जे जे संघर्ष करतात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आमची भूमिका आहे. यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण गरज पडल्यावर ते केंद्रात गेले. तेथे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली. ते गेले तेव्हा त्यांच्या बँकेच्या खात्यावर केवळ २७ हजार रुपये होते. ग्रंथ खरेदी करण्यासाठीच ते पैसे खर्च करत. तीच त्यांची संपदा होती’’, असे त्यांनी आवर्जून सांगितले.