लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झाले ६० टक्के मतदान

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 13 d ago
लोकसभा निवडणूक 2024 मतदान
लोकसभा निवडणूक 2024 मतदान

 

देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. तब्बल ६० टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या दोन राज्यांतील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारामध्ये २५ पेक्षाही अधिक लोक जखमी झाल्याचे कळते.

उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर मतदारसंघात मतदान केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, जितेंद्र सिंह, अर्जुनराम मेघवाल, काँग्रेसचे नेते गौरव गोगोई, कार्ती चिदंबरम, ‘द्रमुक’च्या नेत्या के. कनिमोळी, ए. राजा यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. उन्हाचा चटका वाढल्याने त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली असून यात ६०.०३ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये ५५.२९ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी देशातील एकूण मतदानापेक्षाही कमी आहे. पूर्व विदर्भामध्ये उन्हामुळे मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. सर्वांत कमी मतदान आज बिहार राज्यात झाले. या राज्यात केवळ ४७.४९ टक्के एवढ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मणिपूरमध्ये गोळीबार-
गेल्या एक वर्षापासून वांशिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या मणिपूरमध्ये आज मतदानाच्या दिवशीही हिंसाचार झाला. या राज्यातील मोरांग या विधानसभा क्षेत्रात एका बुथवर समाजकंटकांनी गोळीबार केला. यात तीन जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील कुचबिहार भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर या केवळ एकाच मतदारसंघात आज मतदान झाले.

सायंकाळी ६ वाजेपर्यंतचे मतदान (प्रमाण टक्क्यांत)
- अंदमान निकोबार - ५७
- अरुणाचल प्रदेश - ६५
- आसाम - ७१
- बिहार - ४७
- छत्तीसगड - ६३
- जम्मू व काश्मीर - ६५
- लक्षद्वीप - ५९
- मध्यप्रदेश - ६३
- महाराष्ट्र - ५५
- मणिपूर - ६९
- मेघालय - ७०
- मिझोराम - ५४
- नागालँड - ५७
- पुदुच्चेरी - ७३
- राजस्थान - ५१
- सिक्कीम - ६८
- तमिळनाडू - ६२
- त्रिपुरा - ८०
- उत्तरप्रदेश - ५८
- उत्तराखंड - ५४
- पश्चिम बंगाल - ७८