जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील ११ गावांमध्ये संशयास्पद हालचाल दिसल्याच्या वृत्तानंतर, सुरक्षा दलांनी शनिवारी मोठी शोधमोहीम (cordon and search operation) सुरू केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी परिसरात काही संशयास्पद व्यक्ती फिरत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली होती. या माहितीची गंभीर दखल घेत, लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पोलिसांच्या विशेष अभियान गटाने (SoG) तातडीने संपूर्ण परिसराला वेढा घातला.
मेंढर, मनकोट आणि सुरनकोट भागातील बेहरा कुंड, पोठा जंगल, पीर तनोरा, संगला, मोहल्ला लोहार चंडीमाढ, कांडी, कांगडा, केरी गलहुता, मुघल मराह मोहल्ला मुरी आणि पोली वाला ढोक या ११ गावांमध्ये ही शोधमोहीम राबवली जात आहे.
या भागात अतिरिक्त सैन्यबळ तैनात करण्यात आले असून, सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक घराची आणि परिसराची कसून तपासणी केली जात आहे, जेणेकरून लपलेल्या दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना शोधून काढता येईल.