"निवृत्त न्यायाधीशांनी राजकारणात का पडावे?" अमित शहांवरील टीकेवरून किरेन रिजिजूंचा सवाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू

 

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी उपराष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याबद्दल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात मोहीम चालवल्याबद्दल काही निवृत्त न्यायाधीशांवर जोरदार टीका केली. "उपराष्ट्रपती निवडणूक हा एक राजकीय विषय आहे, त्यात निवृत्त न्यायाधीशांनी का हस्तक्षेप करावा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बंगळूर येथे एका वकील परिषदेला संबोधित करण्यासाठी आलेले रिजिजू पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "काही निवृत्त न्यायाधीशांनी गृहमंत्र्यांविरोधात काहीतरी लिहिले आहे. हे चांगले नाही. यातून असा समज होतो की, ते न्यायाधीश असतानाही त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती. गृहमंत्र्यांविरोधात स्वाक्षरी मोहीम चालवणे आणि पत्र लिहिणे योग्य नाही."

रिजिजूंचा काँग्रेसवर हल्लाबोल
यावेळी रिजिजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याबद्दल काँग्रेस नेत्यांवरही निशाणा साधला. "आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आणि आदराने बोलतो, पण राहुल गांधी असोत किंवा महुआ मोईत्रा, विरोधी पक्षनेते शिवीगाळ करत आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आईला शिवीगाळ करणे देशाच्या भविष्यासाठी चांगले नाही," असे ते म्हणाले.

"लोकांनी तुम्हाला मत दिले नाही, तर निवडणूक आयोगाला शिवीगाळ करून काय उपयोग? तीन निवडणुका हरल्यानंतर, राहुल गांधींचा देशावर, लोकांवर, संविधानावर आणि निवडणूक आयोगावर असलेला राग योग्य नाही," असे म्हणत, "लोक तुम्हाला पसंत करत नाहीत, यात आमचा दोष नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.

अटकेनंतर पदावरून दूर करण्याच्या कायद्याचे समर्थन
अटक झाल्यानंतर ३० दिवसांत जामीन न मिळाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावित कायद्यावरील विरोधी पक्षांचे आरोपही रिजिजू यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, "या देशात न्यायालये नाहीत का? जर तुम्ही कोणताही भ्रष्टाचार केला नसेल, तर न्यायालय तुम्हाला जामीन देईल. ज्याने काहीही चुकीचे केले नाही, तो तुरुंगात का जाईल? मन साफ असेल तर भीती नसते. मनात काळेबेरे असल्यानेच ते कायद्यांना शिवीगाळ करू लागले आहेत."