कोल्हापूरच्या गोकुळ दूधसंघाच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून कोल्हापुरात अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचाली सुरू होत्या. नाविद यांच्या निवडीसाठी हसन मुश्रीफ आणि महायुतीच्या नेत्यांनी जोरदार रणनीती आखली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. आज कोल्हापुरात गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत नाविद मुश्रीफ यांना अध्यक्षपदी निवडण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीच्याच नेत्याची निवड व्हावी, असे निर्देश कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांना दिले होते. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली. नाविद हे गोकुळ मिल्क युनियनचे संचालकही आहेत.
गोकुळमध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ) गेल्या अनेक वर्षांपासून आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचा दबदबा आहे. गोकुळचा कारभार या दोन नेत्यांच्या हाती असतो. मुश्रीफ समर्थक अरुण डोंगळे हे गोकुळचे अध्यक्ष होते. मात्र, त्यांची अध्यक्षपदाची दोन वर्षाची मुदत संपल्याने ते १५ मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देणार होते. मात्र, त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र, मुदत संपल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, संचालक मंडळाची आज बैठक पार पडली आणि या बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड झाली आहे.