आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताचा सक्रीय सहभाग - अजित डोवाल

Story by  Awaz Marathi | Published by  Sameer Shaikh • 9 d ago
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या १२व्या परिषदेला संबोधित करताना NSA अजित डोवाल
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या १२व्या परिषदेला संबोधित करताना NSA अजित डोवाल

 

सेंट पीटर्सबर्ग

भारत दहशतवादी आणि गुन्हेगारांकडून माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी तसेच दहशतवादाला मिळणारा निधी रोखण्यासाठी रशियाला सर्व सहकार्य करत राहील, असे आश्वासन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी दिले. 

'सुरक्षा बाबींसाठी जबाबदार असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची १२वी आंतरराष्ट्रीय बैठक' रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे पार पडली.यावेळी बोलताना  बोलताना NSA डोवाल यांनी सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या भारताच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. यावेळी त्यांनी माहिती सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी मुक्त आणि स्थिर आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आवाहनदेखील केले.

NSA डोवाल यांनी अशा सहकार्याचा एक रोडमॅपच समोर ठेवला. त्यामध्ये सरकारापासून खाजगी क्षेत्र, शैक्षणिक, तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेला वर्ग आणि नागरी समाज यांना सहभागी करून घेण्याची कल्पना बोलून दाखवली.  

गंभीर समस्यांबद्दल सामान्य समज विकसित करण्यासाठी नियमित संस्थात्मक संवाद आयोजित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्यासाठी यंत्रणा तयार करण्याबरोबरच उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण, शिक्षण, जागरूकता कार्यक्रम आणि सुरक्षा मानकांचा विकास याद्वारे समविचारी राष्ट्रांची क्षमता वाढवण्यावर डोवाल यांनी आपल्या भाषणात भर दिला. 

NSA डोवाल यांनी म्यानमारचे समकक्ष ॲडमिरल मो आंग यांच्यासमवेत शेजारील देशातील सद्यस्थिती आणि म्यानमारमधील भारत-अनुदानित पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या.

या भेटीविषयी माहिती देताना रशियामधील भारतीय दूतावासाने X वर पोस्ट केले की, " भारत-म्यानमार सीमेवरील अलीकडील घडामोडींवर देखील यावेळी चर्चा झाली. त्यामध्ये सुरक्षा, निर्वासित, विकास प्रकल्प इत्यादी मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला." 

तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सुरक्षा परिषदांचे सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सहाय्यक, उपपंतप्रधान, १०६ देशांचे सुरक्षा दल आणि गुप्तचर सेवांचे प्रमुख तसेच १० आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत NSA डोवाल यांनी रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव्ह यांच्याशीही संवाद साधला. याविषयी बोलताना पात्रुशेव्ह म्हणाले, "समानता आणि सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या अस्मितेचा आदर करण्याच्या तत्त्वांवर आधारित आणि जगातील बहुसंख्य देशांच्या हितसंबंधांची पूर्तता करणारी न्याय्य व्यवस्थेच्या निर्मितीसाठी रशिया कायमच कटिबद्ध आहे."

आदल्या दिवशी, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सर्वांशी व्हर्च्युयल संवाद साधला. आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा २१व्या शतकातील 'गंभीर धोक्यांपैकी एक' आहे आणि तो अधिकाधिक जटिल आणि क्रूर होत असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला