शशी थरूर यांची घराणेशाहीवर जोरदार टीका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरूर

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरूर यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका करत त्याला भारतीय लोकशाहीसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. 'प्रोजेक्ट सिंडिकेट' या आंतरराष्ट्रीय प्रकाशनासाठी लिहिलेल्या 'इंडियन पॉलिटिक्स आर अ फॅमिली बिझनेस' या लेखात त्यांनी हे मत मांडले आहे.​

थरूर यांनी लिहिले आहे, "अनेक दशकांपासून एकाच कुटुंबाने भारतीय राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी आणि सध्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश असलेल्या नेहरू-गांधी घराण्याचा प्रभाव भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाशी जोडलेला आहे. पण या घराण्याने राजकीय नेतृत्व हा जन्मसिद्ध हक्क असू शकतो, ही कल्पना दृढ केली आहे. ही कल्पना प्रत्येक पक्षात, प्रत्येक प्रदेशात आणि प्रत्येक स्तरावर भारतीय राजकारणात शिरली आहे."​

घराणेशाहीमुळे प्रशासनाच्या गुणवत्तेवर परिणाम
थरूर यांच्या मते, जेव्हा राजकीय सत्ता वंश परंपरेनुसार ठरवली जाते, तेव्हा प्रशासनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. क्षमता, वचनबद्धता किंवा लोकांचा पाठिंबा याऐवजी आडनावावर उमेदवारांची निवड होते, तेव्हा शासनाची गुणवत्ता खालावते. राजकीय घराण्यातील सदस्य सामान्य लोकांच्या समस्यांपासून दूर राहण्याची शक्यता असते, त्यामुळे ते लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास कमी पडतात. तरीही त्यांच्या खराब कामगिरीसाठी त्यांना जबाबदार धरले जाईल याची कोणतीही हमी नसते.​

गुणवत्तेला संधी देण्याची वेळ
थरूर यांनी म्हटले आहे की, "भारताने घराणेशाहीऐवजी गुणवत्तेला संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे." यासाठी त्यांनी काही मूलभूत सुधारणा सुचवल्या आहेत. यात कायदेशीररित्या कार्यकाळाची मर्यादा घालणे, पक्षात अंतर्गत निवडणुका घेणे आणि गुणवत्तेवर आधारित नेते निवडण्यासाठी मतदारांना शिक्षित व सक्षम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.​

इतर पक्षांमध्येही घराणेशाही
थरूर यांनी केवळ नेहरू-गांधी कुटुंबावरच टीका केली नाही, तर शिवसेना, समाजवादी पक्ष, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांसारख्या प्रादेशिक पक्षांमध्येही घराणेशाही असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांची उदाहरणे दिली आहेत.​​

राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया
थरूर यांच्या या लेखावर काँग्रेसमधील नेत्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. काही नेत्यांनी सांगितले की, ते केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी असे करतात. दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी थरूर यांच्या लेखाचे कौतुक केले आणि म्हटले की, "इतके स्पष्ट बोलल्याबद्दल थरूर यांना कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."