पुणे - सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतीपूरक व्यावसायासाठी प्रत्येकी किमान १० लाख आणि कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, मूरघास निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकरी हे उद्योजक बनू शकणार आहेत.
केंद्र सरकारने बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत विविध केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान सुरु करण्यास एका पत्राद्वारे परवानगी दिली होती. या परवानगीनुसार सन २०२१ च्या अखेरीस राष्ट्रीय पशुधन अभियान सुरु करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय पशुधन अभियानात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नवीन अभियानाला सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान असे नाव देण्यात आले असल्याचे राज्याच्या पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.
या सुधारित राष्ट्रीय अभियानात पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपअभियान, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियान, नावीन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपअभियान आदींचा समावेश केला आहे.
यापैकी पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपअभियानांतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, मूरघास निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादनासाठी प्रत्येकी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. यानुसार १०० शेळ्यांसाठी कमाल १० लाख, २०० शेळ्यांसाठी २० लाख, ३०० शेळ्यांसाठी ३० लाख, ४०० शेळ्यांसाठी ४० लाख आणि ५०० शेळ्यांसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
याशिवाय कुक्कुट पालनासाठी प्रत्येकी कमाल २५ लाख, वराह पालन योजनेंतर्गत ५० वराहसाठी प्रत्येकी कमाल १५ लाख आणि १०० वराहसाठी प्रत्येकी ३० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शिवाय मूरघास व वैरण विकास प्रकल्पांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.