जुलैमध्ये बेरोजगारीचा दर घसरला; सरकारला मोठा दिलासा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून खूप महत्त्वाचा मानला जातो. मान्सूनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. याचा परिणाम फक्त पिकांच्या उत्पन्नावर आणि जीडीपीमध्ये योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्रावर होत नाही तर रोजगारावरही याचा थेट परिणाम होतो. आता मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असताना सरकारला दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे.


किती आहे बेरोजगारीचा दर?

ब्लूमबर्गच्या अहवालात, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या हवाल्याने म्हटले आहे की जुलै महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. अहवालानुसार, जून महिन्यात बेरोजगारीचा दर 8.45 टक्के होता, जो जुलैमध्ये 7.95 टक्क्यांवर आला.


मान्सून महत्त्वाचा का आहे?

जुलै महिन्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्याचे श्रेय मान्सूनला दिले जात आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण देशात शेतीशी संबंधित कामांना वेग आला आहे. मान्सूनचे महत्त्व वाढले आहे कारण देशातील निम्म्याहून अधिक लागवडीयोग्य जमीन सिंचनासाठी थेट मान्सूनवर अवलंबून आहे.


मान्सूनचा दुहेरी फायदा

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदाच्या मोसमात आतापर्यंत सरासरीपेक्षा 40 टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पीक येण्याच्या आशा वाढल्या आहेत. यंदा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेला दुहेरी लाभ झाला आहे.


यामुळे हंगामी कामाच्या संधी निर्माण झाल्या, ज्यामुळे बेरोजगारी कमी झाली. दुसरीकडे पीकातील वाढ केवळ देशाची अन्न सुरक्षाच नाही तर महागाईवर नियंत्रण ठेवेल आणि जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान वाढेल.


बेरोजगारी कमी झाली

CMIE चे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांचा हवाला देत ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की, चांगल्या पावसामुळे कृषी कामांना गती मिळाली आहे. यामुळेच ग्रामीण भागात कृषी व्यतिरिक्त कामांसाठी मजुरांची मागणी कमी झाली आहे.


यामुळे रोजगाराच्या शोधात असलेले ग्रामीण मजूर कमी झाले आहेत, ज्यामुळे जुलै महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर कमी होण्यास मदत झाली. आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात ग्रामीण भागात रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांच्या संख्येत 50 लाखांची घट झाली आहे.